ऋषभ पंत हा सर्वोत्तम बदली खेळाडू? रायुडू-रहाणेंचं काय चुकलं?

ऋषभ पंत, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऋषभ पंत

शिखर धवनच्या हाताच्या बोटांना झालेली दुखापत बरी होण्यास वेळ लागणार असल्याने तो उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही हे बुधवारी स्पष्ट झालं. शिखर स्पर्धेबाहेर गेल्याने विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला.

ऋषभच्या तुलनेत अनुभव आणि कर्तृत्व या दोन्ही आघाड्यांवर अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडू यांची कामगिरी उजवी असतानाही त्यांचा विचार झाला नाही. त्यांचं नेमकं काय चुकलं असावं?

बुधवारी उशिरा आयसीसीच्या टेक्निकल कमिटीने ऋषभच्या समावेशाला मंजुरी दिली. खरंच ऋषभ सर्वोत्तम बदली खेळाडू आहे?

शिखर धवन टीम इंडियाचा सलामीवीर होता. तो विशेषज्ञ बॅट्समन आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये शिखरची कामगिरी वाखाणण्यासारखं आहे. म्हणूनच सेमी फायनल आणि फायनलसाठी तो फिट होईल असं टीम मॅनेजमेंटला वाटत होतं. मात्र स्पेशालिस्ट डॉक्टरांनी शिखरची दुखापत बरी होण्यास वेळ लागेल यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ऋषभच्या समावेशाचा निर्णय जाहीर करण्यात आला.

विशेषज्ञ फलंदाज शिखरच्या ऐवजी टीम इंडियाने ऋषभला संघात संधी दिली आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड झाली तेव्हा चौथ्या स्थानासाठी दिनेश कार्तिक, विजय शंकर आणि ऋषभ पंत यांच्या नावासाठी चुरस होती. दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांनी टीम इंडियात स्थान मिळवलं. लोकेश राहुलला बॅकअप ओपनर म्हणून संधी देण्यात आली.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात शतक झळकावणाऱ्या ऋषभला वगळण्याच्या निर्णयावर जोरदार टीका झाली होती. आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटलसाठी खेळताना ऋषभची कामगिरी चांगली झाली होती. 5 वनडेंचा अनुभव गाठीशी असणाऱ्या ऋषभऐवजी निवडसमितीने दिनेश कार्तिकच्या नावाला पसंती दिली.

2015 वर्ल्ड कप स्पर्धेनंतरची आकडेवारी पाहिली तर टीम इंडियासाठी वनडेत चौथ्या स्थानी सर्वोत्तम कामगिरी अजिंक्य रहाणेची झाली आहे. 19 मॅचेसमध्ये रहाणेने 44.60च्या सरासरीने 669 धावा केल्या आहेत. अंबाती रायुडूने या कालावधीत 20 मॅचेसमध्ये 84.13च्या सरासरीने 594 धावा केल्या आहेत.

2015 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियासाठी चौथ्या क्रमांकावरची आकडेवारी

खेळाडू मॅच धावा अॅव्हरेज शतकं/अर्धशतकं
अजिंक्य रहाणे 19 669 44.60 0/5
अंबाती रायुडू 20 594 45.69 1/4
महेंद्रसिंग धोनी 12 448 40.72 0/3

2015 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियासाठी सलामीला येणाऱ्या खेळाडूंमध्ये अर्थातच रोहित शर्मा आणि शिखर धवन अग्रणी आहेत. तिसऱ्या स्थानी रहाणेचंच नाव आहे.

2015 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियासाठी सलामीवीरांची आकडेवारी

खेळाडू मॅच धावा अॅव्हरेज शतकं/अर्धशतकं
रोहित शर्मा 86 4902 65.36 20/20
शिखर धवन 91 3976 46.23 12/20
अजिंक्य रहाणे 34 1410 42.72 3/11

2015 वर्ल्ड कपनंतर भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी आहे. रोहित शर्मा दुसऱ्या तर शिखर धवन तिसऱ्या स्थानी आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अजिंक्य रहाणे

वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या 15 खेळाडूंच्या बरोबरीने चार खेळाडूंची स्टँडबाय अर्थात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात येते. यामध्ये अंबाती रायुडू, ऋषभ पंत, इशांत शर्मा आणि अक्षर पटेलचा समावेश होता. शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर ऋषभ पंत इंज्युरी कव्हर म्हणून इंग्लंडला रवाना झाला. शिखरची दुखापत वेळेत बरी होणार नाही हे स्पष्ट झाल्यावर ऋषभचा संघात समावेश करण्यात आला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अंबाती रायुडू

ऋषभच्या तुलनेत अंबाती रायुडूची कामगिरी चांगली आहे. रायुडू 2015 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा भाग होता. मात्र तो एकाही सामन्यात खेळला नाही. चार वर्षांत रायुडू टीम इंडियासाठी मधल्या फळीत खेळला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर विकेट टाकण्याच्या सवयीमुळे रायुडूचं नुकसान झालं. वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेत रायुडूला चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

2015 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रायुडूची आकडेवारी

0, 44, 124*, 41, 62*, 41*, बॅटिंग केली नाही, 60, 31*, 13, 12*, 57, 2, 22*, 73, 22, 100, बॅटिंग केली नाही, 0, 24, 13*, 47, 40*, 0, 90, 13, 18, 2

रायुडू निवडसमितीच्या स्कीम ऑफ थिंग्समध्ये तरी होता. म्हणूनच राखीव खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाला. मात्र स्ट्राईक रेट कमी असणं आणि मोठी खेळी करण्यात सातत्याने आलेलं अपयश या मुद्यांसाठी अजिंक्य रहाणेचं नाव बाजूला झालं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अंबाती रायुडू

रहाणे सध्या इंग्लंडमधील काऊंटी संघ हॅम्पशायरसाठी खेळत आहे. हॅम्पशायरसाठी खेळताना त्याने पहिल्याच सामन्यात शतकी खेळी साकारली होती. 2015 वर्ल्ड कपनंतरची रहाणेची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरणात, चेंडू स्विंग होत असताना तंत्रशुद्धतेच्या बाबतीत चोख असणारा फलंदाज संघात असणं आवश्यक आहे. रहाणे 2015 वर्ल्ड कप संघाचा भाग होता. त्याने स्पर्धेत 8 मॅचेसमध्ये 34.66च्या अॅव्हरेजने 208 एवढ्या धावा केल्या होत्या. इंग्लंडमध्ये खेळण्याचा पुरेसा अनुभव त्याच्या नावावर आहे.

रहाणे, रायुडू आणि ऋषभ यांच्या वनडे कामगिरीचा एकत्रित आढावा

खेळाडू मॅचेस धावा अॅव्हरेज शतकं/अर्धशतकं स्ट्राईक रेट
अजिंक्य रहाणे 90 2962 35.26 3/24 78.63
अंबाती रायुडू 55 1694 47.05 3/10 79.04
ऋषभ पंत 5 93 23.25 0/0 130.98

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)