वर्ल्ड कप 2019: बांगलादेशचा वेस्ट इंडिजवर 7 विकेट्सनी विजय, शकीब अल हसन-लिट्टन दास यांची वादळी खेळी

शकीब अल हसन, बांगलादेश Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शकीब अल हसन आणि लिट्टन दास

शकीब अल हसनच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर बांगलादेशने वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचा अक्षरक्ष: धुव्वा उडवला.

बांगलादेशने 322 धावांचं लक्ष्य 42व्या ओव्हरमध्येच पूर्ण करत वेस्ट इंडिजवर खळबळजनक विजय मिळवला. 124 धावा आणि 2 विकेट्स घेणारा शकीब या विजयाचा शिल्पकार ठरला.

या विजयासह बांगलादेशने गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे तर वेस्ट इंडिजसाठी सेमी फायनलची वाट आणखी बिकट झाली आहे.

असा झाला सामना

टाँटनच्या छोट्याशा मैदानावर बांगलादेशने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. शे होप (96) आणि एल्विन लुईस (70) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने 321 धावांची मजल मारली.

शिमोरन हेटमेयरने 26 चेंडूत 50 धावांची खेळी करत त्यांना चांगली साथ दिली. जास्तीत जास्त धावा करण्याची आवश्यकता असताना वेस्ट इंडिजच्या बॅट्समननी आततायीपणे विकेट फेकल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजला साडेतीनशेचा टप्पा ओलांडता आला नाही.

बांगलादेशने कसा जिंकला सामना. विंडिजकडून काय चुका झाल्या? पाहा आमचं फेसबुक लाईव्ह

बांगलादेशतर्फे मोहम्मद सैफुद्दीन आणि मुस्ताफिझूर रहमान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. शकीबने 2 विकेट्स घेतल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शकीब अल हसन

322 धावांचा पाठलाग करताना तमीम इक्बाल आणि सौम्या सरकार यांनी 52 धावांची सलामी दिली. रसेलने सौम्याला बाद केलं. त्याने 29 धावा केल्या. शेल्डॉन कॉट्रेलच्या अफलातून फिल्डिंगमुळे तमीम रनआऊट झाला. त्याचं अर्धशतक दोन धावांनी हुकलं.

भरवशाचा मुशफकीर रहीम केवळ एक धाव करून तंबूत परतला. मात्र यानंतर शकीब अल हसन आणि लिट्टन दास यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत तुफानी हल्ला चढवला.

रनरेटचं दडपण वाढत असताना या दोघांनी चौकार-षटकारांची लयलूट करत सामनाच फिरवला. शकीबने 99 चेंडूत 16 चौकारांसह नाबाद 124 तर लिट्टनने 69 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 94 धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

या मॅचसाठी बांगलादेशने मोहम्मद मिथुनच्या जागी लिट्टनला संघात घेतलं. 94 धावांची खेळी करत लिट्टनने संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)