डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या 'चारचौघी'

खासदार Image copyright Getty Images

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रविवारी अमेरिकेतल्या चार महिला खासदारांवर टीका केली.

वेगवेगळ्या वंशाच्या या खासदारांनी 'आपल्या आपल्या भ्रष्ट आणि गुन्हेगारीने पछाडलेल्या देशांमध्ये' परत जावं अशा आशयाचं ट्वीट ट्रंप यांनी केलं. गंमत म्हणजे या चारही महिला खासदार अमेरिकेच्या नागरिक आहेत, आणि लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आहेत.

यावरून चांगलाच गदारोळ माजला. ट्रंप वंशभेदी आहेत, वर्णभेदी आहेत असा आरोपही त्यांच्यावर झाला. तसंच इतर देशांच्या नागरिकांच्या प्रति भेदभाव करत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. ट्रंप यांनी या सर्व आरोपांचा इन्कार केला.

हा वाद शमत नाही तोच या महिला अमेरिकाविरोधी आहेत असं म्हणत ट्रंप यांनी वादात भर घातली. जर तुमचं अमेरिकेच्या शत्रूंवर प्रेम असेल तर निघून गेलात तरी हरकत नाही असं ते म्हणाले. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, "जर तुम्ही कायम तक्रारच करत राहिलात तर इथून निघून जा."

रविवारी काय झालं?

रविवारी केलेल्या ट्वीटसमध्ये ट्रंप यांनी काही महिला खासदार सरकारवर आणि अमेरिकेवर टीका करत असल्याचा आरोप केला.

त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख अलेक्झांड्रिया ओकासियो कोरटेज, रशीदा तलीब, इयाना प्रेस्ली आणि इल्हान ओमर या महिला खासदारांकडे होता. त्यापूर्वी अमेरिकेच्या संसदेच्या सभापती नॅन्सी पलोसी यांच्याशी त्या महिला खासदारांशी वाद झाला होता. मात्र ट्रंप यांच्या ट्वीट्स नंतर पलोसीच आता या खासदारांच्या पाठीशी उभ्या आहेत.

त्या ट्वीट्स मध्ये ट्रंप म्हणतात, "डेमोक्रॅट पक्षाच्या प्रगतिशील खासदारांना पाहून बरं वाटतंय. मात्र या खासदार ज्या देशाचं प्रतिनिधित्व करतात, त्या देशातल्या सरकारची परिस्थिती भीषण आहे. ते जगातील सगळ्यात भ्रष्ट देश आहेत.

"हीच लोकं आता अमेरिकेच्या लोकांना आज सरकार कसं चालवावं हे सांगत आहेत. मग आपल्या देशात जाऊन तिथे सुधारणा का करत नाही? तिथून आल्यावर मग आम्हाला सांगा सरकार कसं चालवायचं. तिथे तुमची जास्त गरज आहे. तुम्हाला हवं असेल नॅन्सी पालोसी तुमची जाण्याची सोय लगेच करतील."

महिला खासदारांनी केला निषेध

या वक्तव्यांचा खासदारांनी चांगलाच समाचार घेतला. या चौघींनीही काल एक पत्रकार परिषद घेतली. ट्रंप यांच्या जाळ्यात ओढले जाऊ नका असंही त्यांनी अमेरिकन नागरिकांना सांगितलं.

या चौघींच्या गटाला The Squad म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या मते राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यापेक्षा त्यांच्या धोरणांकडे जास्त लक्ष द्यायला हवं. आरोग्य, हिंसाचाराला आळा, तसेच मेक्सिको सीमेवरील स्थलांतरितांकडे लक्ष द्यायला हवं अशी त्यांची मागणी आहे.

"ट्रंप प्रशासनाच्या भ्रष्ट संस्कृतीपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. आमची तोंडं बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. " असं प्रेसली म्हणतात. आमचा गट खूप मोठा आहे असं त्या पुढे म्हणतात.

Image copyright AFP/Getty

तर ओमर आणि तालिब यांनी राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग आणावा अशी मागणी केली.

"इतिहासाचं लक्ष आमच्याकडे लागून आहे." असं ओमर म्हणतात. वेगवेगळ्या वंशांच्या चार खासदारांवर टीका हा श्वेतवर्णीय राष्ट्रवादी लोकांचा कट आहे आणि त्यामुळे देश विभागला जाणार आहे .आम्हाला बिगर अमेरिकी म्हणणं म्हणजे दुटप्पीपणा आहे असं त्या पुढे म्हणाल्या.

तालिब यांच्या मते ट्रंप वर्णभेदी असून ते इतर वंशाच्या लोकांचा, तसंच इतर देशांमधून येऊन अमेरिकेत स्थायिक झालेल्या लोकांचा कायमच द्वेष करतात. ट्रंप यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत असं त्या म्हणाल्या.

आम्ही ज्या देशावर प्रेम करतो तो आम्ही असा सोडणार नाही. दुर्बल मनाचे लोक देशाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि धोरणाबद्दल चर्चा करायला कचरतात. असं ओकाशिओ कॉर्टेझ म्हणल्या.

सर्वत्र निषेध

ट्रंप यांच्या या वक्तव्यावर सगळीकडून टीकेची झोड उठली आहे. अमेरिकेच्या संसदेच्या सभापती नॅन्सी पालोसी यांनी ट्वीटरवरून ट्रंप यांच्यावर टीका केली. ट्रंप यांचं वक्तव्य म्हणजे परकीयांचा तिरस्कार करणारे असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच संसदेत निषेधाचा प्रस्ताव आणणार असल्याचं म्हटलं. त्यावर चर्चा कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनीही ट्रंप यांच्या वक्तव्यावर नापसंती दर्शवली. "कॅनडात आम्ही असं काहीही करत नाही. अशा वक्तव्याबाबत मला काय वाटतं हे कॅनडाच्या लोकांना चांगलंच माहिती आहे," असं ते म्हणाले.

Image copyright Reuters

इंग्लंडच्या मावळत्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीही ट्रंप यांच्या वक्तव्यावर टीका केली. त्यांच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या प्रतिक्रियेत ही वक्तव्यं स्वीकारार्ह नाहीत असं थेरेसा मे म्हणल्या आहेत.

सोमवारी काही रिपब्लिकन नेत्यांनी राष्ट्राध्यक्षांवर टीका केली. सिनेटर सुसान कॉलिन्स यांनी सांगितलं की ट्रंप यांनी अतिरेक केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)