ट्रंप यांना किम जाँग-उन यांची कोरियाच्या सीमेवर का भेट घ्यायची आहे?

डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-ऊन Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-ऊन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-ऊन यांना उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर भेटण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.

उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवरील प्रदेशाला डीमिलिट्राइझ्ड झोन म्हणजे लष्करमुक्त प्रदेश (DMZ) म्हटलं जातं. या प्रदेशाच्या दोन्ही बाजूंना उत्तर आणि दक्षिण कोरियाने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केलं आहे.

जपानमध्ये जी-20 परिषदेत डोनाल्ड ट्रंप सहभागी झाले आहेत. इथून ते दक्षिण कोरियाला जाणार आहेत. ते शनिवारपासून सोलच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतील.

डोनाल्ड ट्रंप यांनी अचानकपणे एक ट्वीट करून किम यांना भेटण्याचा प्रस्ताव दिला आहे.

"चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी माझी भेट झाली आहे, यासहित काही महत्त्वाच्या भेटीनंतर आता मी दक्षिण कोरियाला जात आहे. किम यांना इच्छा असेल, तर ते मला कोरियाच्या सीमेवर भेटू शकतात," असं ट्रंप यांनी लिहिलं आहे.

Image copyright TWITTER

मी शनिवारी सकाळीच किम यांची भेट घेण्याचं ठरवलं, असं स्पष्टीकरण ट्रंप यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं आहे.

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्याबरोबरच्या भोजनाआधी त्यांनी पत्रकारांना सांगितलं की, "जर किम तिथं असतील, तर आम्ही दोघं 2 मिनिटं भेटू शकतो आणि हे ठीक आहे."

या भेटीचा प्रस्ताव देण्यापूर्वी ट्रंप यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.

खराब हवामानामुळे रद्द झालेली भेट

ट्रंप यांनी नोव्हेंबर 2017मध्ये दोन्ही कोरियाला विभक्त करणाऱ्या डीमिलिट्राइझ्ड झोनचा दौरा करण्याचा प्रयत्न केला होता, पण खराब हवामानामुळे त्यांना माघारी यावं लागलं होतं.

ट्रंप आणि किम या दोघांची यंदा फेब्रुवारी महिन्यात हनोई इथे भेट झाली होती. ही भेट अयशस्वी झाली होती, यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांत कटुता आली होती.

उत्तर कोरियानं अण्वस्त्र कार्यक्रम थांबवावा, असं अमेरिकेला वाटतं. तर दुसरीकडे उत्तर कोरियाला आपल्यावरील आर्थिक निर्बंधातून सुटका हवी आहे.

Image copyright Reuters

गेल्या काही महिन्यांत ट्रंप यांनी किम यांच्याविषयी कठोर भाषा वापरली होती.

मागच्याच आठवड्यात त्यांनी स्वतः उत्तर कोरियाच्या नेत्याच्या नावानं एक पत्र पाठवलं होतं. किम यांनी या पत्राचं कौतुक केलं होतं.

"किम यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोरियाकडे अनेक संधी आहेत," असं ट्रंप यांनी या महिन्यातच म्हटलं होतं.

"किम हे समजूतदार व्यक्ती आहे आणि उत्तर कोरियासोबत आम्ही अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणणार आहोत," असं ट्रंप यांनी मे महिन्यात जपान दौऱ्यामध्ये म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)