'कारगिल युद्धाबाबत पाकिस्तान सरकार अंधारात होतं'

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
कारगिल युद्धाबद्दल पाकिस्तान आर्मीने नवाज शरिफ यांना का सांगितलं नव्हतं?

कारगिल युद्धाबद्दल पाकिस्तान सरकारही अंधारात होतं आणि तो धोरणात्मक निर्णयही नव्हता.

1999साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या कारगील युद्धाला यंदा 20 वर्षं पूर्ण होतायेत. वीस वर्षांनंतर त्याबद्दल बोलताना तेव्हाच्या नवाझ शरीफ सरकारमध्ये माहितीमंत्री असलेले मुशाहिद हुसेन यांनी बीबीसीला सांगितलं की या कारवाईबद्दल पाकिस्तान सरकारही अंधारात होतं आणि 1965 ची चूक पाकिस्तानने कारगिलमध्येही केली असं त्यांना वाटतं.

बीबीसीच्या प्रतिनिधी शुमाईला जाफरी यांनी मुशाहिद हुसेन यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली.

प्रश्न - पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी लाहोरला आले होते तेव्हा नवाज शरिफ यांना कारगीलमधल्या घडामोडी माहिती नव्हत्या का?

उत्तर - नाही, बिलकूल नाही.

प्रश्न - त्यावेळी तुम्ही माहिती प्रसारण मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते होता. पहिल्यांदा ISPRने (पाकिस्तान आर्मीचा संपर्क विभाग) कारगिलमध्ये लढणारे हे काश्मिरी मुजाहिद्दीन होते, असं सांगितलं. पण प्रत्यक्षात तिथं तर पाकिस्तानी आर्मी होती, हे तुम्हाला कधी समजलं?

उत्तर - ही गोष्ट सार्वजनिक झाली तेव्हा मला पत्रकार परिषदेत बोलायला सांगितलं. पण मी एकटा बोलणार नाही, असं सांगितलं. ISPRचे डायरेक्टर जनरल ब्रिगेडियर राशिद माझ्या उजवीकडे बसतील आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माझ्या उजवीकडं बसतील, असं मी म्हटलं. तेव्हा "पाकिस्तान आर्मीचे लोक यात सामील होते, हे तुम्हाला माहिती आहे का?" असं ISPRचे डायरेक्टर जनरल यांनी मला विचारलं. तेव्हाच याविषयी मला कळलं.

प्रश्न - म्हणजे पाकिस्तानी आर्मी तिथं होती हे तुम्हाला तेव्हा कळलं?

उत्तर - होय, Northern Light Infantry तिथं होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नवाझ शरीफ सरकारमध्ये माहितीमंत्री असलेले मुशाहिद हुसेन

प्रश्न - ही मे 1999ची गोष्ट आहे ना?

उत्तर - हो, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानी आर्मीचे जवान असल्याचं स्पष्ट झालं.

प्रश्न - या युद्धाच्यावेळी अण्वस्त्रांची तयारी केली होती का?

उत्तर - बिलकूल नाही. अण्वस्त्राचा मुद्दा समोर आलाच नाही. त्याचा विचाराही केला नव्हता. युद्धाची जाहीर घोषणाही झाली नव्हती. त्यावेळी सीमेवर चकमकी होत होत्या. दोन्ही देशांनी अण्वस्त्राचा विचारही केला नव्हता असं मला वाटतं.

प्रश्न - जनरल मुशर्फ म्हणाले की कारगिल युद्ध आर्मीने जिंकलं. पण राजकीय नेतृत्वाला त्याचं भांडवल करता आलं नाही. नेतृत्व दुर्बळ असल्यामुळे जिंकलेल्या युद्धात पराजय झाल्यासारखं झालं का?

उत्तर - मी या मताशी सहमत नाही. मला वाटतं, 1965ची चूक आपण परत एकदा केली. आपल्याकडं संस्थात्मक निर्णय प्रक्रिया नाहीये.

प्रश्न - कारगिलनंतर पाकिस्तानच्या काश्मीरवरच्या भूमिकेला धक्का पोहोचला का?

