स्वतःच्याच मुलांचा खून करायला का उद्युक्त होतात माता?

प्रतीकात्मक चित्र

रशियामध्ये दरवर्षी अनेक महिलांवर स्वतःच्याच मुलाचा खून केल्याच्या आरोपाखाली खटले दाखल होत आहेत. या आरोपींमध्ये गृहिणींपासून अगदी उच्च पदस्थ महिलांचा समावेश आहे.

अर्थातच ही समस्या केवळ रशियापुरती मर्यादित नाहीये. मानसशास्त्रज्ञांच्या मते अमेरिकेमध्येही चार पैकी एका महिलेच्या मनात आपल्या बाळाला ठार करण्याचा विचार आलेला असतो.

इतर अनेक देशांप्रमाणेच रशियामध्येही स्वतःच्या मानसिक आरोग्याविषयी काहीही न बोलता, आपल्या भावनिक संघर्षाला वाट मोकळी करून न देता मुकाट्याने आयुष्य जगत राहण्याची मानसिकता आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये असं दिसून येतं, की पोस्ट-नॅटल डिप्रेशन म्हणजेच बाळंतपणानंतर येणाऱ्या नैराश्येकडे लक्ष दिलं जात नाही किंवा त्यावर वेळेत उपचार केले जात नाहीत. अगदी जवळच्या नातेवाईकांनादेखील नेमकं काय घडतंय हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

मातृत्वामुळे येणारा ताण

आई स्वतःच्याच बाळाचा खून का करते, हे जाणून घेण्यासाठी बीबीसी रशियाच्या पत्रकार ओलेसिया गेरासिमेंको आणि स्वेतलाना रेटर यांनी रशियातल्या अनेक महिलांशी बातचीत केली.

Image copyright AFP

या संवादातून त्यांच्या असं लक्षात आलं, की बालहत्येच्या शोकांतिकेतून बाहेर पडायचं असेल तर मातृत्वाविषयचं मिथक झुगारून देण्याची आणि मातृत्वामुळे महिलांवर येणाऱ्या ताणाविषयी असलेला टॅबू तोडण्याची गरज आहे.

अलिओनासोबत काय घडलं?

अलिओना एक अर्थतज्ज्ञ आहेत. पिओटर त्यांचे पती आहे. दोघांचंही वैवाहिक आयुष्य सुखात सुरू होतं. त्यातच पहिल्या बाळाची चाहूल लागल्यावर त्यांना मोठा आनंद झाला.

त्यांनी येणाऱ्या बाळासाठी कपडे, बाबागाडी अशी सगळी खरेदी केली. अलिओना गर्भसंस्कार वर्गांनाही गेल्या. मात्र, बाळंतपणानंतर निर्माण होणाऱ्या मानसिक समस्यांची माहिती त्यांना कोणीही दिली नाही.

बाळाचा जन्म झाला आणि अलिओनाला निद्रानाशाचा त्रास सुरू झाला. तिला हे सगळं सहन होत नव्हतं. त्याचाच परिणाम म्हणून तिला एका मोठ्या मानसिक धक्क्यातून जावं लागलं. त्यानंतर तिनं मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली. त्यांनी दिलेल्या औषधांनी तिला आता थोडा फरक पडला आहे.

पण अलिओनाच्या आयुष्यात नेमकं असं काय घडलं?

एक दिवस पिओटर ऑफिसमधून घरी परतले तेव्हा त्यांना त्यांचं सात महिन्याचं बाळ बाथटबमध्ये मृत अवस्थेत आढळलं आणि अलिओना मॉस्को शहरातल्या एका तळ्याकाठी सापडल्या. बाळाला पाण्याच्या टबात बुडवून ठार केल्यानंतर अलिओनानं एक बॉटल व्होडका पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यांच्यावर सध्या बाळाच्या खुनाचा खटला सुरू आहे. पिओटरवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, ते प्रत्येक सुनावणीला आपल्या बायकोला धीर द्यायला जातात.

कुणीतरी अलिओनाला पोस्ट-नॅटल डिप्रेशनविषयी आधीच सांगितलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं याची खात्री त्यांना पटली आहे.

