50 वर्षांपूर्वीचा बाटलीतला संदेश मिळाला, काय होतं लिहिलेलं?

मध्यभागी पॉल गिलमोर Image copyright PAUL GILMORE
प्रतिमा मथळा मध्यभागी पॉल गिलमोर

तब्बल 50 वर्षांपूर्वी एक चिठी बाटलीत घालून ती हिंदी महासागरात फेकण्यात आली. 50 वर्षांनंतर आत्ता ही संदेश लिहीणारी व्यक्ती सापडलीय.

कुटुंबासोबत बोटीने युके ते मेलबर्नचा प्रवास करणाऱ्या तेव्हा 13 वर्षांच्या असणाऱ्या पॉल गिल्मोर यांनी एक चिठ्ठी बाटलीत घालून ती समुद्रात फेकली होती.

या आठवड्यात ही चिठ्ठी 13 वर्षांच्याच दुसऱ्या एका मुलाला सापडली. दक्षिण ऑस्ट्रेलियातला जेया इलियट त्याच्या वडिलांसोबत 'फिशिंग'ला गेला होता. ही बाटली त्याला सापडली.

फरक इतकाच की 13 वर्षांच्या मुलाने फेकलेली बाटली तब्बल 50 वर्षांनंतर एका 13 वर्षांच्याच मुलाला सापडली.

"हे पत्र पुन्हा माझ्यापर्यंत येईल याची मला आशा होती," गिल्मोर यांनी बीबीसीला सांगितलं.

17 नोव्हेंबर 1969 रोजी पॉल गिल्मोर यांनी हे पत्र लिहिलं. फेअरस्टार बोटीने ते ऑस्ट्रेलियाला जायला निघाले. आणि फ्रीमँटलपासून 1000 माईल्स दूर असताना ही बाटली त्यांनी समुद्रात फेकली. ज्या कोणाला हे पत्र मिळेल, त्यांनी प्रतिसाद द्यावा अशी विनंती त्यांनी पत्रात केली होती.

Image copyright CARLA ELLIOTT VIA ABC
प्रतिमा मथळा पॉल गिलमोर यांनी लिहिलेलं पत्र

गिल्मोर म्हणतात, "माझ्या अगदी लक्षात आहे की मी कशी ही पत्रं पाठवायचो. माझ्यासाठी ही पत्रं अतिशय महत्त्वाची होती. जगाच्या दुसऱ्या टोकाकडच्या माझ्या प्रवासाचा, ही पत्रं एक भाग होती. रॉबिन्सन क्रूसो आणि इतरांच्या साहसकथा मला वाचायला आवडायच्या. मला अशी आशा होती की कोणत्यातरी अनोख्या बेटावर राहणाऱ्या एखाद्या सुंदर मुलीला हे पत्र मिळेल. "

गिल्मोर 1973मध्ये युकेमध्ये परते आणि शिक्षण पूर्ण करून त्यांनी स्कॅण्डेनेव्हिया आणि मध्य पूर्वेतल्या देशांत इंग्लिश शिक्षक म्हणून नोकरी केली.

आयर पेनिन्सुलातल्या तालिया बीचवर जेया इलियटला ही बाटली सापडली.

त्याचे वडील पॉल इलियट ABCशी बोलताना म्हणाले, "जेया पहिल्यांदा ही बाटली घेऊन आला, तेव्हा मला वाटलं की ही खोटी आहे."

Image copyright Image copyrightCARLA ELLIOTT VIA ABC

त्यांनी बाटली फोडून ही चिठ्ठी बाहेर काढली. आता जेयाला या पत्राला उत्तर द्यायचंय.

पॉल गिल्मोर सध्या क्रूझवर सुटीसाठी गेले आहेत.

क्रूझवरून परत आल्याबरोबर ते इलियट कुटुंबाशी संपर्क साधतील असं गिल्मोर कुटुंबाने म्हटलं आहे.

2018मध्ये देखील पर्थमधील एका कुटुंबाला असाच एक बाटलीतला संदेश सापडला होता. तो जगातला सर्वात जुना बाटलीबंद संदेश होता आणि समुद्रात तब्बल 132 वर्षांपूर्वी फेकण्यात आलेला होता.

हा एका जर्मन बोटीवरून पाठवण्यात आलेला खराखुरा संदेश असल्याचं ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांनी म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)