रवांडा : 'आईवर झालेल्या सामूहिक बलात्कारातून मी जन्मलो'

रवांडा

रवांडातला 24 वर्षांचा तरुण बीबीसीला त्याच्या जन्माची कहाणी सांगत होता. रवांडामधल्या नरसंहारादरम्यान त्याच्या आईवर बलात्कार करण्यात आला होता. बलात्कार पीडितांना आजही नामुष्कीचा सामना करावा लागतो, त्यामुळे या सगळ्यांची नावं बदलण्यात आली आहेत.

जीन-पेरे सांगतो प्राथमिक शाळेचा अर्ज भरताना त्यात त्याच्या आई-वडिलांची नावं विचारण्यात आली होती. तेव्हा पहिल्यांदा जीनच्या मनात प्रश्न आला होता, त्याचे वडील आहेत तरी कोण?

तो सांगतो, "मी त्यांना ओळखत नाही, मला त्यांचं नाव माहीत नाही."

वैधानिक इशारा : या लेखातील काही मजकूर वाचकांना अस्वस्थ करणारा वाटू शकतो.

रवांडामध्ये 1994 साली भयंकर नरसंहार झाला होता. त्यात जवळपास 8 लाख लोकांचा मृत्यू झाला. यात अनेक मुलांनी आपले वडील गमावले. त्यामुळे घरी एखाद्याला वडील नसणं, हे तसं सामान्यच होतं.

गावातली लोकं जीन-पेरेविषयी दबक्या आवाजात बोलायचे, त्याला वेगवेगळ्या नावांनी हाक मारायचे. मात्र, या सगळ्यांमागचं सत्य समजण्यासाठी त्याला अनेक वर्षं लागली.

त्याची आई कॅरीन म्हणते, "ही एकदा सांगून टाकण्यासाठी गोष्ट नाही."

"त्याला वेगवेगळी माहिती मिळाली होती. त्याच्या कानावर अनेक अफवा येत होत्या. समाजातल्या सर्वांनाच माझ्यावर बलात्कार झाल्याचं माहिती होतं आणि त्याबाबत मी काहीच करू शकत नव्हते."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रवांडा हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे कपडे एका स्मारकामध्ये ठेवण्यात आले आहेत.

त्या पुढे सांगतात, "माझा मुलगा सतत विचारायचा, माझे वडील कोण आहेत? मात्र, माझ्यावर जवळपास शंभर जणांनी बलात्कार केला होता. त्यामुळे त्याचे वडील कोण, हे मी नेमकं सांगू शकत नव्हते."

'मी पळून जाऊ शकत नव्हते'

1994 सालच्या त्या 100 दिवसांच्या नरसंहारादरम्यान झालेल्या बलात्कारातून किती मुलं जन्माला आली, याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही.

संघर्षादरम्यान होत असलेला लैंगिक हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न संयुक्त राष्ट्रांकडून सुरू आहे. गेल्या वर्षी सीरिया, कोलंबियात, कांगो प्रजासत्ताक आणि म्यानमारमध्ये युद्धादरम्यान बलात्काराचा शस्त्र म्हणून वापर करण्यात आला.

संयुक्त राष्ट्रांच्या 'युद्धादरम्यान लैंगिक हिंसाचारविरोधी दिना'च्या निमित्ताने अनेक पीडित #EndRapeInWar हा हॅशटॅग वापरून त्यांच्यावर झालेला अन्यायाच्या कथा मांडत आहेत.

मात्र, ज्यांच्यावर हा प्रसंग ओढावला त्यांच्यासाठी 25 वर्षांनंतरही ते सगळं आठवणं सोपं नाही. कॅरीनची कहाणी ऐकल्यावर त्यांनी आपल्या मुलाला सत्य सांगण्यासाठी तो मोठा होण्याची वाट का बघितली, हे स्पष्ट होतं.

