वर्ल्ड कप 2019: धोनीला अंपायर्सची चूक महागात पडली का?

महेंद्र सिंह धोनी Image copyright Getty Images

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत महेंद्रसिंग धोनी मार्टिन गप्तीलच्या अफलातून थ्रोवर रनआऊट झाला आणि टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळल्या.

मात्र धोनी आऊट झाला तो बॉल-नोबॉल असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

41 ते 50 ओव्हर्सदरम्यान तिसरा पॉवरप्ले लागू होतो. यानुसार 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाच खेळाडू असू शकतात. धोनी आऊट झाला त्या बॉलआधी फिल्ड पोझिशन दाखवण्यात आली. त्यावेळी न्यूझीलंडचे सहा खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे असल्याचं दिसतं आहे.

मैदानावरील अंपायर रिचर्ड एलिंगवर्थ आणि रिचर्ड केटलबरो यांच्या हे लक्षात आलं नाही. त्यांच्या लक्षात आलं असतं तर बॉल टाकण्याआधी न्यूझीलंडचं फिल्ड प्लेसिंग बदललं असतं. धोनीनं कदाचित त्या ठिकाणी फटका मारला नसता.

Image copyright Getty Images

बॉल टाकल्यानंतर ही गोष्ट अंपायर्सच्या लक्षात आली असती तर त्यांनी नोबॉल दिला असता. नोबॉल दिल्यानंतर फ्री हिट लागू झाली असती आणि धोनीनं धोका पत्करून दुसरी धाव घेतली नसती.

मात्र नोबॉल दिलेल्या चेंडूवर बॅट्समन रन आऊट होऊ शकतो या नियमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

न्यूझीलंडनं दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची अवस्था 5/3, 25/4 अशी झाली होती. मात्र रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. जडेजा बाद झाल्यानंतरही धोनी जिंकून देईल अशी खात्री चाहत्यांना होती मात्र गप्तीलच्या थ्रोवर धोनी रनआऊट झाला आणि मॅचचं पारडं फिरलं.

धोनी आऊट झाला त्यावेळी सहा प्लेयर्स 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असल्यानं सोशल मीडियावर उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

थर्ड अंपायरची चूक?

तिसऱ्या पॉवरप्लेनुसार पाच प्लेयर्स 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असू शकतात. धोनी रनआऊट झाला त्यावेळी पाचपेक्षा जास्त प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते तर अंपायर्सनी नोबॉल द्यायला हवा होता. मैदानावरच्या अंपायर्सना बरीच व्यवधानं असतात. अशा वेळी थर्ड अंपायरने सूचित करायला हवं होतं, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार शरद कद्रेकर यांना वाटतं.

नोबॉलवर रनआऊट होऊ शकतं हे खरं पण बॉल नोबॉल दिल्यानंतर धोनीने कदाचित दुसरी धाव घेतली नसती. क्रिकेटमध्ये तंत्रज्ञान आलं आहे. किती प्लेयर कुठे उभे आहेत हे टिपून मैदानावरच्या अंपायर्सना सांगता आलं असतं. एरव्ही बारीकसारीक कारणांसाठी तंत्रज्ञान वापरलं जातं पण याबाबतीत वापरलं गेलं नाही, कद्रेकर पुढे सांगतात.

या त्रुटी टाळण्यासारख्या आहेत. धोनीचा रनआऊट किती निर्णायक होता हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. महत्त्वाच्या मॅचेसमध्ये असा फटका कोणत्याही टीमला बसणं नुकसान पोहोचवणारं आहे, असं कद्रेकर यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)