तिच्या शाळेभोवती हत्यारबंद जहालवद्यांचा पहारा असायचा तरीही तिनं शिक्षण पूर्ण केलं

बलुचिस्तानमधील मुली

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातल्या एका गावातील मुलींची शाळा गेली अनेक वर्षे बंद होती. कारण या शाळेभोवती हत्यारबंद लोकांचा पहाराच होता. मुलींनी शाळेत जाऊ नये, म्हणून त्या लोकांनी शाळेभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

मात्र या परिस्थितीला न जुमानता इथल्या एका मुलीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आता पत्रकारितेचं शिक्षण घेत आहे. बीबीसीच्या प्रतिनिधी शुमाइला जाफरी यांना तिनं आपल्या संघर्षाची संपूर्ण कहाणी सांगितली.

नईमा जहरीनं पाकिस्तानमधील क्वेटा इथल्या सरदार बहादुर खान महिला विद्यापीठातून शिक्षण घेतलंय.

ती सांगते, "माझं सगळं बालपण हे भीतीच्या छायेतच गेलं. त्या गोष्टी आठवल्या की अजूनही थरकाप उडतो.

अराजकतेच्या छायेतलं लहानपण

नईमा बलुचिस्तानमधल्या खुजदार जिल्ह्यातल्या एका आदिवासी गावात वाढली. इथं मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या अराजकतेमध्येच ती लहानाची मोठी झाली. अवतीभोवती केवळ शस्त्रं आणि भीतीचं वातावरण होतं.

"बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वांत गरीब प्रांत आहे. फुटीरतावादी आणि पाकिस्तानी लष्करामध्ये प्रदीर्घ काळ सुरू असलेला संघर्ष या प्रांतानं अनुभवलाय. इथल्या पर्वतरांगांमधील दुर्गम गावातलं आयुष्य हे अतिशय कठीण आहे. या वातावरणात महिलांना सर्वाधिक सहन करावं लागतं," नईमा सांगत होती.

माझं आयुष्य गरीबीतच गेलं. आम्ही सात बहीण-भावंडं. आमच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. माझी आई शिकलेली नव्हती. आमच्या छोट्या-छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठीही आम्हाला दुसऱ्यानं केलेल्या मदतीवर, दानावर अवलंबून रहावं लागायचं. अशा परिस्थितीत शिक्षणासाठी खर्च करणं शक्यच नव्हतं."

नईमासाठी शिक्षण घेणं हा एक संघर्षच होता. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत ती गावातल्या सरकारी शाळेतच शिकत होती. पण ही शाळा बंद पडली.

2009 ते 2013 या काळात काही स्थानिक गुंडांनी शाळाच आपल्या ताब्यात घेतली. त्यांना कबायली भागाच्या प्रमुखाचा पाठिंबा होता. मुलींना शाळेत जाता येऊ नये, यासाठी ते प्रवेशद्वारावरच पहारा देत थांबायचे.

त्या दहशतीच्या दिवसांना उजाळा देताना नईमा सांगते, "शाळेसमोर नेहमी सात-आठ लोक हत्यारं घेऊनच उभे असायचे. त्यांचा चेहरा झाकलेला असायचा. मला खूप भीती वाटायची. हे लोक मला गोळी घालतील की काय अशी भीती सतत वाटायची."

मुलींना शाळेत न पाठवण्यासाठी दबाव

हत्यारं घेतलेले हे लोक मुलांना कधी त्रास द्यायचे नाहीत. पण त्यांची दोन उद्दिष्टं होती. एक म्हणजे मुलींना शिक्षणापासून परावृत्त करणं आणि दुसरं म्हणजे शाळेला आपला अड्डा बनवणं.

लोकांनी आपल्या मुलींना शाळेत पाठवू नये, हा त्यांनी दिलेला थेट संदेश होता. गावातल्या लोकांवर याचा खूप परिणाम झाला. अशा वातावरणात सरकारी शिक्षक काम करायलाही तयार व्हायचे नाहीत.

