कुलभूषण जाधव प्रकरणी: ICJच्या निकालामुळे नेमका विजय कुणाचा भारत की पाकिस्तान?

कुलभूषण जाधव पोस्टर Image copyright Getty Images

पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कॉन्स्युलर ऍक्सेस देण्यात येणार असल्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे.

एका प्रसिद्धीपत्रकामार्फत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी हे जाहीर केलं. यानुसार कुलभूषण जाधव यांना कॉन्स्युलर ऍक्सेस देण्यासाठीच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहेत.

नेदरलँड्समधील द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचललं. जाधव यांना ताबडतोब असा कॉन्स्युलर ऍक्सेस देण्यात यावा आणि याविषयीची माहिती जाधव यांना देण्यात यावी, असं या निर्णयात म्हटलं होतं.

जाधव यांना त्यांच्या अधिकारांविषयी माहिती देण्यात आल्याचं पाकिस्तानने या पत्रकात म्हटलं आहे.

कोर्टाच्या निर्णयामुळे विजय कोणाचा?

कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिलेला निर्णय म्हणजे आपला विजय असल्याचं भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश म्हणत आहेत. दोन्ही देशांचा मीडिया आपापले विजयोत्सव साजरा करत आहे.

कुलभूषण सुधीर जाधव यांना मार्च 2016मध्ये पाकिस्तानच्या नैऋत्येकडील बलुचिस्तान प्रांतातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणावरून दोन्ही देशांतला तणाव वाढला होता.

पाकिस्तानातील एका लष्करी कोर्टाने 2017मध्ये जाधव यांना हेरगिरीच्या आरोपामध्ये फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर भारताने याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली.

1.आंतरराष्ट्रीय न्यायायलात दाद मागणं भारताच्या दृष्टीने योग्य

या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का, असा पाकिस्तानचा आक्षेपच आंतरराष्ट्रीय कोर्टाने फेटाळून लावला. भारताच्या बाजूने आलेला हा पहिला निर्णय. कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं, "1963च्या व्हिएन्ना करारानुसार दोन देशांमधल्या वादांवर ICJने दिलेला निर्णय बंधनकारक असेल."

या प्रकरणांतल्या बहुतांश निर्णयांमध्ये 15 न्यायाधीशांनी भारताच्या बाजूने मत दिलं. फक्त पाकिस्तानचे न्यायाधीश जिलानी यांनी प्रत्येक निर्णयाचा विरोध केला.

Image copyright UN PHOTO/ICJ-CIJ/FRANK VAN BEEK

2. 'जाधव यांच्या विरोधातील पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाचा निर्णय व्हिएन्ना कराराचं उल्लंघन'

भारताचं हे म्हणणं योग्य असल्याचं आंतरराष्ट्रीय कोर्टाने म्हटलं. कुलभूषण जाधव यांना इतके दिवस कायदेशीर मदत न देत पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आंतरराष्ट्रीय कोर्टाने मान्य केलं.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं की पाकिस्तानने जाधव यांना कॉन्स्युलर ऍक्सेस देण्याचं नाकारून आणि त्यांना त्यांच्या अधिकारांची माहिती न देऊन व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं आहे.

कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं, "आम्हाला असं वाटतं की कुलभूषण सुधीर जाधव यांना त्यांचे अधिकार देण्यात उशीर करत आणि त्यांना त्याविषयीची माहिती न देत व्हिएन्ना कराराच्या कलम 36, परिच्छेद 1(बी)चं उल्लंघन केलं आहे.

1963मध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हिएन्ना कन्व्हेंशननुसार एखाद्या परदेशी व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या दूतावासाच्या अधिकाऱ्यांना त्याच्याशी बोलू देणं गरजेचं आहे. या करारावर भारत आणि पाकिस्तान दोघांनीही सह्या केलेल्या आहेत.

Image copyright TWITTER

3. पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाचा निर्णय रद्द करण्यासाठी पावलं उचलावीत, अशी भारताची मागणी

पाकिस्तानी कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या भारताच्या मागणीविषयी आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला असा कोणताही आदेश दिलेला नाही. आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानी कोर्टाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणत असल्याचं जाहीर केलं. पाकिस्तानने या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे, असं म्हणताना कोर्टाने हे देखील स्पष्ट केलं की याबाबत पुनर्विचार कोणत्या पद्धतीने करायचा हा पाकिस्तानचा निर्णय असेल.

Image copyright PAKISTAN FOREIGN OFFICE

4. पाकिस्तानने जाधव यांची सुटका करावी आणि त्यांना सुरक्षितपणे भारतात परत पाठवावं, अशी भारताची मागणी

आंतरराष्ट्रीय कोर्टाने भारताची ही मागणीही मान्य केलेली नाही. याच गोष्टीचा संदर्भ देत पाकिस्तानी मीडिया हा पाकिस्तानचा विजय असल्याचं म्हणत आहे.

Image copyright Twitter

5. पाकिस्तानने आपल्या गैरलष्करी कोर्टापुन्हा खटला चालवावा - भारताची मागणी

भारताच्या या मागणीचा समावेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपल्या निर्णयात केलेला नाही.

आपलाच विजय झाल्याचा दावा करत दोन्ही देश जल्लोष करत आहेत. दोघेही आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. आता प्रश्न असा उभा राहतो की निर्णय तर जाहीर झाला पण जाधवांची सुटका झाली नाही.

मग कुलभूषण जाधव भारतात कसे परतणार, याचा विचार केला जाऊ शकतो. पण प्रत्यक्षात हा निर्णय पाकिस्तानचाच असणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)