ते सांगतात, "तिचा उद्देश वाईट नव्हता. ती मानसिकदृष्ट्या खूपच खचली होती. तिला वेळीच योग्य डॉक्टरांचा सल्ला मिळाला असता तर हे घडलंच नसतं. तिने मला डॉक्टरांकडे न्यायला सांगितलं त्याचवेळी मी तिला घेऊन जायला हवं होतं."

रशियातल्या गुन्हेगारीसंबंधीच्या एका अहवालानुसार स्वतःच्या बाळाची हत्या करणाऱ्या 80% महिला डोकेदुखी, निद्रानाश किंवा अनियमित मासिक पाळी यासारख्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे गेल्या होत्या.

या माता खरंच गुन्हेगार आहेत?

आईनं आपल्या मुलाची हत्या करण्याच्या गुन्ह्याला रशियन कायद्यात 'Filicide' म्हणतात.

यासाठी 'Neonaticide' अशी अजून एक संज्ञा वापरली जाते. या शब्दाचा अर्थ अगदी लहान (दोन वर्षांखालच्या) बाळाचा आईच्या हातून झालेला खून असा होतो.

2018 साली रशियात या गुन्ह्याखाली 33 खटले दाखल करण्यात आले होते.

गुन्हेविषयक तज्ज्ञांच्या मते, ही संख्या याहून आठ पट अधिक असण्याची शक्यता आहे. अनेक घटना कोर्टापर्यंत येतच नाही.

फॉरेंसिक सायकिअॅट्रिस्ट (न्यायवैद्यक मानसोपचारतज्ज्ञ) आणि मॉस्कोमधल्या सर्बस्की इन्स्टिट्यूट ऑफ सायकिअॅट्रीमध्ये संशोधक असलेल्या डॉ. मार्गारिटा कॅचेव्हा सांगतात, "प्रत्येक महिन्यात आमच्या महिला वार्डातल्या 20 पैकी 3 किंवा 4 बेडवर आपल्याच मुलाचा खून केलेल्या माता येतात."

बीबीसी रशियाच्या पत्रकारांनी अशा जवळपास 30 महिलांची प्रकरणं तपासली. सर्व वेगवेगळी होती. कुणी अकाउंटंट होती तर कुणी शिक्षिका, कुणी नोकरी नसलेली स्त्री होती तर कुणी सामाजिक कार्यकर्ती, कुणी हॉटेलमध्ये वेटर होती तर कुणी डिझायनर स्कूलमधून पदवी घेतलेली तरुणी, कुणी मोठ्या कुटुंबातली स्त्री होती तर कुणी एखाद्या दुकानाची मालकीण.

आपल्या मुलांचाच खून करणाऱ्या बहुतांश महिलांना जोडीदार, घर, नोकरी आहे आणि त्यांना कसलंही व्यसन नाही.

बाळंतपणानंतर आईमध्ये मानसिक आजार अचानक वाढू शकतो, हे डॉक्टरांना माहीत आहे.

महिलांना रोजच्या आयुष्यात कदाचित लक्षातही येणार नाही, असे काही जुनाट आजार (chronic condition) असू शकतात. मात्र, स्त्रीला सर्वाधिक ताण देणाऱ्या तीन गोष्टींमुळे हे आजार बळावू शकतात. या तीन गोष्टी म्हणजे गर्भधारणा, बाळांतपण किंवा रजोनिवृत्ती म्हणजेच मासिक पाळी बंद होणं.

'कदाचित मी माझ्या बाळाला ठार केलं आहे'

38 वर्षांच्या अॅना शिक्षिका आहेत. त्यांना 18 आणि 10 वर्षांची दोन मुलं आहेत आणि हे सगळेच आपल्या येणाऱ्या बहिणीची आतुरतेने वाट बघत होते.

मात्र, 7 जुलै 2018 रोजी त्यांनी स्वतःच अॅम्ब्युलन्सला फोन करून बोलावलं. बाळंतपणा आधीपासूनच त्यांना खूप त्रास होता आणि बाळंतपणानंतर हा त्रास अधिकच वाढला.

अॅना यांना वाटलं, की त्यांना हा त्रास सहन होणार नाही. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. एक दिवस त्यांचे पती मॉस्कोमध्ये नोकरीला गेले असताना त्यांनी आपण पलंग खरेदी करण्यासाठी जात असल्याचं सांगून दोन्ही मुलांना शेजारी ठेवलं.