नईमा आणि तिच्यासोबतच्या काही मुलींना जवळच्या गावातील एका शाळेत घालण्यात आलं. मात्र ही केवळ औपचारिकता होती. मुलींना शिकण्यासाठी म्हणून नाही, तर मोफत मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या तेलासाठी शाळेत पाठवलं जायचं. शाळेत मुली उपस्थिती लावायच्या आणि तेल घेऊन घरी जायच्या.

नईमा सांगते, की आमच्या गावातल्या अनेक शाळा केवळ कागदावरच होत्या. अशा शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्तीही व्हायची आणि ते सरकारकडून पगारही घ्यायचे. मात्र सरकारी शाळांची अवस्था अतिशय वाईट होती.

बलुचिस्तानमधील वाढत्या हिंसाचारात नईमाचे दोन काकाही मारले गेले होते. 'ते दोघेही अचानक गायब झाले आणि काही महिन्यांनंतर त्यांचे छिन्नविछिन्न मृतदेहच आम्हाला मिळाले,' नईमा सांगत होती.

"त्यांच्या मृत्यूबद्दल ऐकल्यानंतर मी पूर्णपणे कोलमडून गेले. त्या दोघांचं वयही फार नव्हतं. मी बराच काळ त्यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून स्वतःला सावरू शकले नाही."

कॉलेजची फी भरण्यासाठीही नव्हते पैसे

या प्रसंगांनीच नईमाला शिक्षणासाठी प्रेरणा दिली. माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर मात्र तिला काही काळ शाळा थांबवावी लागली. मात्र तिच्या शिक्षणात त्यामुळे काहीच खंड पडला नाही.

"माझं कुटुंब माझ्या शिक्षणाचा खर्च करू शकत नव्हतं आणि त्यांच्यावर गावकऱ्यांचाही दबाव होता."

नईमा सांगत होती, की जेव्हा मला बलुचिस्तानमधल्या एकमेव महिला महाविद्यालयाबद्दल समजलं तेव्हा मी घरच्यांची मनधरणी करायला लागले.

तिच्या भावांनी कॉलेजची फी दिली नाही, मात्र तिच्या काकांनी एका वर्षाची फी भरली. त्यानंतर नईमानं स्कॉलरशिपसाठी अर्ज केला. त्या जोरावरच तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं.

महिलांसोबत केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दल नईमा म्हणते, "महिलांना शिकण्यासाठी बाहेर पडण्याची परवानगी नाही. मात्र जेव्हा शेतात पुरूषांसोबत काम करण्यासाठी जायचं असतं, तेव्हा काहीच अडचण नसते. त्या घरबसल्या शिवणकाम करून पैसे कमवतात, पण ते खर्च करण्याचा अधिकार मात्र पुरुषांकडे असतो."

नईमानं घरी राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं. हायस्कूलचं शिक्षण संपवल्यानंतर भावांमुळे नईमाचं शिक्षण काही काळासाठी थांबलं होतं. मात्र दोन्ही काकांच्या मृत्यूनंतर तिनं निश्चय केला. माध्यमांमध्ये बलुचिस्तानच्या परिस्थितीवर काहीच बोललं जात नव्हतं, हे तिला जाणवलं.

ती सांगत होती, "बलुचिस्तानमधील लोक काय माणसं नाहीत? आमच्या आयुष्यात काय घडतंय यामुळे कोणालाच काही फरक का नाही पडत? लोक आमच्याबद्दल संवेदनशीलता कधी दाखवणार?"

याच प्रश्नांमुळे नईमा पत्रकारितेकडे वळली.

"आपल्या लोकांच्या व्यथा जगासमोर मांडण्यासाठीच मला पत्रकार व्हायचं आहे. मी कधीच हार मानणार नाही. मी नेहमीच सत्याच्या बाजूनं ठामपणे उभी राहीन."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)