त्यांच्यावर पहिल्यांदा बलात्कार झाला तेव्हा त्या जवळपास जीनच्याच वयाच्या होत्या. हुतू वंशीय शेजारी, हल्लेखोर आणि जवानांनी हजारो तुत्सी मुलींवर बलात्कार केले होते.

नरसंहार जेमतेम सुरू झाला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला चाकूचे वार करण्यात आले होते आणि त्या जखमा ताज्याच होत्या. या जखमांमुळे त्यांना आजही जेवताना आणि बोलताना त्रास होतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा हत्याकांडानंतर रवांडामध्ये दीर्घकाळ अशांतता, अस्वस्थता होती

कधीकाळी त्यांच्या समाजाचाच भाग असलेल्या हल्लेखोरांनी त्यांना ओढत एका खड्ड्याजवळ आणलं. नुकत्याच एका शाळेत लहान मुलं, स्त्रिया आणि पुरुषांची कत्तल करून त्यांचे मृतदेह ते त्या खड्ड्यात टाकत होते.

कॅरीनच्या चेहऱ्यावर जखमा होत्या, त्यांना असहनीय वेदना होत होत्या. मात्र, तशाही परिस्थिती त्यांना जगायचं होतं. काही वेळानंतर आलेल्या सैनिकांनी झुडपं आणि काठ्यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. कधीही भरून न निघणारी हानी झाली होती. मात्र, तेव्हाही त्यांची जगण्याची उमेद कायम होती.

मात्र, यानंतर काही वेळातच एक जमाव त्यांच्यावर धावून आला. त्यांनी तिच्या संपूर्ण शरीराचे चावे घेतले. त्यावेळी मात्र त्यांनी ठरवलं, आता जगायचं नाही.

"आता मला मरायचं होतं. खूप वेळा मरायचं होतं."

मात्र, कॅरीनची सत्वपरीक्षा आता कुठे सुरू झाली होती. ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्या हॉस्पिटलवर हुतू सैनिकांनी हल्ला चढवला.

त्या सांगतात, "मी पळून जाऊ शकत नव्हते. मी जाऊ शकत नव्हते, कारण सगळंच मोडलं होतं."

"ज्याला माझ्याशी सेक्स करायची इच्छा असेल तो करू शकत होता. एखाद्याला माझ्यावर लघवी करावीशी वाटली तर तो करून जायचा."

Image copyright AFP
प्रतिमा मथळा रवांडा स्मारक

बंडखोर रवांडा राष्ट्रभक्त आघाडीने या हॉस्पिटलची हुतूंच्या कैदेतून सुटका केल्यानंतर कॅरीनवर उपचार होऊ शकले. त्यानंतर त्या गावी परतल्या. कमजोर, असहाय, रक्तबंबाळ मात्र जिवंत.

डॉक्टरांनी सांगितलं की त्या गर्भवती आहे, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.

त्या सांगतात, "माझ्या शरीरात काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे आता काय करायचं, हे मी विचारत होते. काय होईल, याची मी कल्पनाही करू शकत नव्हते."

"मला जेव्हा बाळ झालं, तेव्हा का, हेच मला कळत नव्हतं. हे मुल माझं आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. जे घडलं, त्याचाच सतत विचार करायचे. बाळाला जन्म दिल्यावर त्याच्याविषयी काहीच प्रेम वाटत नसूनही मी त्याला स्वतःजवळ ठेवून घेतलं."

'सोडून दिलेली मुलं'

गेली 25 वर्ष संपूर्ण रवांडामधल्या मुलांना ही किंवा अशाच कहाण्या सांगण्यात आल्या आहेत. मात्र, त्या कधीही उघडपणे सांगितलेल्या नाही.