मात्र, त्या आपल्या आईच्या थडग्यापाशी गेल्या. दुसऱ्या दिवशी त्या एकट्याच आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन अनवाणी घराबाहेर पडल्या. एका पोलिसानं त्यांना थांबवलं. मात्र आपण कुठे जातोय हे त्या सांगूच शकल्या नाही.

त्यांच्या सासू त्यांना घरी घेऊन गेल्या. तिथेच अॅनाने आपल्या बाळाच्या तोंडावर उशी दाबून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला, हे सिद्ध करण्याचा कोर्ट प्रयत्न करतंय.

7 जुलैला अॅम्ब्युलन्स आल्यावर अॅनाने डॉक्टरांना सांगितलं, "बघा, मला वाटतं मी माझ्या बाळाला ठार केलं आहे."

डॉक्टरांनी कसाबसा बाळाचा जीव वाचवला आणि अॅनाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

त्यांना जुनाट स्क्रिझोफेनिया हा मानसिक आजार असल्याचं निदान झालं.

डॉक्टर कॅचेव्हा सांगतात, "एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की स्क्रिझोफेनिया म्हणजे वेड लागणे नव्हे. मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे जी स्त्री स्वतःच्याच बाळाला ठार करते ती कदाचित अगदी सामान्य आयुष्य जगत आलेली असेल."

"अरे देवा! डॉक्टर, मी हे काय केलं? आता मी कशी जगू?"

21 वर्षांच्या अरिनाने आपल्या तान्ह्या बाळासोबत इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेतली.

बाळाचा जन्म झाला त्यावेळी तिचे पती लष्करी सेवेत होते.

ती जवळपास वर्षभरापासून आई-वडिलांबरोबर राहत होती. आपल्या बाळासोबत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याच्या आदल्या दिवशी तिने पोलिसांना फोन करून आपला नवरा आपल्याला ठार करण्यासाठी चाकूला धार करत असल्याचं सांगितलं होतं.

आई आणि बाळ दोघेही चमत्कारिकरीत्या बचावले. अरिनाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर तिला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं.

मानसोपचारतज्ज्ञांनी तिला स्क्रिझोफेनिया असल्याचं निदान केलं.

स्क्रिझोफेनिया झालेल्या माता आणि नैराश्य आलेल्या माता दोघेही बाळाला ठार करण्यामागे सारखीचं कारणं सांगतात.

उदाहरणार्थ- "हे त्याच्यासाठी योग्यच होतं. मी अतिशय वाईट आई आहे."

"हे जग खूपच वाईट आहे. इथे न राहणंच बाळासाठी योग्य आहे."

डॉ. कॅचेव्हा सांगतात, "गुन्हा केल्यानंतर त्यांना कधीच चैन पडत नाही आणि अशा माता पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रयत्नात स्वतःला ठार करतात."

अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्यात घरातली एखादी व्यक्ती यशस्वी झाली, तर या स्त्रियांना त्यांच्या संस्थेत आणलं जात असल्याचं डॉ. कॅचेव्हा सांगतात.

एकदा उपचार सुरू झाले, की पूर्णपणे बरं होण्यासाठी सहा महिन्यांचा काळ पुरेसा ठरतो.

अमेरिकेप्रमाणे रशियातही अशा मातांना काय शिक्षा करावी, याचा निर्णय कोर्ट घेतं.

मानसोपचारतज्ज्ञांनी आई विक्षिप्त नसल्याचा शेरा दिला तर अशा मातांना कोर्ट कठोर शिक्षाही सुनावू शकतं. अशा बहुतांश स्त्रियांसोबत लहान वयात गैरवर्तन करण्यात आलेलं असतं.

रशियाच्या फॉरेंसिक सायकिअॅट्रिस्टनी केलेल्या एका संशोधनात आढळलं, की आपल्याच तान्ह्या बाळांचा खून करणाऱ्या 80% स्त्रियांचं बालपण गरिबीत गेलेलं असतं आणि यातल्या 85% स्त्रियांच्या वैवाहिक आयुष्यात वाद निर्माण झालेले असतात.

