होर्मूज खाडी: ब्रिटिश टँकरवरच्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारचे प्रयत्न

स्टेना इम्पेरो Image copyright ERWIN WILLEMSE
प्रतिमा मथळा स्टेना इम्पेरो

इराणने होर्मूज खाडीतून ब्रिटनचा 'स्टेना इम्पेरो' हा तेलाचा टँकर ताब्यात घेतला आहे.

हा तेलाचा टँकर जप्त करणं ही इराणने प्रत्युत्तरादाखल केलेली कारवाई आहे, असं ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट म्हणाले. इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जारिफ यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर हंट म्हणाले, "इराणचा एक तेलाचा टँकर याच महिन्यात ताब्यात घेतला होता. या कारवाईत ब्रिटनचाही सहभाग होता. याच्याच प्रत्युत्तरादाखल इराणने ब्रिटनचा टँकर ताब्यात घेतला."

हंट यांनी पुढे असंही म्हटलं की ब्रिटन तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण त्याबरोबरच होर्मूजच्या खाडीतून ये-जा करणारी सगळी जहाजं आणि टँकर्स सुरक्षित राहतील, यासाठी योग्य ती पाऊलं उचलणार आहे.

तर इराणचं म्हणणं आहे की हा तेलाचा टँकर आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचं उल्लंघन करत होता.

इराणची न्यूज एजेन्सी इरनानुसार, फोनवर झालेल्या चर्चेत इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जारिफ यांनी जेरेमी हंट यांनी सांगितलं की, ताब्यात घेतलेल्या ब्रिटनच्या टँकरवर आता कायदेशीर कारवाई होणं अटळ आहे.

स्टेना इम्पेरोच्या मालकांचा चालक दलाशी संपर्क होऊ दिला जात नाहीये. पण तरीही चालक दलाची तब्येत चांगली असल्याची माहिती मालकांनी दिली. या दलात 23 चालक आहेत जे भारत, रशिया, लाटविया आणि फिलिपीन्सचे नागरिक आहेत.

यावर बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की, "इराणच्या ताब्यात असलेल्या भारतीय चालकांच्या सुटकेसाठी भारत सरकार इराणशी चर्चा करत आहे. आम्ही काय घडलं याची सर्वतोपरी माहिती घेत आहोत."

अर्थात हा मुद्दा फक्त एक टँकर जप्त करण्याचा नाहीये. शुक्रवारी लायबेरियाचा टँकरही इराणच्या हत्यारबंद गार्डांनी ताब्यात घेतला होता. हा टँकर ब्रिटिशांच्या मालकीचा होता, पण याला त्याच दिवशी सोडून देण्यात आलं.

होर्मूज खाडी क्षेत्रातून वाहतूक करणाऱ्या जहाजांनाही ब्रिटनने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

स्टेना इम्पेरो नामक तेल टँकरच्या मालकाचं म्हणणं आहे की, आम्ही आमच्या जहाजाशी संपर्क करू शकलो नाही. जहाजावर एकूण 23 लोक होते आणि ते इराणच्या दिशेने जात आहे.

लायबेरियात नोंदणी झालेल्या ब्रिटनच्या आणखी एक तेल टँकरवर सशस्त्र सुरक्षारक्षक चढले होते. मात्र ते जहाज आता पुढील प्रवासासाठी सोडण्यात आले आहे. 'द मेस्डार' नामक या जहाजाच्या ग्लासगोस्थित नोर्बुल्क शिपिंग कंपनीच्या माहितीनुसार, जहाजाशी पुन्हा संपर्क साधण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. या जहाजावर ब्रिटनच्या वेळेनुसार काल संध्याकाळी 5.30 वाजता सशस्त्र सुरक्षारक्षक चढले होते.

ब्रिटनकडून चिंता व्यक्त

ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या माहितीनुसार, जेव्हा मेस्डारला दहा स्पीड बोटींनी घेराव घातला, त्यावेळी त्यावर 25 जण होते.

Image copyright NORBULK SHIPPING
प्रतिमा मथळा द मेस्डार

इराणच्या होर्मूज खाडीत होणाऱ्या या सर्व घटनाक्रमावर चर्चेसाठी ब्रिटन सरकारच्या 'कोब्रा' समितीने शुक्रवारी दोनदा तातडीच्या बैठका घेतल्या.

ब्रिटन सरकारच्या प्रवक्त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "इराणच्या या कारवाईबाबत सरकार काळजीत आहे आणि यामुळे वाहतुकीच्या आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्याला थेट व स्पष्टपणे आव्हान दिलं गेलंय."

काही काळासाठी इराणमधील होर्मूज खाडीच्या भागात जाऊ नये, असं आवाहन आम्ही ब्रिटनच्या जहाजांना केलं आहे, असं ब्रिटन सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट म्हणतात, "जहाजं जप्त करणं पूर्णपणे अस्वीकारार्ह असून, जल वाहतुकीचं स्वातंत्र्य कायम राखलं पाहिजे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, जर स्थिती तातडीने सुधारल्या गेल्या नाहीत, तर याचे परिणाम गंभीर होतील."

Image copyright REUTERS

"हा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्याकडे सैन्याचाही पर्याय आहे. आम्ही राजनयिक माध्यमाचाही विचार करत आहोत. मात्र, यावर तोडगा निघाला पाहिजे, हे आम्ही स्पष्ट करत आहोत," असंही परराष्ट्र मंत्री हंट म्हणाले.

ब्रिटनच्या दोन्ही जहाजांमध्ये कुणीही ब्रिटनचा नागरिक नव्हते. त्यात इतर देशांचे नागरिक होते, अशीही माहिती हंट यांनी दिली.

इराणचं काय म्हणणं आहे?

इराणी माध्यमांनुसार, स्टेना इम्पेरो तेल टँकर इराणच्या सशस्त्र दलाने जप्त केलं आहे.

'तसनीम' या इराणमधील वृत्तसंस्थेनुसार, "आम्हाला अशी माहिती मिळाली होती की, ब्रिटनच्या स्टेना इम्पेरो टँकरमुळे काही समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे आम्ही सैन्याच्या माध्यमातून टँकरला अब्बास बंदरावर आणण्यास सांगितले, जेणेकरून चौकशी करता येईल, असं इराणच्या बंदर आणि समुद्राशी संबंधित संस्थेने माहिती दिली."

'तसनीम'च्या वृत्तानुसार, स्टेना इम्पेरो टँकरने जीपीएस बंद करणं, होर्मूज खाडीतल्या प्रवेशाऐवजी बाहेरच्या रस्त्यानं जाणं आणि इशाऱ्यांकडे कानाडोळा करणं हे तीन नियम तोडले. त्यामुळे त्याला जप्त करण्यात आलं.

आधीच अमेरिका, ब्रिटन आणि इराण या तिन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अशा स्थितीत स्टेना इम्पोरो टँकर जप्तीची घटना घडलीय.

काही दिवसांपूर्वीच म्हणजे 4 जुलै रोजी ब्रिटनच्या सुरक्षारक्षकांनी जिब्राल्टरमध्ये नियम मोडल्याप्रकरणी 'ग्रेस 1' या इराणी तेल टँकरला जप्त केलं होतं. 'ग्रेस 1' टँकर नियमांचं उल्लंघन करून सीरियामध्ये तेल घेऊन जात होता, अशी शंका ब्रिटनला आहे.

इराणने इशारा दिला होता की, याचा बदला म्हणून ब्रिटनच्या टँकर जप्त करेल आणि त्यांनी तसंच केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)