फाउंडेशन रवांडा प्रोग्रामचं समन्वय करणाऱ्या Survivors Fund (Surf) या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी असलेले सॅम मंडेरेरे सांगतात, "बलात्कार टॅबू आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये बलात्कार करणाऱ्याऐवजी जिच्यावर बलात्कार होतो तिच्यावरच नामुष्की ओढावते." फाउंडेशन रवांडा प्रोग्रामअंतर्गत नरसंहारादरम्यान ज्यांच्यावर बलात्कार झाले, अशा पीडिता आणि त्यांच्या मुलांना शिक्षण आणि मानसिक आधार देण्यात येतो.

ते सांगतात, बलात्काराला कलंक मानला गेल्याने काही प्रकरणांमध्ये कुटुंबीयांनीच आपल्या मुलींना बलात्कारातून झालेल्या बाळाला टाकून द्यायला सांगितलं. तर काही प्रकरणांमध्ये लग्नंही तुटली.

जिथे शक्य झालं तिथे स्त्रियांनी ही बाब लपवून ठेवली. परिणामी अनेक मुलांना जीन-पेरेप्रमाणेच शाळेचा अर्ज भरताना आपला जन्म कसा झाला, याची खरी कहाणी कळली.

"आता समस्या आहे ती नरसंहारानंतर तुमचा जन्म कसा झाला, हे मुलांना कसं सांगायचं, ही. त्यापेक्षा नरसंहारात तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला, हे सांगणं, अधिक सोपं आहे."

"मात्र, मुलं जसजशी मोठी होतात तसे ते अनेक प्रश्न विचारू लागतात आणि त्यामुळे आईला खरं सांगावं लागतं."

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा रवांडामधील घटनेनंतर कोसळून पडलेली महिला

गेल्या काही वर्षांत रवांडा फाउंडेशनने अशा मातांना मुलांना कशाप्रकारे सांगावं, यासाठी बरीच मदत केली आहे. मात्र, तरीही धक्का बसतोच, हे वास्तव असल्याचं सॅमही मान्य करतात.

नव्याने लग्न झालेल्या एका तरुणीने तिच्या नवऱ्यापासून तिच्या वडिलांची हकीगत लपवून ठेवली होती. सत्य सांगितलं तर लग्नावर त्याचा परिणाम होईल, अशी भीती तिच्या मनात होती. या प्रकरणाचं उदाहरण देत सॅम सांगतात, "याचे परिणाम दिर्घकालीन असू शकतात. ते पिढ्यानपिढ्या जाणवू शकतात."

एक आई होती. ती तिच्या मुलीला मारझोड करायची. कारण ती खूप खोडकर होती. ज्या परिस्थितीत तिचा जन्म झाला त्यामुळेच तिचा असा स्वभाव झाला असावा, असं तिच्या आईला वाटायचं.

शिवाय कॅरीनसारख्याही अनेक माता आहेत, ज्यांना त्यांच्या अपत्याविषयी जिव्हाळा नाही. याचे दीर्घकालीन परिणाम काय होतील, हे अजून कळायचं आहे.

मंडेरेरे एक गोष्ट लक्षात आणून देतात, "आपण ज्याची कल्पनाही करू शकत नाही, असेही परिणाम झाले आहेत. तरुण पिढीसमोर त्यांची स्वतःची आव्हानं आहेत आणि त्यांना समाजात स्थान मिळावं, रवांडातल्या इतर कुठल्याही व्यक्तीप्रमाणेच ते देखील आहेत, ही भावना त्यांच्यात यावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत."

'तुटलेले बंध'

जीन-पेरे 19-20 वर्षांचा असताना कॅरीनने त्याला त्याच्या जन्माची संपूर्ण कहाणी सांगितली.

तो म्हणतो, त्याने सत्य स्वीकारलं आहे. मात्र, तरीही आपल्या आयुष्यात वडिलांची कमतरता त्याला जाणवते. विशेष म्हणजे, त्याच्या आईवर हल्ला करणाऱ्याविषयी त्याच्या मनात कटुता नाही आणि आता कॅरीननेही त्यांना माफ करायचा निर्णय घेतला आहे.

