लाखो प्राण वाचविणाऱ्या लसींवर लोक आजही भरवसा का नाही करत?

लसीकरण Image copyright Getty Images

लसीकरणामुळं दरवर्षी वेगवेगळ्या आजारांपासून लाखोंचे प्राण वाचतात. गेल्या शतकात लसीकरणामुळे कोट्यवधी जीव वाचले आहेत, तरीही अनेक देशांमध्ये लसीकरणाबाबतची साशंकता कायम दिसून येते.

लस म्हणजे काय? ती कशा प्रकारे काम करते? याबद्दल अनेकांना माहितीच नसते. त्यामुळे लस घेण्याला नकार दिला जाताना दिसतो. लसीकरण नाकारणाऱ्यांची संख्या खूप जास्त असल्याचं, निरीक्षण आरोग्य तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) याविषयी चिंता व्यक्त केली आहे. 2019 साली जागतिक आरोग्याला असलेल्या दहा धोक्यांपैकी एक धोका म्हणून याची नोंद घेण्यात आली आहे.

त्यामुळेच लसीकरणाविषयी मूलभूत गोष्टींची चर्चा बीबीसी करत आहे.

लसीकरणाचा शोध कसा लागला?

लसीकरणापूर्वी प्रतिकार करता येण्यासारख्या आजारांमुळेही दरवर्षी लाखो लोकांचा जीव जात होता. दहाव्या शतकामध्ये लसीकरणाचं प्रारंभिक रूप शोधण्याचं श्रेय चिनी लोकांना जातं. आता 'व्हॅक्सिनेशन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लसीकरणाचं प्रारंभिक स्वरुप हे 'व्हॅरिओलेशन' प्रकारातील होते.

एखाद्या रोगामुळे धरलेल्या खपलीतील लसीचा वापर करून सुदृढ लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्याची ही प्रक्रिया होती.

देवीसारख्या रोगाने जेव्हा लोक मृत्यूमुखी पडत होते तेव्हा गवळणींना मात्र सौम्य प्रकारच्या देवीचीच लागण होत असल्याचं ब्रिटिश डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांच्या लक्षात आलं. प्राणघातक देवीची लागण मात्र त्यांना अगदी क्वचितच व्हायची.

देवी हा वेगानं पसरणारा साथीचा रोग होता. लागण झालेल्यांपैकी 30 टक्के लोकांना प्राण गमवावे लागायचे. या रोगाला तोंड देऊन बरं झालेल्यांच्या शरीरावर देवीचे व्रण कायम राहत किंवा अशा व्यक्तिंना अंधत्वही यायचं.

प्रतिमा मथळा लस कशी काम करते

जेन्नर यांनी 1796 साली आठ वर्षांच्या जेम्स फिप्स याच्यावर एक प्रयोग केला. गायीच्या आचळांना होणाऱ्या जखमेतील पू डॉक्टर जेन्नर यांनी या मुलाच्या शरीरात इंजेक्शनद्वारे सोडला. त्याच्या अंगावर लगेच त्यासंबंधीची लक्षणं दिसू लागली.

फिप्स यातून बरा झाल्यावर जेन्नर यांनी देवीचा संसर्ग त्याच्या शरीरात घातला, परंतु त्याच्यावर त्याचा परिणाम झाला नाही, तो सुदृढ राहिला. गायीच्या आचळांना झालेल्या देवीसदृश जखमेतील द्रवामुळे या मुलाचं शरीर देवीच्या रोगाला प्रतिकारक बनलं होतं.

जेन्नर यांच्या प्रयोगांचे निष्कर्ष 1798 साली प्रकाशित झाले आणि गायीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'vacca' या लॅटिन शब्दावरून 'vaccine' (व्हॅसिन) हा शब्द रूढ झाला.

लसीकरणामुळं मिळालेलं यश

गेल्या शतकात अनेक आजारांमुळे होणारी हानी प्रचंड प्रमाणात कमी करण्यात लसीकरणाला यश आलं. गोवरमुळं दर वर्षी सुमारे 26 लाख लोक मृत्युमुखी पडायचे. पण 1960च्या दशकात पहिल्यांदा या आजारासंबंधीच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यावर ही संख्या एकदम कमी झाली.

WHOच्या आकडेवारीनुसार 2000 ते 2017 या वर्षांमध्ये जगभरात गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत 80 टक्क्यांनी घट झाली आणि हे यश लसीकरणामुळे मिळालं.काही दशकांपूर्वी लाखो लोक पोलिओला बळी पडत होते. त्यातून अर्धांगवायू वा मृत्यू हा चिंतेचा विषय बनला होता. आता पोलिओ जवळपास नष्ट झाला आहे.

तरीही लसीकरणाला नकार का?

आधुनिक लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हापासूनच या प्रक्रियेवर शंकाही घेतली जात होती. सुरुवातीला लोकांनी धार्मिक कारणावरुन लसीकरणाबद्दल साशंकता व्यक्त केली होती. लसीकरण अस्वच्छ असतं किंवा त्यातून आपल्या निवडीच्या स्वातंत्र्याला बाधा येते, अशी लोकांची समजूत होती.

प्रतिमा मथळा लसीकरणामुळे रुग्णांची संख्या कमी झाली

ब्रिटनमध्ये 1800च्या दशकात लसीकरणविरोधी गट उदयाला आले. त्यांनी आजाराशी लढा देण्याच्या पर्यायी उपायांचं - उदाहरणार्थ, रुग्णांना अलिप्त ठेवणं- समर्थन करायला सुरुवात केली.

