'क्रिकेटमुळेच मी जिवंत आहे'- अफगाणिस्तानातून थेट इंग्लंडपर्यंत मजल मारणाऱ्या मुर्तझाची कहाणी

मोर्तझा अली Image copyright Oxforfd Mail

मुर्तझा अलीने 14 वर्षांचा असताना अफगाणिस्तानातून पळ काढला. तालिबानने त्याच्या कुटुंबाचा जीव घेतला होता. मजल दरमजल करत तो इंग्लंडला पोचला. तिथे त्याला एक असा माणूस भेटला, जो नंतर त्याचा जणू दुसरा बापच झाला.

ऑक्सफर्डच्या बाहेरच्याच बाजूला असणाऱ्या गावातल्या कमनॉर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष रॉजर मिटी यांनी अलीचं स्वागत केलं आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये घेऊन गेले. तिथे अलीसाठी काही क्रिकेट किट मांडून ठेवले होते.

"त्यानं माझ्याकडे असं काही पाहिलं जणू त्याला लॉटरी लागली असावी. खूप सुंदर क्षण होता तो. त्याला फारसं इंग्लिश बोलता येत नव्हतं, पण त्यावेळी तो खूप आनंदी होता," मिटी सांगतात.

जवळपास एक वर्षापेक्षा जास्त काळ खडतर प्रवास करून अली अखेरीस इंग्लंडमध्ये दाखल झाला होता आणि ऑक्सफर्डमध्ये त्याच्या दूरच्या नातेवाईकासोबत राहत होता. मायदेशी असताना त्याला क्रिकेटचं वेड होतं. तासनतास तो झाडूच्या दांडक्याला बॅटसारखं वापरत खेळायचा. पण इंग्लंडमध्ये त्याला क्रिकेटर म्हणून पुढे यायची संधी मिळाली.

मिटींच्या मनामध्ये हा लाजराबुजरा आणि 'क्रिकेटवेडा' मुलगा घर करून राहिला.

मिटींना स्वतःला तीन मुलं. पण हळूहळू त्यांच्या मनात या तरुण अफगाण मुलाविषयी हळवा कोपरा तयार झाला आणि त्याला ते आपल्या चौथ्या मुलासारखं वागवू लागले. त्यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला, त्याला शिक्षणासाठी मदत केली आणि ख्रिसमसही एकत्र साजरा केला. मिटी कुटुंब आणि कमनॉर क्रिकेट क्लबच्या सदस्यांना हळूहळू हा तरुण अफगाण मुलगा ऑक्सफर्डमध्ये पोहोचला कसा, ते समजलं.

अनिश्चिततेचा विळखा

तालिबानकडून जीवाला धोका असल्यानं अफगाणिस्तानातून लपून बाहेर पडलेल्या अलीला युरोपात डोंगररांगांतून खडतर प्रवास करावा लागला. या प्रवासाच्या एका टप्प्यावर त्याला आजाराने गाठलं आणि उलट्या व्हायला लागल्या. डोंगराच्या एका कडेला त्यानं लोळण घेतलं. त्याच्या सोबत युक्रेनमधील काही स्थलांतरित होतं.

"मरण यावं म्हणून मी याचना करत होतो, कारण मला चालणंच शक्य नव्हतं. पण कुठूनतरी मला बळ मिळालं आणि मी सरपटत राहिलो. माझ्याकडे फक्त अंगावरचा शर्ट आणि जीन्स होती आणि मी बर्फातून प्रवास करत होतो. मला वाटलं आता सारं काही संपलं," तो सांगतो.

Image copyright Roger Mity

"पण अखेरीस मी कॅलेय मधल्या निर्वासित छावणीमध्ये पोचलो. तिथून एका लॉरीमध्ये बसून युकेमध्ये आलो."

"माझा प्रवास मला कुठे घेऊन जातोय हे मला माहित नव्हतं. आता वाटतं त्या थंडीमध्ये मी फक्त एका शर्ट-जीन्सवर कसा राहिलो? मला लोकांविषयी खूप काही कळलं."

"त्याचा अफगाणिस्तानपासूनचा प्रवास विलक्षण होता आणि मला मनापासून वाटलं की त्याची प्रेमाने काळजी घ्यावी, त्याला प्रोत्साहन द्यावं, साथ द्यावी," मिटी सांगतात.

"त्यानं खरंच आमच्या हृदयात घर केलं."

पुढचं दशकभर अली कमनॉरसाठी खेळला. "जगात दुसरीकडे कुठेही असं मैदान शोधून सापडणार नाही, ते मैदान माझ्या मनात घर करून आहे," तो म्हणतो.

टीनएजर अली मोठा झाला. त्याच्या शानदार बॅटिंग आणि भेदक बॉलिंगमुळे तो ऑलराऊंडर म्हणून नावारुपाला आला आणि क्लबच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. त्याची मैदानावरची शैली त्याच्या आयुष्याशी साधर्म्य दाखवणारी होती.