त्या सांगतात, "एक गोष्ट जिच्यामुळे मला सर्वांत जास्त धक्का बसला ती म्हणजे त्यांच्याविषयी विचार करणं. तुम्ही माफ करता तेव्हा तुम्हाला बरं वाटतं."

जीन-पेरे म्हणतो, "मला त्यांचा कधीच राग आला नाही. मी कधी-कधी त्यांचा विचार करतो. मला आयुष्यात कधी अडचणी आल्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी मला मदत करायला वडील असते तर बरं झालं असतं, असं वाटतं."

त्याला मेकॅनिक व्हायचं आहे आणि एक दिवस त्याचंही स्वतःचं कुटुंब असेल, अशी आशा त्याला आहे.

त्यांच्याकडे पैशांची चणचण तर कायमच असते. तरीदेखील, तो म्हणतो "माझ्या कुटुंबाला मदत करण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत."

कॅरीनबाबतीत सांगायचं तर त्यांना खूप लवकर समुपदेशनाची मदत मिळाली. त्यामुळे जीन-पेरेबाबत त्यांना आता आत्मीयता वाटते. आई-मुलाचा बंध घट्ट झाला आहे. त्या सांगतात, "हा माझा मुलगा असल्याचं मला वाटतं."

सर्फ संस्थेच्या मदतीने त्यांना एक घर मिळालं आहे. या घराच्या पायऱ्यांवर बसून समोरच्या डोंगराकडे बघताना त्यांच्यातलं प्रेम सहज नजरेत भरतं.

ते गाव जिथे कॅरीनचं बालपण गेलं, ते गाव जिथून कॅरीन पळाल्या होत्या. ते गाव जिथे त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना जीन-पेरेला सोडून द्यायला सांगितलं होतं. ते गाव जिथे लोक जीनला नावं ठेवायची, त्या गावाच्या जवळचं कॅरीन आणि जीन यांचं नवं घर आहे.

मात्र, आता परिस्थिती बरीच सुधारली आहे. कुटुंब आणि गाव दोघांनीही आपल्याला स्वीकारलं आहे, असं त्यांना वाटतं.

त्या सांगतात, "अनेक वर्षं मी धक्क्यात होते. त्या धक्क्यातून आता मी सावरले आहे, हे त्यांना कळलं आणि मी इथे आनंदात आहे."

जीन-पेरेबद्दल सांगायचं तर त्याला त्याची आई आणि तिने जे करून दाखवलं, त्याचा अभिमान आहे. तो म्हणतो, "हे सगळं बघणं खूप कठीण होतं. मात्र, तिने मिळवलेल्या यशाचा मला आनंद आहे."

"जे घडलं त्याला तिने ज्या पद्धतीने स्वीकारलं, ती भविष्याचा ज्या पद्धतीने विचार करते आणि पुढे बघते, त्याचा मला आनंद आहे."

रवांडा नरसंहार

6 एप्रिल 1994 रोजी हुतू जातीचे रवांडाचे अध्यक्ष हॅबियारिमाना यांचा विमान स्फोटात मृत्यू झाला. पुढचे 100 दिवस हुतू कट्टरतावाद्यांनी तुत्सी वंशीय आणि मवाळ हुतू अशा जवळपास 8 लाख लोकांची हत्या केली होती. 4 जुलै 1994 रोजी तुत्सी RPF बंडखोरांनी राजधानी किगालीवर कब्जा मिळवला. 10 लाख हुतूंनी झैरेमध्ये आश्रय घेतला.

आता सूड उगवण्यासाठी हल्ला होईल, अशी भीती कांगो प्रजासत्ताकला सतावतेय. संयुक्त राष्ट्राच्या लवादाने 93 रिंगलीडर्सची नियुक्ती केली आहे. 1 कोटी 20 लाखांहून अधिक आरोपींवर 12,000 कम्युनिटी न्यायालयांमध्ये खटले सुरू आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)