'डोनाल्ड ट्रंप 2020मध्येही पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हावेत, असं मला वाटतं कारण...'

ट्रंप यांची प्रचार मोहीम Image copyright AFP

2020 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी डोनाल्ड ट्रंप यांनी प्रचाराचा नारळ फोडला.

फ्लोरिडाच्या ओरलँडोमध्ये त्यांनी एका सभेतून प्रचाराला सुरुवात केली.

ते दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी उभे राहतील, हे सगळ्यांना ठाऊक होतंच. त्यामुळे या प्रचार मोहिमेच्या उद्घाटन रॅलीमध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं.

जानेवारी, 2017पासूनच ते महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये प्रचार सभांसारखेच कार्यक्रम घेत होते.

फ्लोरिडा सर्वांत मोठा मतदारसंघ आहे आणि 2020 च्या निवडणुकीत तिथून विजय मिळवणं होणाऱ्या राष्ट्राध्यक्षांसाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच त्यांनी येथे सभा घेतली.

ट्रंप यांच्या प्रचार सभेची खास शैली आहे. यात ते बरेचदा सभेला आलेल्या समर्थकांना भाषणात सहभागी करून घेतात. ट्रंप काही वाक्य फेकतात आणि त्याला समर्थक कसा प्रतिसाद देतात, ते बघतात. या सभेत ट्रंप यांच्या 78 मिनिटांच्या भाषणाला उपस्थितांनी दिलेल्या प्रतिसादावरून ट्रंप कोणत्या मुद्द्यांवर भर देतील, याबद्दल एक अंदाज आला.

आपल्या भाषणात ते म्हणाले, "कदाचित ही देशाच्या इतिहासातली सर्वोत्तम अर्थव्यवस्था आहे". आपल्या भाषणात त्यांनी शिथिल झालेले निर्बंध, सैन्य खर्चात वाढ, कर सुधारणा, व्यापारविषयक वाटाघाटी, सीमा सुरक्षा आणि न्यायालयीन नियुक्त्या यासारखे मुद्दे मांडले.

समर्थकांना काय वाटतं?

फ्लोरिडामधल्या मेरिट आयलंड येथे राहणाऱ्या रॉबर्ट अॅडमसन या विमा एजंटने ट्रंप यांनी केलेल्या कामाची यादी सांगितली, " अमेरिकेत उत्पादन क्षेत्रात रोजगार मिळतोय, आपला स्टील उद्योग परत येतोय, अमेरिकन नागरिकाचं सरासरी उत्पन्न वाढत आहे, अमेरिकन नागरिक पुन्हा आपल्या घरी परतू लागलेत. ही खूप चांगली गोष्ट आहे."

Image copyright Reuters

अशा कार्यक्रमावेळी ट्रंप आपल्या कामगिरीबाबत उघड चर्चा करू शकतात असं अॅडमसन यांना वाटतं.

मला वाटतं की लोकांना ते आपले वाटतात. सामान्य लोकांत आणि त्यांच्यात साधर्म्य आहे, असं पॉल बारका यांना वाटतं. त्या एका कॉलेजमध्ये नोकरी करतात. पुढे त्या सांगतात, "ट्रंप हे एखाद्या मुरलेल्या राजकारण्यासारखं बोलत नाहीत. म्हणून कधीकधी त्यांचं बोलणं हे रांगडं किंवा उद्धटपणाचं वाटत असलं तरी काही फरक पडत नाही."

'आणखी एक टर्म फर्स्ट लेडी राहण्यास उत्सुक'

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मसाठीच्या निवडणूक प्रचार मोहिमेची औपचारिक सुरुवात केली.

Image copyright Pool/getty

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी फ्लोरिडामध्ये रॅली करत हे आपलं दुसरं घर असल्याचं म्हटलं. यावेळीदेखील त्यांच्या निवडणूक प्रचारात बेकायदा स्थलांतरितांचा मुद्दा महत्त्वाचा आहे.

त्यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या सदस्यांना लक्ष्य करत ते 'तुमच्या देशाचे तुकडे करण्याचा' प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

निवडणूकपूर्व चाचण्यांमध्ये ट्रंप काही डेमोक्रेटिक प्रतिस्पर्ध्यांच्या मागे असल्याचं दिसतंय.

फ्लोरिडामधल्या सभेत ट्रंप त्यांच्या पत्नी मेलानियासोबत व्यासपीठावर आले. आणखी सहा वर्षं अमेरिकेची फर्स्ट लेडी होण्यासाठी आपण 'उत्सुक' असल्याचं त्या म्हणाल्या.

यावेळी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स आणि मावळत्या प्रेस सेक्रेटरी सारा सँडर्स यांचीही भाषणं झाली.

'मेक अमेरिका ग्रेट अगेन'

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप म्हणाले, "अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठीच्या प्रचार मोहिमेची अधिकृत सुरुवात करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. मी तुम्हाला वचन देतो की मी कधीच तुमचा हिरमोड करणार नाही."

Image copyright Getty Images

फ्लोरिडा हा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि 2016च्या निवडणुकीत ट्रंप इथून अत्यंत कमी फरकाने जिंकले होते.

