शोएब अख्तरनं सानिया मिर्झाला 'दुर्दैवी बायको' का म्हटलं?

सानिया Image copyright Getty Images

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 16 जूनला भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यापासून टेनिस स्टार सानिया मिर्झावर पाकिस्तानमध्ये टीकेची झोड उठलीये.

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने सानियाला ट्विटरवर असंख्य सल्ले दिल्यानंतर वैतागलेल्या सानियाने तिला ब्लॉक करून टाकलं.

आता या सगळ्या वादात पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरही उतरला आहे. सानिया एक पत्नी म्हणून 'दुर्दैवी' असल्याचं त्याने म्हटलंय.

शोएब अख्तर म्हणाला, "सानिया पत्नी म्हणून दुर्दैवी आहे. तिनं काहीही केलं तरी भारत आणि पाकिस्तानातून तिच्यावर टीका केली जाते. तिला विनाकारण लक्ष्य केलं जातं. जर ती तिच्या नवऱ्यासोबत जेवायला गेलीये आणि त्यांना लहान मूलही आहे, तर त्यात चूक काय आहे?"

शोएबनं आपल्या युट्यूब चॅनलवर म्हटलं आहे, की तिनं एका पाकिस्तानी मुलासोबत लग्न केलं म्हणून भारतात तिच्यावर टीका करण्यात आली. आता पाकिस्तानी टीम क्रिकेट मॅच हरल्याचा दोषही तिलाच दिला जातोय. तुम्ही कोणाच्या कुटुंबाबद्दल असं कसं बोलू शकता? गेले दोन महिने तिला तिच्या नवऱ्याला भेटताही येत नव्हतं. नवरा-बायको एकमेकांना भेटूही शकत नाहीत का?

Image copyright SANIAMIRZA/TWITTER

शोएबनं पुढे म्हटलं आहे, "शोएब मलिकची कामगिरी चांगली होत नसेल तर यामध्ये सानियाचा काय दोष? तो सानियासोबत जेवला म्हणून पाकिस्तानचा पराभव झाला का? कोणाच्या बायकोला असं उगाच वादात ओढलं गेलं, की मला फार वाईट वाटतं. मॅचच्या आधी नवरा त्याच्या बायकोसोबत जेवू शकत नाही का?"

बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबतच्या आपल्या नात्यासंबंधीच्या अफवांवरही पाकिस्तानच्या या माजी जलदगती गोलंदाजानं स्पष्टीकरण दिलं आहे.

शोएब म्हणतो, "मी सोनालीसोबत कधीच नात्यात नव्हतो. मी तिला कधी भेटलोही नाहीये. पण सोनालीच्या फिल्म्स मात्र मी पाहिल्या आहेत. ती खूप सुंदर आहे. पण मी काही तिचा फॅन नव्हतो. ती कॅन्सरला मोठ्या धिटाईने सामोरं गेली आणि जिंकली. त्यानंतर मी तिचा फॅन झालो. तिच्या जिद्दीला मी दाद देतो. "

पाकिस्तानच्या पराभवाविषयी बोलताना शोएब म्हणतो की भारतीय क्रिकेट टीम एक बलाढ्य टीम आहे. चांगलं खेळल्यामुळेच त्यांचा विजय झाला. पण पाकिस्तानी टीमचा कर्णधार मात्र निर्बुद्धपणे वागत असल्याचं दुःख आहे.

Image copyright Getty Images

शोएब अख्तरनं म्हटलं, "पहिल्यांदा बॅटिंग करायची की बॉलिंग हे देखील पाकिस्तानच्या कर्णधाराला ठरवता येत नव्हतं. वर्ल्डकपनंतर आमच्या टीममधून किमान सातजण बाहेर पडतील. हे कुठलं प्लॅनिंग आहे? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नेमकं काय करायचंय? ज्यांनी या खेळाडूंची निवड केली त्यांचाही यात तितकाच दोष आहे. आता यात नवीन मुलांना घेऊन रणनीती आखायला सुरुवात करायला हवी. इंग्लंडची टीम फारशी चांगली नव्हती. पण चांगल्या नियोजनामुळं ते आज आघाडीवर आहेत. कामगिरी पाहून पाकिस्ताननं खेळाडूंना संघाबाहेर काढायला हवं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)