'डकवर्थ लुईस' : पावसामुळं सामना थांबल्यावर वापरला जाणारा हा नियम आहे तरी काय?

डकवर्थ लुईस Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस हे सांख्यिकीतज्ज्ञ

क्रिकेटच्या मैदानावर पावसाचं आगमन झालं की तीन गृहस्थांची चर्चा होते. बॉलर्सचा कर्दनकाळ ठरणारे बॅट्समन आणि बॅट्समनच्या मनात धडकी भरवणारे बॉलर्स यांच्यापेक्षा एका त्रिकुटाची जगभरातल्या क्रिकेटपटूंना धास्ती वाटते. हे त्रिकुट म्हणजे डकवर्थ लुईस आणि स्टर्न.

क्रिकेटसाठी पाऊस हा अडथळा आहे. फुटबॉल पावसात खेळता येतो. मात्र क्रिकेटचं तसं नाही. क्रिकेटचं स्वरुप आणि नियम पूर्णत: वेगळे असल्यानं पाऊस थांबेपर्यंत खेळ सुरू होत नाही आणि वेळेचा अपव्यय होतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पावसामुळे मैदान निसरडं होतं.

सामना विशिष्ट वेळेत पूर्ण करण्याचं नियमांचं बंधन असल्यानं वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी केलेली उपाययोजना म्हणजे डकवर्थ आणि लुईस प्रणाली.

कोण आहेत डकवर्थ आणि लुईस?

फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस हे सांख्यिकीतज्ज्ञ आहेत. या दोन गणितज्ञांनी पावसाच्या प्रश्नावर काढलेला काढलेला गणितीय तोडगा म्हणजे डकवर्थ-लुईस प्रणाली. 1997 मध्ये झिमाब्वे आणि इंग्लंड यांच्यातील वनडे सामन्यात पहिल्यांदा डकवर्थ-लुईस प्रणालीचा वापर करण्यात आला. त्यानंतर ही प्रणाली वनडे आणि ट्वेन्टी-20 मॅचेससाठी रूढ झाली.

2014 मध्ये प्राध्यापक स्टीफन स्टर्न यांनी या प्रणालीत काही बदल केले. त्यामुळे आता या प्रणालीला डकवर्थ लुईस स्टर्न असं नाव मिळालं.

डकवर्थ लुईस प्रणाली कशी चालते?

सोप्या शब्दांत, शिल्लक राहिलेल्या ओव्हर्स आणि गमावलेल्या विकेट्स यांना डकवर्थ-लुईस प्रणालीत रिसोर्स म्हटलं जातं. जशा ओव्हर कमी होत जातात किंवा विकेट्स पडत जातात तसं रिसोर्सचं प्रमाण कमी होत जातं. दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाला गणितीय कोष्टकाद्वारे तयार झालेलं लक्ष्य देण्यात येतं.

पावसाच्या आगमनाची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक ओव्हरसाठी किती रन्स आवश्यक आहेत यासंदर्भात कोष्टक तयार केलं जातं. हे कोष्टक क्लिष्ट असतं. पावसानं बाधा आणलेल्या मॅचमध्ये प्रत्येक ओव्हरसाठी पार स्कोअर किती? याविषयी हे कोष्टक माहिती देतं. मॅच रेफरींकडून दोन्ही संघांना हे कोष्टक पुरवण्यात येतं. क्रिकेटपटू हे गणितज्ज्ञ किंवा सांख्यिकीतज्ज्ञ नसल्यानं त्यांना हे कोष्टक दिलं जातं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पावसामुळे मैदानाची स्थिती

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं डकवर्थ लुईस स्टर्न प्रणालीचं कोष्टक त्यांच्या वेबसाईटवर दिलं आहे. क्रिकेटचे चाहते या लिंकवर क्लिक करून कोष्टक कसं काम करतं हे समजून घेऊ शकतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पावसामुळे खेळ थांबला तो क्षण

एका उदाहरणाद्वारे हे समजून घेऊया.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 50 ओव्हर्समध्ये 200 धावांची मजल मारली. दुसऱ्या संघाने 40 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 180 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत पावसाचं आगमन झालं. अशावेळी डकवर्थ लुईस स्टर्न प्रणालीचा वापर करण्यात येईल.

पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाने 50 ओव्हर्स वापरले. म्हणजेच त्यांनी ओव्हर्स या रिसोर्सचा पुरेपूर वापर केला. दुसऱ्या संघाकडे डाव सुरू होण्यापूर्वी 100 टक्के रिसोर्स होते. 40 ओव्हर्सनंतर त्यांच्याकडे 10 ओव्हर्स बाकी आहेत आणि त्यांच्याकडे 6 विकेट्स बाकी आहेत. डकवर्थ लुईस स्टर्न कोष्टकानुसार दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाकडे 28.3 टक्के रिसोर्स बाकी आहेत. याचा अर्थ त्यांनी 100-28.3 म्हणजेच त्यांनी 71.7 टक्के रिसोर्सचा वापर केला आहे. दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या तुलनेत कमी टक्के रिसोर्स आहेत. त्यामुळे लक्ष्यात घट करावी लागणार.

पहिल्या टीमने 200 धावा केल्या होत्या. म्हणजे 200*71.7/100=143.4 म्हणजेच दुसऱ्या संघाला जिंकण्यासाठी 143 धावांची आवश्यकता आहे. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाच्या याआधीच 180 धावा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात येईल.

डकवर्थ लुईसआधी काय होतं?

ही प्रणाली अंगीकारण्यापूर्वी रेन रुल नावाचा प्रकार होता. त्यासाठी रन रेट हा आधार मानला जात असे. 1992 वर्ल्ड कपमध्ये याच रेन रूलमुळे दक्षिण आफ्रिकेला एका चेंडूत 22 धावा करण्याचं अशक्यप्राय आव्हान मिळालं आणि या प्रणालीतील त्रुटी स्पष्ट झाल्या. रोगापेक्षा इलाज भयंकर ठरल्याने पर्यायी प्रणालीची आवश्यकता होती. डकवर्थ-लुईस प्रणालीने ही गरज पूर्ण केली.

डकवर्थ लुईसचा गोंधळ

कॅरेबियन बेटांवर झालेल्या 2007 वर्ल्ड कपची फायनल ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेमध्ये झाली होती. पावसामुळे मॅच प्रत्येकी 38 ओव्हर्सची करण्यात आली. ऑस्ट्रेलियाने 38 ओव्हर्समध्ये 281 धावांची मजल मारली. अॅडम गिलख्रिस्टने 149 धावांची तडाखेबंद खेळी केली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेला 36 ओव्हर्समध्ये 269 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. 32व्या ओव्हरवेळी मैदानावर पूर्ण अंधार झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आलं असा समज झाला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 2007 वर्ल्ड कप फायलनवेळचं दृश्य

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सेलिब्रेशन सुरूही केलं. मात्र अंपायर्सनी अंधारात उर्वरित तीन ओव्हर खेळवल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली. डकवर्थ-लुईस प्रणालीमुळे काळ्याकुट्ट अंधारात तीन षटकांचा खेळ झाला आणि ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आलं. ही तीन षटकं का खेळवण्यात आली याचं त्यावेळी आयसीसीने दिलेलं स्पष्टीकरण आकलनापलीकडचं होतं.

2003 वर्ल्ड कपमध्ये प्राथमिक फेरीच्या शेवटच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 270 धावांचे लक्ष्य होते. आफ्रिकेने 45 ओव्हर्समध्ये 229/6 धावा केल्या होत्या. त्यावेळी पावसाचे आगमन झालं. डकवर्थ लुईस प्रणालीनुसार आफ्रिकेची धावसंख्या अपेक्षित धावसंख्येइतकी म्हणजे पार स्कोअर होती. त्यावेळी मॅच टाय म्हणून घोषित करण्यात आली.

डकवर्थ लुईस प्रणालीला पर्याय आहे?

डकवर्थ लुईस प्रणाली 250 धावांनंतरच्या धावसंख्येचा योग्य पद्धतीने विचार करत नाहीत तसंच ही पद्धत क्लिष्ट आहे या विचारातून केरळमधील अभियंता व्ही. जयदेवन यांनी स्वत: एक प्रणाली विकसित केली आहे. भारतालल्या काही स्थानिक सामन्यांमध्ये या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. मात्र बीसीसीआयने औपचारिकदृष्ट्या या प्रणालीचा स्वीकार केलेला नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)