वजीर मोहम्मद: गुजरातमध्ये जन्मलेले चार भाऊ, ज्यांनी पाकिस्तानी क्रिकेटला मोठं केलं

वजीर मोहम्मद

पाकिस्तानचे माजी कसोटीवीर वजीर मोहम्मद यांची ओळख केवळ 'लिटल मास्टर' म्हणून ओळख असणाऱ्या हनीफ मोहम्मद यांचे मोठे भाऊ इतकीच नाहीय.

फक्त हनीफच नाही तर ते मुश्ताक मोहम्मद आणि सादिक मोहम्मद यांचे मोठे भाऊ आहेत. आणि ते देखील क्रिकेटर होते. म्हणजे एकाच घरात चार व्यावसायिक क्रिकेटपटू.

हनीफ, मुश्ताक, सादिक आणि वजीर या चारही पाकिस्तानी क्रिकेटर भावंडांचा जन्म भारतात फाळणीपूर्वी झाला होता. गुजरातमधील जुनागढ हे त्यांचं जन्मगाव.

वजीर मोहम्मद तिन्ही भावांच्या तुलनेत कमी कसोटी सामने खेळले, मात्र खेळातील बारीक-सारीक गोष्टींवर ते इतर भावांपेक्षा जास्त लक्ष देत असत. यामुळेच 'अभ्यासू क्रिकेटर' म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

वेस्ट इंडीजविरोधातील ज्या कसोटी मालिकेत हनीफ मोहम्मद यांनी 337 धावांची अविस्मरणीय खेळी करून विक्रमाची नोंद केली होती, त्याच मालिकेत वजीर मोहम्मद यांनी 189, 106 आणि 97 धावांची नाबाद खेळी केली होती.

वजीर मोहम्मद हे आता 89 वर्षांचे आहेत. वय वाढलं असलं तरी ते अजूनही सुदृढ आहेत.

ब्रिटनमधील बर्मिंगहॅम शहराच्या शोरगुलपासून काही अंतरावर असलेल्या सोलीहल येथील निवांत ठिकाणी वजीर मोहम्मद गेल्या 45 वर्षांपासून राहत आहेत. बागेत फिरणं, झाडांची देखभाल करणं आणि टीव्हीवर क्रिकेट पाहणं यातच सध्या ते रमतात.

"जेव्हा कधी एखाद्या क्रिकेटरची फलंदाजी पाहत असतो, त्यावेळी मी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार बनतो आणि अमूक अमूक गोलंदाजासाठी असं क्षेत्ररक्षण लावून फलंदाजाला बाद केलं जाऊ शकतं, असा विचार करत असतो."

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत वजीर मोहम्मद यांनी आपल्या कारकीर्दीतील अनेक महत्त्वाच्या घटनांना उजाळा दिला.

फक्त माझ्यासाठी ट्रायल

वजीर मोहम्मद सांगतात, "मी ज्या काळात कसोटी क्रिकेट खेळत होतो, त्यावेळी माझ्यासाठी परिस्थिती फारशी सोपी नव्हती. कारण जेव्हा जेव्हा पाकिस्तानी संघाच्या निवडीची वेळ यायची, तेव्हा इतर सर्व खेळाडूंची नावं पटकन निश्चित व्हायची. ज्यावेळी माझं नाव समोर यायचं, तेव्हा मात्र मला म्हटलं जायचं की, तुझी निवड चाचणीतून होईल."

"संघात निवडीसाठी चाचण्या देऊन मानसिकरीत्या मी आणखी कणखर झालो होतो आणि तसेही चाचण्यांना मी घाबरत नव्हतो. उलट त्यासाठी नेहमीच तयार असायचो," असंही ते म्हणाले.

वजीर मोहम्मद यांच्या माहितीनुसार, त्यांनी कॉमनवेल्थ इलेव्हनविरोधात ढाक्यात शतक ठोकलं होतं, त्यानंतर दुसरा सामना कराचीत होता. तो सामना इंग्लंड दौऱ्यासाठी एखाद्या ट्रायलप्रमाणेच होता. मात्र, त्यावेळी वजीर मोहम्मद यांना खेळवलं गेलं नाही.

"तेव्हा पहिल्यांदा मी माझी निवड न करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्याबाबत मला कधीच उत्तर दिले गेले नाही. खरंतर त्यांना याची भीती होती की, जर मला कराचीत खेळवलं गेलं असतं आणि मी चांगली खेळी केली असती, तर इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात मला समाविष्ट करावं लागलं असतं."

आई स्टेडियममध्ये आली होती आणि आम्ही तिन्ही भाऊ शून्यावर बाद झालो!

वजीर मोहम्मद सांगतात, त्यांच्या आईला क्रिकेट प्रचंड आवडत असे. ज्यावेळी त्यांची आई रेडिओवर क्रिकेट ऐकत असायची, त्यावेळी कुणालाही त्यांच्या रुममध्ये जाण्यास परवानगी नसायची.