लसीकरणविरोधी ब्रिटिश कार्यकर्ते विल्यम टेब यांच्या भेटीनंतर अमेरिकेत पहिला लसीकरणविरोधी गट १८७० च्या दशकात सुरू झाला. लसीकरणविरोधी चळवळीच्या नजिकच्या इतिहासातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे अँड्र्यू वेकफिल्ड होत.

लंडनस्थित डॉक्टर वेकफिल्ड यांनी १९९८ साली एक अहवाल प्रकाशित केला. ऑटिझम व आंत्र रोग यांचा एमएमआर लसीशी चुकीचा संबंध जोडून त्यांनी हा अहवाल तयार केला होता.

गोवर, गालगुंड व रुबेला किंवा जर्मन गोवर या रोगांपासून बचाव करण्यासाठी लहान मुलांना दिली जाणारी तिहेरी स्वरूपाची एमएमआर ही लस आहे.वेकफिल्ड यांचा शोधनिबंध फोल ठरला आणि युनायटेड किंगडममधील मेडिकल रजिस्टरमधून त्यांना बाहेर काढण्यात आलं, तरीही या दाव्यानंतर लसीकरण करून घेणाऱ्या मुलांच्या संख्येत घट झाली.

केवळ २००४ या एका वर्षामध्ये युनायटेड किंगडममध्ये एमएमआर लस घेणाऱ्या मुलांची संख्या एक लाखाने कमी भरली. त्यामुळे गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली.लसीकरणाच्या मुद्द्याचं अधिकाधिक राजकियकरणही होतं आहे.

इटलीचे गृह मंत्री मत्तेओ सल्विनी यांनी लसीकरणविरोधी गटांच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुराव्याशिवायच लसीकरणाला ऑटिझमशी जोडलं होतं. पण अलीकडे त्यांनी मुलांचं लसीकरण करून घेण्यासंबंधी पालकांना कळकळीचं आवाहनही केलं.लसीकरणासंबंधी केलेल्या एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून असं दिसून आलं, की लसीकरणाबाबतचा एकंदर विश्वास सकारात्मक असला तरी युरोपीय प्रदेशात लसीकरणावर शंका व्यक्त केली जाते. त्यातही फ्रान्समध्ये लसीकरणावर सर्वांत कमी विश्वास दिसून येतो. .यामधील धोके कोणते आहेत?

जितक्या अधिक प्रमाणात लोकसंख्येचं लसीकरण झालं असेल तितका संबंधित रोगाच्या प्रसाराला प्रतिबंध करता येतो. पण रोगप्रतिकारक शक्ती विकसित न झालेल्यांना किंवा लसीकरण न झालेल्यांनाही संरक्षण मिळतं. याला समूहाची रोगप्रतिकारक शक्ती असं म्हटलं जातं. ही शक्ती कोसळली की मोठ्या लोकसंख्येला धोका उत्पन्न होतो.

समूहाची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी किती प्रमाणात लोकांचं लसीकरण गरजेचं असतं, याचा आकडा विविध आजारांनुसार बदलतो. गोवरसाठी ९० टक्क्यांहून अधिक लोकांचं लसीकरण गरजेचं असतं तर पोलिओसाठी ८० टक्क्यांहून कमी लोकांचं लसीकरण अत्यावश्यक ठरतं.गेल्या वर्षी अमेरिकेतील ब्रुकलीन इथल्या एका अतिसनातनी ज्यू समुदायाने लसीकरण व ऑटिझम यांच्यात संबंध असल्याचा खोटा दावा करणारी पत्रकं वाटली होती.अमेरिकेत कित्येक दशकांमधील सर्वांत मोठी गोवरची लागण याच समुदायातील लोकांना अगदी अलीकडे झाली होती.

समाजमाध्यमांवर लसीकरणासंबंधी दिशाभूल करणारी माहिती पसरवली जाते आणि अनेक लोक त्या माहितीला फसत असल्याचा इशारा इंग्लंडमधील सर्वांत ज्येष्ठ डॉक्टरांनी गेल्या वर्षी दिला. लसीकरणासंबंधी खोटी माहिती इंटरनेटवर प्रकाशित करण्यासाठी रशियन प्रोग्रामिंगचा वापर केला जात असल्याचं अमेरिकन संशोधकांना आढळलं आहे.

शिफारस केल्या जाणाऱ्या लसी घेणाऱ्या मुलांचं जागतिक पातळीवरील प्रमाण गेली काही वर्षं ८५ टक्के इतकं कायम राहिलं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. जगभरात दरवर्षी वीस लाख ते तीस लाख मृत्यू रोखण्यासाठी लसीकरणाचा उपयोग होतो, असं डब्ल्यूएचओने स्पष्ट केलं.

नजीकच्या इतिहासात संघर्ष अनुभवलेल्या व अतिशय खराब आरोग्यसेवा व्यवस्था असलेल्या अफगाणिस्तान, अंगोला व डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो यांसारख्या देशांमध्ये रोगप्रतिबंधक शक्तीचा दर सर्वांत कमी आहे आणि हेच लसीकरणासमोरचं एक मोठं आव्हान आहे. पण विकसित देशांमध्येही एखाद्या रोगाने कोणती हानी होते हे लोक विसरून गेले आहेत. हा गंभीर प्रश्न असल्याचं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे.

निर्मिती: रोलंड ह्यूजेस, डेव्हिड ब्राउन, टॉम फ्रांक्वा-विनिंग्टन व सीन विल्मॉट

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)