डोनाल्ड ट्रंप यांनी इराणवरचा हल्ला फक्त 10 मिनिटं आधी का थांबवला?

ट्रंप आणि रुहानी Image copyright EPA

इराण आणि अमेरिकेतील तणाव सध्यातरी कमी होताना दिसत नाही. पेट्रोलिंग करणारं अमेरिकेचं एक ड्रोन पाडल्यावरून या तणावात भर पडली आहे.

गुरुवारी इराणने अमेरिकेचे एक स्वयंचलित ड्रोन पाडले होते. हे ड्रोन आपल्या हवाई हद्दीत घुसले होते असा इराणचा दावा आहे मात्र अमेरिकेने हा दावा फेटाळून लावला आहे.

दोन्ही देशांमध्ये आधीच ताव निर्माण झालेला असताना ही नवी घटना घडली आहे.

इराणवर प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यासाठी अमेरिकेने तयारीही केली होती. मात्र हल्ल्याच्या केवळ 10 मिनिटे आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी हा हल्ला रोखला. प्रत्युत्तरादाखल हल्ला करण्यासाठी अमेरिकेने तीन जागांची निवडही करण्यात आली होती. मात्र ट्रंप यांनी आपला निर्णय बदलला.

जर हल्ला केला तर जवळपास दीडशे लोक मरतील असं ट्रंप यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी संभाव्य हल्ला रोखला.

याबाबत त्यांनी ट्वीटही केले आहे., "हल्ला होण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे आधी मी तो रद्द केला."

Image copyright EPA

न्यूयॉर्क टाइम्सने सर्वांत आधी या निर्णयाची माहिती दिली होती. इराणवर हल्ल्याची कारवाई अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच ट्रंप यांनी लष्कराला थांबण्याचा निर्णय दिला असे न्यूयॉर्क टाइम्सने गुरुवारी रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे.

आपल्याला कोणतीही घाई नाही असं ट्रंप यांनी विधान केलं आहे. तसेच सैन्य पूर्णपणे तयार आहे, सैन्य नवं आहे आणि प्रत्येक आव्हानासाठी तयार आहे. हे जगातील सर्वांत चांगलं सैन्य आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

दोन्ही देशांमध्ये गेल्या काही काळापासून तणाव वाढीस लागला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत आपल्या तेलवाहू जहाजावर इराणने हल्ला केल्याचा आरोप अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच केला होता.

तेलवाहू नौकांचं युद्ध सुरू होणार ?

आखातं आणि आखातात धुमसणाऱ्या तेलवाहू नौका आणि अमेरिकन युद्धनौका परिस्थितीमधला तणाव दर्शवतात. एका व्यापक संघर्षमय स्थितीकडे ही स्थिती निर्देश करते.

1989मध्ये इराण आणि अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांच्या तेलवाहू जहाजांवर हल्ला करत होते. मात्र युद्धात सहभागी झालेल्या काही देशांनी आर्थिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न केल्यावर काही काळानंतर दोन्ही पक्षांची काही इतर जहाजंही हल्ल्यांमध्ये सहभागी झाली.

रेनॉल्ड रेगन यांच्यामते, यामध्ये अमेरिकेला सहभागी व्हायचे नव्हते. पण आखातातील स्थिती बिघडली. अमेरिकन युद्धनौका यूएसएस स्टार्कवर इराकी जेटने हल्ला केला यावरून परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.

पण ही एक दुर्घटना होती, ती कोणतीही ठरवून केलेली कृती नव्हती असा इराकी अधिकाऱ्यांनी दावा केला होता.

जुलै 1987 पर्यंत अमेरिकेचा झेंडा लावून कुवैती तेलवाहू जहाजांना अमेरिकन युद्धनौकांनी आखातातून बाहेर काढण्यास मदत केली. कालांतराने दुसऱ्या महायुद्धानंतरचा हा सर्वांत मोठा नौदल ताफा झाला.

तेव्हापासून दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

1979 साली इस्लामिक क्रांती झाल्यावर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी अमेरिकेला 'द ग्रेट सैतान' म्हणत असत.

अशा तेलवाहू नौकांच्या युद्धासाठी इराण-इराक जबाबदार असले तरी हा एक अमेरिका आणि इराणमधील भांडणाचाच एक भाग होता हे लवकरच स्पष्ट झालं.

ही लढाई कधी संपलीच नाही. आता सध्याच्या स्थितीत तणाव वाढला आहे. त्याच होर्मुझ सामुद्रधुनीचा पुन्हा आखाडा झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)