आपल्या जुन्या घोषणेत थोडाफार बदल करत मंगळवारी रात्री ओरलँडोमध्ये घेतलेल्या सभेत ट्रंप म्हणाले, "आपण अमेरिकेला पुन्हा महान बनवणार आहोत."

काही समर्थकांमध्ये इतका उत्साह होता की ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना बघण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी येऊन थांबले होते.

दरम्यान, ट्रंप यांच्या रॅलीचा विरोध करण्यासाठी जवळच निषेध आंदोलनही करण्यात आलं.

'स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता दाखवणार'

ट्रंप यांनी जवळपास 80 मिनीट भाषण केलं. यात त्यांनी 2016च्याच घोषणांचाच पुनरुच्चार केला.

या भाषणात त्यांनी बेकायदा स्थलांतरितांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. याच्या एकदिवस आधीच ट्रंप यांनी US Immigration and Customs Enforcement (ICE) विभाग लवकरच 'लाखो बेकायदा स्थलांतरितांना' बाहेरचा रस्ता दाखवण्याचं काम सुरू करणार असल्याचं ट्वीट केलं होतं.

फ्लोरिडामधल्या आपल्या समर्थकांना संबोधित करताना ट्रंप म्हणाले, "आपला देश कायदा पाळणाऱ्या नागरिकांचा देश असावा, असं आम्हाला वाटतं. गुन्हेगारांचा नाही."

इतकंच नाही तर आपला मतांचा आधार भक्कम व्हावा, यासाठी बेकायदा स्थलांतरितांना कायदेशीर मान्यता देण्याचा डेमोक्रेटिक पक्षाच्या सदस्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, "त्यांना आपला देश उद्ध्वस्त करायची इच्छा आहे."

आपल्या विरोधकांचा "रॅडिकल लेफ्ट-विंग मॉब" म्हणजेच कट्टर डाव्या-विचारांचा जमाव असा उल्लेख त्यांनी केला. ते अमेरिकेत समाजवाद आणतील, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

समोर उपस्थित जमावाला उद्देशून ट्रंप म्हणाले, "2020च्या निवडणुकीत कुठल्याही डेमोक्रेटिक उमेदवाराला मत म्हणजे रॅडिकल समाजवादाचा उदय आणि अमेरिकेच्या स्वप्नाला तिलांजली."

Image copyright Getty Images

त्यांनी सुधारलेल्या अर्थव्यवस्थेचं कौतुक केलं आणि 2016च्या निवडणुकीदरम्यान आपली प्रचार मोहीम आणि रशिया यांच्या संगनमताच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मुलर चौकशी समितीवर टीका केली. तसंच या प्रकरणाच्या मीडिया कव्हरेजला त्यांनी फेक न्यूज म्हटलं.

डेमोक्रेटिक पक्षाच्या सदस्य हिलरी क्लिंटन 2020च्या स्पर्धेत नाहीत. तरीदेखील राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी आपल्या समर्थकांना हिलरी यांच्याविरोधात 'लॉक हर अप' (तिला तुरुंगात डांबा), अशा घोषणा द्यायला लावल्या.

डेमोक्रेटिक प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांनी ट्रंप यांच्या प्रचार मोहिमेच्या उद्घाटनाविषयी ट्वीट करत लिहिलं, "ट्रंप वेगळ्याच विश्वात जगत आहेत."

ते म्हणाले, "या राष्ट्राच्या आधुनिक इतिहासातल्या सर्वांत वाईट राष्ट्राध्यक्षाला पराभूत करणे, हे आपलं सर्वांत महत्त्वाचं काम आहे."

ट्रंप यांच्या भाषणाआधी काय झाले?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या रॅलीआधी त्यांच्या हजारो समर्थकांनी सभास्थळी गर्दी केली होती. ओरलँडोच्या अॅमवे सेंटरमध्ये अनेक जण सोमवारी सकाळपासूनच आले होते.

स्वतः ट्रंप यांनी रॅलीच्या दोन दिवस आधी हजारो समर्थक येतील, असं जाहीर केलं होतं.

Image copyright Getty Images

CBS न्यूजच्या वृत्तानुसार उपस्थित असलेल्या अनेक मतदारांनी अर्थव्यवस्था आणि बेकायदा स्थलांतरित हे त्यांच्यादृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचे मुद्दे असल्याचं सांगितलं.

ट्रम्प यांच्या विरोधात निषेध आंदोलनही झालं. GoFundMe या मोहिमेदरम्यान बेबी ट्रंपला आणण्यात आलं होतं. त्या बेबी ट्रम्पचे फुगे विरोध प्रदर्शन करणाऱ्यांनी आंदोलनादरम्यान आणले होते. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या नुकत्याच झालेल्या लंडन दौऱ्यादरम्यान या बेबी ट्रंपचं चित्र असलेले फुगे उडवण्यात आले होते.

या रॅलीनंतर सोशल मीडियावर काही व्हिडियो व्हायरल होत आहेत. या व्हिडियोमध्ये 'प्राउड बॉईज' या कडव्या उजव्या विचारसरणी असलेल्या संघटनेचे काही सदस्य ट्रंप विरोधी निदर्शनं करणाऱ्यांना धक्काबुक्की करत आहेत आणि पोलीस त्यांना अडवत असल्याचं दिसतंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)