पण अलीसमोर पुन्हा एक संकट आलं. त्याला त्याच्या देशात परत पाठवण्याची ताकीद देण्यात आली.

2002साली तो युकेमध्ये आला तेव्हा त्याला 2 वर्षांचा इमर्जन्सी व्हिसा देण्यात आला होता. पण जसा त्याचा 18वा वाढदिवस जवळ आला तसं त्याला अफगाणिस्तानात परत पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. यासाठी मग मिटी यांनी पुढाकार घेत एक मोहीम सुरू केली आणि कमनॉरमधील सर्वजण यात सहभागी झाले. खासदारांकडे शब्द टाकण्यात आला आणि अलीच्या जीवाला धोका असल्याचे पुरावे अफगाण नेत्यांकडून मिळवण्यात आले.

"हा मुलगा जर परत गेला तर सारं काही संपेल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. मी काळजीत असताना एकदा माझ्या बायकोला एकदा सांगितलं होतं, जर मी या मुलाला वाचवू शकलो नाही, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही." मिटी सांगतात.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीसाठी धडपड करणाऱ्या या गटाला काबूलमधून एक फॅक्स मिळवण्यात यश आलं.

Image copyright Oxorford mail

"त्या जाहीरनाम्यावर अलीच्या गावातल्या ज्येष्ठांनी सह्या केल्या होत्या. त्यामध्ये असं लिहिलं होतं की तो जर कधी परत आला तर नक्कीच मारला जाईल. हा मोठा पुरावा होता" मिटींनी सांगितलं.

अखेरीस अलीला ब्रिटिश सरकारने त्याच्या 'स्वातंत्र्याच्या पासपोर्ट'सोबत पत्र पाठवलं.

दरम्यानच्या या काळामध्ये अली इंग्लिश शिकला. त्याने GCSEची परीक्षा दिली आणि ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी त्याची निवडही झाली.

आता कमनॉर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष असणारे मिटी सांगतात, त्यांना सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे "त्याने कधीही स्वतःला परिस्थितीचा बळी असल्याचं दाखवलं नाही."

"तो अनेकदा मला म्हणायचा की 'हे किती छान आहे की जरी मी दुसऱ्या संस्कृतीमधला, वेगळी पार्श्वभूमी असणारा, धर्माचा आणि जातीचा असलो तरी तुम्ही आणि कमनॉरमधल्या लोकांनी मला इतकं प्रेम आणि पाठिंबा दिला' ".

मिटी सांगतात क्रिकेटमधून अलीला प्रेरणा मिळायची. त्याच्याकडे या खेळाच्या कसबाची नैसर्गिक देणगी होती हे सांगायलाही ते विसरत नाहीत.

ऑक्सफर्ड मार्लेबोन क्रिकेट क्लब युनिव्हर्सिटीमध्ये अलीच्या कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आणि या ऑलराऊंडरची वुस्टरशायर कन्ट्री क्रिकेट क्लब विरुद्धच्या मॅचसाठी एप्रिल 2009मध्ये निवड करण्यात आली. अशाप्रकारे इंग्लंडमध्ये फर्स्ट-क्लास क्रिकेट खेळणारा तो दुसरा अफगाण ठरला. पहिला होता सध्याच्या टीमचा स्टार असणारा महम्मद नबी. तो 2007मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळला होता.

ऑस्ट्रेलियातल्या मेलबोर्नला जाऊन आल्यानंतर 2013मध्ये अलीला तिथल्या क्लब क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली. ही इतकी चांगली संधी सोडणं योग्य नव्हतं.

Image copyright Cumnor cricket club

11 वर्षं इंग्लंडमध्ये घालवल्यानंतर अली त्याचं हे दत्तक कुटुंब कमनॉरमध्ये सोडून ऑस्ट्रेलियात आला. तिथे त्याने त्याच्याच मायदेशातल्या एका मुलीशी लग्नही केलं. आता त्याला दोन मुलं आहेत. त्याने त्याची कहाणी सांगणारं स्टेअरिंग ऍट डेथ नावाचं एक पुस्तकही लिहिलंय.

या 32 वर्षांच्या तरुणाने आता त्याच्या आयुष्याचा बहुतेक काळ अफगाणिस्तानच्या बाहेर काढलेला आहे. पण अजूनही गाझी प्रांतातल्या त्याच्या दाह मुर्दाह गावात परत जाण्याचं त्याचं स्वप्न आहे. पण त्याने तिथे जाणं अजूनही तितकंच धोकादायक असल्याचं त्याला सांगण्यात आलं आहे.

अलीने आता ऑस्ट्रेलियामध्ये स्वतःचं बस्तान मांडलंय. पण तरीही कमनॉरला आपण आपलं घर मानत असल्याचं त्याने सांगितलं.

"रॉजर मला वडिलांसारखा आहे. त्याने माझ्यासाठी जे केलं, ते मी कायम लक्षात ठेवीन," तो म्हणतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)