संशोधकांना या आकडेवारीमध्ये थेट संबंध आढळला. खोटं बोलणं, वाद, भांडण, संताप आणि व्यसनाधीनता किशोरवयीन मुलींच्या आयुष्याचा भाग बनतात आणि या मुली प्रौढ झाल्यावर त्यांच्या कुटुंबातही हेच संस्कार नेतात.

आपल्या बाळाप्रती असलेल्या आक्रमकतेचं मूळ जोडप्यामधल्या ताणलेल्या संबंधातही असू शकतं.

डॉ. कॅचेव्हा म्हणतात, "घरगुती हिंसाचाराला बळी पडणं हे अशा गुन्ह्यांमागचं महत्त्वाचं कारण आहे."

त्या पुढे सांगतात, "यातील बहुतांश महिलांचं त्या लहान असताना भावनिक, लैंगिक आणि शारीरिकरित्यादेखील शोषण झालेलं असतं."

आपल्या बाळाचाच खून करणाऱ्या महिलांचं वकीलपत्र घ्यायला अनेक वकील नकार देतात.

"मला वाटलं होतं, हे माझ्याबाबतीत कधीच घडणार नाही"

वेगळ्या गुन्ह्यात शिक्षा झालेली अभिनेत्री मरिना क्लेझचेव्हा सांगते, "स्वतःच्याच मुलाच्या खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांविषयी तुरुंगात गुप्तता पाळली जाते."

"मी त्यांना पहायचे. मात्र, जोपर्यंत त्यांना भेटायला येणाऱा एखादा नातेवाईक सांगत नाही तोपर्यंत इतर कैद्यांना त्या तुरुंगात का आल्या हे माहीत नसतं. तुरुंगात त्या कुणाशीही मैत्री करत नाही. त्या खूप शांत असतात आणि आपल्याच कामात असतात. कारण त्या एखाद्या वादात सामील झाल्या तर इतर कैदी त्यांना अधिकच त्रास देऊ शकतात."

मॉस्कोमध्ये मानसोपचारतज्ज्ञ असलेले याकोव्ह कोचेतोव्ह सांगतात, की खून करण्याचा विचार आपल्या मनात आला हेच या स्त्रिया नाकारतात आणि आपल्या रागाचं खापर इतर कुणावर फोडतात. हा त्यांचा बचावात्मक पवित्रा असतो.

एका मोठया टेलिकम्युनिकेशन कंपनीत कॉर्पोरेट क्लायंट्ससोबत काम करणाऱ्या विशेष अधिकारी तातियाना सांगतात, "मी नेहमीच अशा मातांवर टीका करायचे. मला वाटायचं हे माझ्याबाबतीत कधीच घडणार नाही."

"सेल्स, बिझनेस ट्रिप्स, मित्र-मैत्रिणी सगळं होतं. मला बाळ हवं होतं. मला वाटलं, की बाळासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. मात्र घडलं भलतंच."

"माझं बाळंतपण खूपच कठीण गेलं आणि हॉस्पिटलमधल्या आया खूप कठोर होत्या. नंतर मला बाळ जन्माला येत असताना काय काय घडत होतं, ते आठवू लागलं. विचित्र आणि क्लेशदायी स्वप्न पडू लागली. मनावर काहीतरी मोठं ओझं ठेवल्यासारखं वाटून जाग यायची. माझ्या स्तनांवर सूज आली होती. माझं वजन वाढलं, केस गळायला लागले, अल्सर झाले. या सगळ्यांमुळे मला माझ्या बाळाचा खूप राग येऊ लागला. असं वाटायचं जणू त्याने माझं आयुष्यच हिरावून घेतलं आहे."

बाळ जेव्हा रात्र-रात्र जागायचं किंवा रडायचं तेव्हा तातियानाला रडू कोसळायचं.

त्यांना वाटायचं, "तू आई आहेस ना? मग जे इतर माता करू शकतात ते तुला का जमत नाही?"

"रडण्याचा तो आवाज कानात घण घातल्यासारखा वाटायचा आणि लहानपणापासून सहन कराव्या लागलेल्या त्रासाच्या आठवणी ताज्या व्हायच्या."

