अमेरिका-चीन ट्रेड वॉर: डोनाल्ड ट्रंप यांनी तोफ भारताच्या दिशेने का वळवली?

  • बीबीसी हिंदी टीम
  • नवी दिल्ली

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध तर सुरू आहेच, पण त्यातच आता अमेरिकेने त्यांच्या तोफेचं तोंड भारताकडे वळवलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मंगळवारी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "अमेरिकन उत्पादनांवर भारतात बऱ्याच वेळेपासून मोठा कर आकारला जातोय, आणि हे आता अजून सहन केलं जाणार नाही."

ट्रंप यांनी या ट्वीटद्वारे केवळ चीन नाही तर भारतही त्यांच्या निशाण्यावर असल्याचं स्पष्ट केलं. मात्र ट्रंप यांच्या धोरणांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या वर्षभरापासून तणाव आहे.

ट्रंप यांनी चीनशी व्यापार युद्ध सुरू केलं त्यावेळीदेखील अशाच प्रकारे बाजू मांडली होती. भारताने गेल्या महिन्यात अमेरिकेच्या वस्तूंवर कर लावला. ती खरंतर उत्तरादाखल केलेली कारवाई होती.

भारत अमेरिकेत 5.6 अब्ज डॉलर किंमतीच्या वस्तू कर न भरता विकत असल्याचं म्हणत अमेरिकेने 1 जून रोजी भारताचा व्यापार अनुकूल देशाचा दर्जा काढून टाकला होता.

अमेरिका आणि चीन यांच्यातल्या व्यापार युद्धाकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे. मात्र 2018 सालापासूनच ट्रंप प्रशासनाने भारतासोबतही व्यापारविषयक ताण निर्माण केला आहे. ट्रंप यांनी मार्च 2018 मध्ये स्टील आणि अॅल्युमिनियम यांच्या आयातीवर कर लावण्याची घोषणा केली होती. त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर झाला होता.

पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सच्या एका विश्लेषणानुसार भारताकडून होणाऱ्या 76.1 कोटी डॉलरच्या अॅल्युमिनियम आयातीवर 25% कर लावण्यात आला. तर 38.2 कोटी डॉलरच्या आयातीवर 10% कर लावण्यात आला.

ट्रंप यांनी मार्चमध्ये घेतलेल्या एका निर्णयामुळे भारताला 1974च्या व्यापार कराराअंतर्गत मिळालेली 'व्यापार अनुकूल देश' ही विशेष सवलत रद्द करण्यात आली. भारत अमेरिकन वस्तूंना आपल्या बाजारात समान आणि योग्य संधी देत नसल्याचं कारण त्यावेळी देण्यात आलं होतं.

ट्रंप प्रशासनाने घेतलेला हा निर्णय 1 जूनपासून लागू करण्यात आला. अर्थातच भारतही त्याला प्रत्युत्तर देणार हे निश्चितच होतं. भारतानेही काही विशिष्ट अमेरिकी वस्तूंवर कर लावला. ट्रंप यांच्या निर्णयामुळे भारतातून निर्यात होणाऱ्या 5.6 अब्ज डॉलरचा व्यापारावर परिणाम झाला आहे.

भारताने कर लावून अमेरिकेच्या कृषी उत्पादनाला लक्ष्य केलं आहे. पीटरसन इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये वरिष्ठ संशोधक असलेले चॅड बॉन यांनी न्यूजवीकला सांगितलं, "भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे अमेरिकेतल्या बदाम निर्यातीवर परिणाम झाला आहे. भारत कॅलिफोर्नियाहून 60 कोटी डॉलरचे बदाम आयात करतो. तसंच वॉशिंग्टनहून सफरचंद आयात करतो."

वस्तू व्यापारात भारत अमेरिकेचा 9वा सर्वांत मोठा व्यापार भागीदार आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापारी संघर्ष अधिक पेटला तर त्याचा अमेरिकेच्या हितसंबंधांवरही परिणाम होईल.

गेल्या वर्षी अमेरिकेने भारतात 33.1 अब्ज डॉलरच्या वस्तू निर्यात केल्या होत्या. तर भारतातून 54.4 अब्ज डॉलरच्या वस्तु आयात केल्या होत्या. अर्थातच यामुळे अमेरिकेला 21.3 अब्ज डॉलरचा तोटा झाला.