उत्तर - होय, सशस्त्र गटाच्या कारवायानंतर काश्मीरचा मुद्दा पुढं आला होता. त्यावेळी भारत आणि अमेरिका एकत्र आले. तेव्हापासून ते एकमेकांच्या जवळ आले आहेत. आम्ही खूप लोक गमावले. आम्ही प्लॅन करण्यात अपयशी ठरलो. उंचावर लढणाऱ्यांना योग्यवेळी रसद पोहोचवता आली नाही. भारताने त्याबदल्यात एअर फोर्स बोलावली, बोफोर्सच्या तोफा आणल्या. आमचे आडाखे चुकीचे होते.17 मे (1999) नंतर मी एका वरिष्ठ मिलिटरी ऑफिसरला भेटलो. त्यांनी मी नक्की काय परिस्थिती आहे हे विचारलं. ते म्हणाले, एकतर कोर्ट मार्शल होईल नाही तर मार्शल लॉ लागू केला जाईल.

Image copyright Getty Images

प्रश्न - ज्या 3-4 जनरलनी कारगिल घडवून आणलं, त्यांच्यावर काही कारवाई झाली का?

उत्तर - नाही. आमच्या देशात जबाबदारी कधीच फिक्स केली जात नाही.

प्रश्न - का नाही?

उत्तर - कारण आमचा समाज नेहमीच भीती आणि दुहेरी मापदंडांमध्ये गुरफटलेला आहे. महत्त्वाची माहिती नेहमीच गुलदस्त्यात ठेवली जाते. आम्ही स्वतःच्या सावलीलासुद्धा घाबरतो.

प्रश्न - शेकडो जणांचा जीव गेले. आंतरराष्ट्रीय दबाव वाढलेला.

उत्तर - पाकिस्तानी नागरिक आणि सैन्याला जीव गमावाला लागला. देशाचं नुकसान झालं.

प्रश्न - आणि तरीही जबाबदारी फिक्स केली नाही...

उत्तर - नाही, तसं कधीच झालं नाही...

प्रश्न - पण राजकीय नेतृत्वाचं हे काम नाहीये का? घटनेच्या 2-3 महिन्यानंतरही पंतप्रधानांनी ठळक चित्र सांगितलं जात नसेल तर त्यांनी चौकशी समिती का बसवली नाही?

उत्तर - त्यांनी (पंतप्रधानांनी) त्या ठिकाणी भेट दिली. पण त्यांनी काही करायच्या आधीच परिस्थिती बदलली. पण कारवाई व्हायला पाहिजे होती.

प्रश्न - भारताकडून एक टेप रिलिज करण्यात आला होता. पाकिस्तानी एअर फोर्स आणि नेव्ही चीफ यांनाही कारगिल प्लॅनिंगविषयी माहिती नव्हती...

उत्तर - आर्मीमध्येच समन्वय नव्हता. आर्मीतले 4-5 वरिष्ठ लोक सोडले तर कॉर्प्स कमांडर यांनाही याची माहिती नव्हती. त्यानंतर नेव्ही आणि एअर फोर्स यांचा संबंध येतो पण त्यांनाही काही कळू दिलं नव्हतं.

प्रश्न - वाजपेयी यांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आर्मी नाराज होती का?

उत्तर - पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (पाकिस्तानला) येण्याआधी एका नामांकित उर्दू वर्तमानपत्रात मोठी बातमी आलेली की आर्मीने वाजपेयी यांचं स्वागत करायला नकार दिला होता. ही स्टोरीही कुणी लीक केली? ती का लीक करण्यात आली? कुणाकडून ती स्टोरी आली? या प्रश्नांची उत्तर कधीच देण्यात आली नाहीत.

प्रश्न - तुमचं यावरचं विश्लेषण काय आहे?

तेव्हा काही लोक खूश नव्हते. पण आता मोदी यांनी पाकिस्तान दौरा केला नाही तरी त्यांनी आमच्याशी बोलावं यासाठी लोटांगण घालत आहेत. ती बातमी हा खोडसाळपणा होता की काय याविषयी मला माहीत नाही. पण आर्मीतले काहीजण नाराज होते आणि त्यांनीच कारगिल घडवून आणलं असावं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)