हाँगकाँग आंदोलन: ‘शील्ड गर्ल’जी गांधीगिरी करून बनली आंदोलनाचा चेहरा

शील्ड गर्ल Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शील्ड गर्ल

अंधार पडला. निदर्शकांची संख्या कमी होऊ लागली, मात्र दंगलविरोधी पोलिसांच्या (Riot Police) पथकासमोर एक मुलगी मात्र ठामपणे ध्यानस्थ असल्यासारखी बसून होती. तिचा या अवस्थेतील फोटो हाँगकाँग निर्दशनांचं प्रतीक बनला आणि आता ती लोकांमध्ये "शील्ड गर्ल" म्हणून ओळखली जाते.

हाँगकाँगमधल्या आरोपींच्या मुख्य चीन भूमीत प्रत्यार्पणाची तरतूद करणारं एक वादग्रस्त विधेयक हाँगकाँग सरकारने मागे घेतलं.

हे विधेयक अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आलं असलं तरी आता ते संपूर्णतः केराच्या टोपलीत टाकण्यात यावं, अशी मागणी आंदोलकांची आहे. त्यावरून हाँगकाँगच्या मुख्य प्रशासक कॅरी लाम यांनी माफीही मागितली आहे, मात्र ते विधेयक अद्याप मागे घेण्यात आलेलं नाही.

म्हणून आपला लढा सुरूच राहणार असल्याचं या 'शील्ड गर्ल'ने बीबीसीशी बोलताना सांगितलं.

हाँगकाँग स्थित आयरिश पत्रकार अॅरन निकोलस यांनी यावर "तरुणाईची निरागसता आणि सत्ताधाऱ्यांच्या ढाली" असं लिहिलंय.

'शील्ड गर्ल' नावाने आता ओळखल्या जाणाऱ्या या मुलीवरून प्रेरणा घेत चीनमधले बंडखोर आर्टिस्ट बाडिउकाओ यांनी हे चित्रं रेखाटलं.

कोण आहे शील्ड गर्ल?

या 26 वर्षांच्या महिलेचं नाव आहे लाम का लो. सरकारी मुख्यालयं असलेल्या अॅडमिरल्टी डिस्ट्रिक्टमध्ये त्या स्वतःहून आल्या. सिव्हिल ह्युमन राईट्स फ्रंटने मंगळवारी रात्री आयोजित केलेल्या मोर्चाच्या काही तास आधीच त्या आल्या.

त्यांच्यासोबत त्या ठिकाणी शेकडो इतर आंदोलक हजर होते. पण चिलखत घातलेल्या, ढाल (शील्ड) घेतलेल्या पोलिसांची संख्या वाढतच गेली.

"पोलिस अधिकाऱ्यांच्या रांगेच्या इतक्या जवळ उभं राहण्याचं कुणाचंच धाडस झालं नाही," ती सांगते. आपल्याला पोलिसांची भीती नव्हती, पण इतर आंदोलकांना इजा होईल, याची काळजी होती, ती सांगते.

तणाव वाढू लागला तसं ती पद्मासनात बसली आणि ओंकार म्हणायला सुरुवात केली.

Image copyright Getty Images

"मला फक्त माझ्या पॉझिटिव्ह व्हाईब्ज पसरवायच्या होत्या. पण आंदोलक पोलिसांना वाईटसाईटही बोलत होते. त्या क्षणी माझ्याबरोबरच्या इतर आंदोलकांनी त्यांना न डिवचता माझ्या बाजूला येऊन बसावं, अशी माझी इच्छा होती."

पण या आंदोलनाचा चेहरा होण्याची या तरुणीची इच्छा नाही.

"मला प्रसिद्धी नकोय," लाम म्हणाली. "पण मी पोलिसांसमोर असं बसलेलं लोकांना भावलं असेल तर माझी अशी आशा आहे की यामुळे लोकांना अधिक बेधडकपणे त्यांची मतं मांडण्यास प्रोत्साहन मिळेल."

मेडिटेशन आणि राग

नियमितपणे ध्यानधारणा (मेडिटेशन) केल्याने आलेला शांतपणा लाम यांच्यात पहायला मिळतो.

भटकंतीची आवड असणाऱ्या लाम यांनी आशिया, लॅटिन अमेरिका, उत्तर अमेरिका आणि युरोपातल्या 12 हून जास्त देशांमध्ये प्रवास केलेला आहे. चार वर्षांपूर्वी नेपाळला गेलेली असताना तिने पहिल्यांदा ध्यानधारणा केली. तेव्हा नेपाळ विनाशकारी भूकंपातून सावरत होता.

आपला मूळ स्वभाव भावनाप्रधान असला तरी ध्यान केल्यामुळे भावनांना आवरणं शक्य होतं आणि मनःशांती मिळवता येते, असं त्या सांगतात.

2014च्या अंब्रेला मूव्हमेंटमध्ये लाम दररोज सहभागी व्हायची. पण तरीही पोलीस आणि आंदोलकांमध्ये बुधवारी दुपारी झालेल्या चकमकी तिच्यासाठीही धक्कादायक होत्या.

"पोलिसांमुळे काही विद्यार्थी जखमी झाल्याने मला थोडा राग येत होता. शेवटी माणूस म्हटलं की काही न काही भावना असणारच," ती सांगते.

बुधवारी जेव्हा या झटापटी झाल्या तेव्हा ती तिथे नव्हती. पण असं असलं तरी पोलीस अधिकाऱ्यांचा आंदोलकांनी काटा काढावा, असं तिला वाटत नाही. अहिंसेच्या मार्गाने आंदोलकांना खूप काही साध्य करता येईल, असं तिला वाटतं.

"हिसेंने काही साध्य होणार नाही."

लढा सुरूच

आंदोलकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट शनिवारी घडली. हे प्रत्यार्पण विधेयक लांबणीवर टाकण्यात येत असल्याचं हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लाम यांनी जाहीर केलं. हे विधेयक पुन्हा कधी आणण्यात येईल, याविषयीची कोणतही माहिती देण्यात आलेली नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लाम यांनी हे विधेयक मागे घेण्याची घोषणा केली.

पण लाम का लो ठाम आहेत.

"मी याला विजय म्हणणार नाही." हे विधेयक मागे घेण्यात आलेलं त्यांना पाहायचंय.

याशिवाय बुधवारच्या झटापटींना दंगलींचा दर्जा देण्यात येऊ नये आणि अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना सोडून देण्यात यावं, अशीही त्यांची मागणी आहे.

हा लढा सुरूच ठेवत सोबतच्या आंदोलकांनी रविवारच्या मोर्चात सामील व्हावं, असं आवाहन त्या करतात.

"तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबांसोबत या. मोठ्या गटांमध्ये या. तुमच्या विविध मार्गांनी तुमची व्यक्त व्हा. मी ध्यानधारणा केली, पण याचा अर्थ हा एकच मार्ग आहे, असं नाही. सगळेजण कलात्मक आणि अर्थपूर्णरीत्या आंदोलन करू शकतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)