अमेरिकेने गेल्या वर्षी भारतात 7.9 अब्ज डॉलरचे महागडे धातू आणि खडे निर्यात केले होते. सर्वात महागड्या निर्यात श्रेणीत याचा समावेश होतो. तसंच अमेरिकेने भारतात 6.2 अब्ज डॉलर खनिज इंधनाचीही निर्यात केली होती.

याशिवाय 3 अब्ज डॉलरचे एअरक्राफ्ट उत्पादन आणि 2.2 अब्ज डॉलर किंमतीची मशिनरी निर्यात केली होती. दुसरीकडे गेल्या वर्षी अमेरिकेने 11 अब्ज डॉलरचे महाग धातू आणि खड्यांची आयात केली.

तसंच 6.3 अब्ज डॉलरची वैद्यकीय उत्पादनं, 3.3 अब्ज डॉलर किंमतीच्या मशिनरी, 3.2 अब्ज डॉलरचं खनिज इंधन आणि 2.8 अब्ज डॉलर किंमतीच्या गाड्या भारतातून आयात केल्या होत्या.

स्टील आणि अॅल्युमिनियमवर लावण्यात आलेल्या भरमसाठ कराचा भारतीय आयातीवरही परिणाम झाला आहे. याचा परिणाम इलेक्ट्रिकल वस्तू, मशिनरी आणि केमिकल्सवर झाला. बॉन म्हणतात, "कर वाढल्यामुळे अमेरिकी बाजारात भारतीय वस्तुंची निर्यात अवघड होईल आणि याचा परिणाम अमेरिकेच्या ग्राहकांवर होईल."

भारतासोबतचा हा व्यापार तणाव ट्रंप प्रशासन यापुढे वाढवेल की मर्यादितच ठेवेल, हे अजून स्पष्ट नाही. आंतरराष्ट्रीय व्यापाराला नव्याने आकार देण्याचा ट्रंप यांचा प्रयत्न आहे. या युद्धात अमेरिकेचा विजय होईल, असं त्यांना वाटतंय. ते परराष्ट्र धोरणात कराचा एखाद्या हत्याराप्रमाणे वापर करत आहेत.

दोन्ही देशांमध्ये अधिकृतपणे व्यापारविषयक चर्चा होऊ घातलेली असताना ट्रंप यांनी हे ट्वीट केलं आहे. भारताने अमेरिकेच्या 28 वस्तूंवर 5 जूनपासून कर लावला आहे.

भारताने उचललेल्या या पावलाचा अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेतही विरोध केला आहे. तर भारतानेही अमेरिकेने लावलेल्या अतिरिक्त शुल्काचा मुद्दा जागतिक व्यापार संघटनेत उचलला आहे.

जागतिक व्यापार संघटनेत भारताचे माजी राजदूत राहिलेले जयंत दासगुप्ता यांनी लाईव्ह मिंटला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं की ट्रंप यांनी चर्चेआधी ट्वीट करून दबाव तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रंप यांनी गेल्या महिन्यात मोदींशी केलेल्या चर्चेच्या आधीसुद्धा अशाच प्रकारचं ट्वीट केलं होतं आणि तोच पॅटर्न ते पुढेही राबवत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जून रोजी जपानमधल्या ओसाका शहरात जी-20 बैठकीवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी चर्चा केली होती. या बैठकीआधी ट्रंप यांनी ट्वीट केलं होतं, "मी भारतासोबतचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायला जात आहे. भारत बऱ्याच काळापासून अमेरिकेवर कर आकारत आहे. इतकंच नाही तर या करात नुकतीच वाढ केली आहे. हे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे आणि भारताने तो मागे घ्यावा, याविषयी मी बोलेन."

ट्रंप भारताला 'टॅरिफ किंग' म्हणतात. ते दरवेळी हार्ली डेव्हिडसन बाईकवर भारतात आकरल्या जाणाऱ्या 50% कराचा उल्लेख करतात.

1990च्या दशकापासून भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध सुधारत गेले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून दोन्ही देशांच्या प्रमुखांनी एकमेकांना स्वाभाविक भागीदार मानलं आहे.

भारत आणि रशिया यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भारताला अमेरिकेच्या जवळ जायला बराच काळ लागला. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा अविश्वास वाढला आहे.

एचबी-1 व्हिसा आणि धातू या मुद्द्यांवरून ट्रंप यांनी आधीच भारताला दणका दिला आहे. अमेरिका आणि भारत यांच्या मैत्रीविषयी एक समज आहे. अमेरिका एक अशी शक्ती आहे जिच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे आणि याच कारणामुळे भारत या मैत्रीविषयी अनिच्छुक असतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)