"आम्हा भावांचे सामने पाहण्यासाठी ती कधीच नॅशनल स्टेडियममध्येत येत नसे. मात्र एक दिवस आम्ही तिला विनंती करून कायदे आझम ट्रॉफीतील एक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये नेलं. पण आम्हाला कुठे माहीत होतं की, नेमकं तेव्हाच आम्ही तिन्ही भाऊ शून्यावर बाद होऊ!"

"हे पाहून आई संतापली आणि म्हणाली, हे पाहण्यासाठी मला तुम्ही स्टेडियममध्ये आणलं होतात का?

वजीर सांगतात, "एकदा मी सादिकला झेलबाद केलं होतं, त्यानंतर आई कितीतरी दिवस आम्हा भावंडांशी बोलत नव्हती."

रईस मोहम्मद कसोटी न खेळल्याचं दु:ख

रईस मोहम्मद अत्यंत स्टायलिश फलंदाज होते. गोलंदाजीही करत असत. मात्र, चाचणीत यशस्वी झाले तरच त्यांना संघात घेऊ असं निवड समिती म्हणत असे.

दुर्दैवाने रईस चाचणीत फार धावसंख्या उभारू शकत नसत. मात्र, देशाअंतर्गत क्रिकेटमध्ये ते चांगली कामगिरी करत असत. ते कसोटी क्रिकेट खेळले नाहीत म्हणून आईलाही वाईट वाटलं होतं.

प्रतिमा मथळा वजीर मोहम्मद हे आता 89 वर्षांचे आहेत. वय वाढलं असलं तरी ते अजूनही सुदृढ आहेत.

मानसिकरीत्या कणखर हो, जेणेकरून निवड चाचणीत यशस्वी होशील, असं मी रईसला कायम सांगायचो, असं वजीर सांगतात.

"हनीफ मोहम्मदला जबरदस्तीने निवृत्ती घ्यायला लावली"

वजीर मोहम्मद सांगतात, "1969 साली ज्येवळी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर होता, त्यावेळी पाकिस्तानी संघाचा निवड प्रमुख मीच होतो. अब्दुल हफीज करदार माझ्याकडे आले आणि म्हणाले, हनीफ मोहम्मदला निवृत्ती घेण्यास सांगा. कारण जर आम्ही त्यांना निवृत्ती केलं, तर ते चांगलं वाटणार नाही."

"मी हनीफला म्हटलं, मला सांगताना वाईट वाटतंय, पण तुला निवृत्ती घेण्यासाठी सांगितलं जातंय."

हनीफ मोहम्मदने 1952 साली भारताविरोधातील सामन्यातून कसोटीत पदार्पण केलं होतं. पहिल्या सामन्यात 51 आणि 1 अशी धावसंख्या केली होती.

  • 1955 सालच्या भारत दौऱ्यात हनीफने 142 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.
  • 1960 सालच्या भारत दौऱ्यात पहिल्या कसोटीत 160 धावांची खेळी केली होती.
  • त्रिशतक लगावणारा पहिला पाकिस्तानी फलंदाज असा विक्रम हनीफ मोहम्मद यांच्या नावावरच आहे. त्यांनी वेस्ट इंडीजविरोधातील सामन्यात 337 धावा केल्या होत्या.

हनीफ यांनी त्यांचा भाऊ मुश्ताक मोहम्मद यांच्यासारखं भारताविरोधात धडाकेबाज खेळी केल्या होत्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा फलंदाजी करताना हनीफ मोहम्मद

वेस्ट इंडिजविरोधातील सामन्यातून पदार्पण केल्यानंतर 1960 साली भारत दौऱ्यावर आलेल्या मुश्ताक मोहम्मद यांनी 101, 61 आणि नाबाद 41 धावांची खेळी केली होती. मुश्ताक यांच्या नावावर 57 कसोटी सामन्यात 3,643 धावा आणि 79 विकेट्स आहेत.

1969 साली न्यूझीलंडविरोधीतल सामन्यातून पदार्पण करणाऱ्या सर्वांत लहान भाऊ सादिक मोहम्मद यांची एकाच सामन्यातील सर्वाधिक धावसंख्या 166 आहे. ते एकूण 41 कसोटी सामने खेळले, त्यात त्यांनी 2,579 धावा बनवल्या. सादिक यांनी भारताविरोधात 41, 47 आणि 46 अशी खेळी केली आहे.

या क्रिकेटर भावंडांपैकी सर्वांत मोठे वजीर मोहम्मद. त्यांनी भारताविरोधात एकच कसोटी सामना खेळला. त्यात 55, 34 आणि 23 अशी धावसंख्या केली होती.

वजीर मोहम्मद यांनी 1958-59 मध्ये वेस्ट इंडीजविरोधात तुफान फलंदाजी केली होती. 189, 106 आणि 97 अशी धावसंख्या केली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)