त्या पुढे सांगत होत्या, "या सगळ्याला सामोरं जावं लागेल याची मला कल्पना होती. बाळाला झोपवताना मला खूप राग यायचा आणि मी बाळाला गदागदा हलवायचे. तो घाबरायचा आणि आणखी जोरात रडायचा. एकदिवस मी सगळ्या ताकदीनिशी त्याला गादीवर फेकलं आणि जोरात ओरडले - तू मेला असतास तर बरं झालं असतं. आणखीही बरंच वाईट बोलले. त्यानंतर मी मातृत्व उपभोगू शकत नाही, याची मला खूप लाज वाटली आणि अपराधीपणा वाटला."

तातियाना सांगतात त्यांच्या पतीने तू बाळाला मानसिकरित्या अधू करत असल्याचं म्हटलं, "तू आई आहेस ना? इतर स्त्रिया करू शकतात तर तू का नाही? पहिला मुद्दा म्हणजे तू या बाळाला जन्मच का दिला?" अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी तातियानाच्या तक्रारी धुडकावून लावल्या.

अशातच एक वर्ष गेलं आणि परिस्थिती आणखी चिघळली. तातियानाच्या मनात आत्महत्येचाही विचार आला आणि त्यांनी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेण्याचा निर्णय घेतला.

त्या सांगतात, "मला वाटलं माझ्यासारख्या निष्ठूर आणि मूर्ख माता जगण्याच्या पात्रतेच्या नाहीत आणि माझ्या बाळाला माझ्यापेक्षा चांगली आई हवी. या मानसिक वेदना सहन करण्यापेक्षा स्वतःला संपवणं, माझ्यासाठी जास्त सोपं होतं. मी बराच संघर्ष केला होता. मानसोपचारतज्ज्ञांनी लगेच परिस्थिती ओळखून माझ्यावर उपचार केले."

जागरुकता आवश्यक

बालहत्या प्रतिबंधाचा विषय निघतो तेव्हा संततीनियमन आणि पाळणाघर असे सल्ले देण्याकडे आपला कल असतो. मात्र, रशिया आणि पाश्चिमात्य देशातले डॉक्टर मातांमध्ये उद्भवू शकणाऱ्या संभाव्य मानसिक समस्या आणि बाळंतपणानंतरचं नैराश्याबद्दलही जागरूक राहण्याचा महत्त्वाचा सल्ला देतात.

मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या मरिना बिलोब्राम सांगतात, "आदर्श परिस्थितीत तुम्ही बाळाच्या जन्माआधी सर्व संभाव्य परिस्थितीचा, स्वतःच्या आईसोबत असलेल्या नात्याचा, स्वतःबद्दल आणि स्वतःच्या जोडीदाराविषयी आपल्याला काय वाटतं याचा आणि बाळाच्या जन्मानंतर या सर्वांचा तुमच्यावर कसा परिणाम होईल याचाही विचार कराल."

त्या पुढे सांगतात, "गोंडस बाळासोबत हसतमुख आई असलेल्या पोस्टर्ससोबतच विरुद्ध परिस्थिती काय असू शकेल याची कल्पना देणारी पोस्टरही लावली पाहिजे."

डॉ मार्गारिटा कॅचेव्हा सांगतात, "मॉस्को आणि इतर प्रांतातील तणावग्रस्त महिलांसाठी आमची केंद्रं आहेत. घरगुती हिंसाचार सहन केलेल्या आणि नैराश्याचा सामना करणाऱ्या महिलांसाठी ही केंद्रं खुली आहेत. मात्र ही केंद्रं निम्मी रिकामीच आहेत. कारण स्त्रियांना वाटतं आपण गेलो आणि आपल्या समस्यांविषयी बोललो तर आपल्या मुलांना आपल्यापासून दूर केलं जाईल. याच कारणामुळे त्या स्थानिक मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणंही टाळतात. इतकंच नाही तर आपल्यालाच गप्प केलं जाईल, या भीतीमुळे त्या जोडीदार किंवा कुटुंबातल्या इतर कुणालाही याविषयी बोलायचं टाळतात."

(पीडित मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी लेखातील सर्व मातांची नावं बदलण्यात आली आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)