भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप 2019: मी मँचेस्टरमध्ये अनुभवली दोन्ही देशांच्या फॅन्सची एकी

पाकिस्तान और भारत के समर्थक Image copyright Rex Features
प्रतिमा मथळा मैच जब शुरू हो तो दोनों ओर के फ़ैंस भी एक दूसरे से हंसी मज़ाक करते नज़र आए

पावसापासून बचाव करण्यासाठी टाकलेलं कव्हर मैदानातलं कव्हर काढलं गेलं आणि पाकिस्तानला एक अशक्यप्राय लक्ष्य दिलं गेलं. 30 चेंडूत 136 धावा.

आमीर माझ्या बाजूला बसला होता. तो म्हणाला, "बस्स, आता मी नाही पाहू शकत." आमीर कराचीहून मॅंचेस्टरला फक्त भारत पाकिस्तान मॅच पाहायला आला होता. मात्र त्याचा अपेक्षाभंग झाला होता. पावसामुळे ओव्हर्स कमी आणि धावा जास्त होत्या.

भारताने सुरुवातीपासूनच मॅचवर पकड मिळवली होती. भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध काल सलग सातवा विजय मिळवला आहे. आपण सगळ्यांनी मॅच पाहिलीच आहे. त्यामुळे मी त्याचं विश्लेषण करणार नाही. मात्र मैदानात सगळं नाट्य रंगलं असताना माझे अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे.

आजचा दिवस प्रचंड बिझी असणार याची मला कल्पना होतीच. आम्ही त्यासाठी तयार होतो. मी आतापर्यंत अनेक मॅचेस पाहिल्या आहेत. तरी ही मॅच वेगळी असणार असा मला विश्वास होता.

आम्ही ओल्ड ट्रॅफर्डला गाडीतून उतरलो. चाहत्यांची अलोट गर्दी होती. दोन्ही देशांचे चाहते मंडळी ही अभूतपूर्व मॅच बघायला आले होते. हवेत झेंडे फडकावत होते, रस्त्यावर नाचत होते, आपापाल्या संघाला प्रोत्साहन देत होते. भारत पाकिस्तान मॅचचा नूरच वेगळा असतो. ही मॅच कायमच उत्साहाने भारलेली असते. ज्यांना तिकिटं मिळाली ते स्टेडिअममध्ये जात होते. ज्यांना ती मिळाली नाहीत. ते आयसीसीने उभारलेल्या फॅन झोनमध्ये जात होते.

दोन्ही बाजूच्या चाहत्यांमध्ये उत्साह

आज मला जो अनुभव मिळाला तो कल्पनेपलीकडचा होता. जेव्हा मॅच सुरू झाली तेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश होता. फॅन झोन खचाखच भरला होता. मी आणि माझ्याबरोबर असलेला व्हीडिओ जर्नलिस्ट केव्हिन एका चांगल्या जागेच्या शोधात होतो. आम्हाला ती लगेच मिळाली.

तिथे दोन स्क्रीन लागल्या होत्या. अनेक प्रेक्षक तिथे होते. त्यामुळे अगदी त्यांच्या मध्यभागी जाऊन बसायचा निर्णय घेतला. डाव्या बाजूला संपूर्ण निळाई होती तर उजव्या बाजूला पाकिस्तानी चाहत्यांच्या रुपात हिरवळ होती. खरंतर मैदानात अशा गोष्टी बघायला मिळत नाही. तिथे चाहते सगळीकडे पसरले असतात. इथे मात्र अगदी सुरुवातीपासून दोन बाजू स्पष्टपणे दिसत होत्या.

रोहित शर्माने भारताच्या डावाची दणदणीत सुरुवात केली होती. जेव्हाही एखादा चौकार आणि षटकार मारला जाई तेव्हा भारताचे समर्थक ढोल बडवत होते, घोषणा देत होते, आणि नाचतही होते. विकेट पडली तर पाकिस्तानचे चाहतेही तितक्याच जोमाने सेलिब्रेट करत होते. पहिल्यांदा पाऊस येईपर्यंत हे सगळं सुरू होतं.

Image copyright BBC/Vinayak Gaikwad

जय आचार्य नावाचा एक RJ तिथे होता. तो मला म्हणाला, "मित्रा तू अतिशय उत्तम जागा निवडली आहेस. तुझं आता काहीवेळाने सँडविच होणार आहे." मी फक्त हसलो. मात्र त्यामुळे दोन्ही चाहत्यांच्या उत्कंठेचा अंदाज आला. तिथे खरंतर प्रचंड तणाव होता. दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसत होतं. मात्र कोणीही आक्षेपार्ह वागणूक केली नाही.

जेव्हा पावसामुळे मॅच थांबली तेव्हा फेसबुक लाईव्ह करायला गेलो तेव्हा दोन्ही बाजूची लोक मला बोलावत होती. मात्र मी जिथे होतो तिथूनच लाईव्ह करायचा निर्णय घेतला. तेव्हापर्यंत बऱ्यापैकी मॅच झाली होती. मॅच कोणत्या दिशेने जातेय याचा लोकांना अंदाज आला होता. लोक पावसाला शिव्या घालत होते.

पण खरंतर तेव्हा एक छोटा ब्रेक हवाच होता असं मला वाटून गेलं. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा डीजेने बॉलिवूडची गाणी वाजवायला सुरुवात केली आणि तो क्षण फार भारी होता. लोक फार आनंदात होते. जेव्हा मॅच पुन्हा सुरू झाली तेव्हाचं चित्र मात्र फार वेगळं होतं. आता ती निळाई आणि हिरवळ एकमेकांत पूर्णपणे मिसळली होती. मी पावसाचे आभार मानले.

नवे सूर अन् नवे तराणे

पावसामुळे मॅचचा खेळखंडोबा झाला असं तुम्हाला कदाचित वाटलं असेल. पण त्यामुळे लोक एकत्र आली. त्यांच्यात एकी निर्माण झाली. मी आज अनेक पाकिस्तानी आणि भारतीय चाहत्यांशी बोललो. प्रत्येकाला त्यांचा संघ जिंकणार असं वाटत होतं. मात्र कुणीच एकमेकांना शिव्या घालत नव्हतं. हा खरा बदल होता.

अजित प्रसाद नावाच्या माणसाने भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना गोळा केलं आणि तिथे ते चक्क गल्ली क्रिकेट खेळायला लागले. ते म्हणाले, "कुणी जिंकलं किंवा हारलं तरी या मॅचने आम्हाला अनेक चांगले मित्रमैत्रिणी मिळाले. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या चाहत्यांना एकमेकांबद्दल एक प्रकारची अढी असते. पण या मॅचचे आणि विशेषत: पावसाचे आभार. दोन्ही गोष्टींमुळे आम्हाला नवीन मित्रमैत्रिणी मिळाले."

Image copyright BBC/Vinayak Gaikwad

प्रत्येक रन आणि विकेटनंतर इथे जल्लोष सुरू व्हायचा. लोक एकमेकांना मर्यादा न ओलांडता चिडवत होते. भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांच्या एकीचं एक वेगळंच चित्र इथे चितारलं होतं. या मॅचमुळे फॅनझोनमध्ये तरी सगळं पुसलं जाऊन पाटी पुन्हा कोरी झालेली मला पाहायला मिळाली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)