प्रीती पटेल : नरेंद्र मोदींच्या समर्थक बोरिस जॉन्सन मंत्रिमंडळात गृहमंत्री

प्रीती पटेल Image copyright Getty Images

बोरिस जॉन्सन यांच्या नव्या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट्यं यातले भारतीय वंशाचे चेहरे. यामध्ये सर्वांत जास्त चर्चा होतीये युकेच्या नव्या गृहमंत्री प्रीती पटेल यांच्या नावाची.

ब्रेक्झिटला दिलेलं उघड समर्थन, नंतरच्या काळात थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट मसुद्याला केलेला जोरदार विरोध आणि 'सेव्ह इंडियन करी' मोहीम यामुळे गेली दोन वर्षं प्रीती पटेल सातत्याने चर्चेत होत्या. अनेकदा त्यांनी वादही ओढावून घेतले होते.

प्रीती पटेल यांनी थेरेसा मे यांच्या सरकारमध्येही गृहमंत्रिपद भूषवलं होतं. पण नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं. पंतप्रधान कार्यालयाला आणि परराष्ट्र मंत्रालयाला पुरेशी माहिती न देता इस्रायलबरोबर वैयक्तिक पातळीवर बैठका घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यामुळे त्यांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं.

आता पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात गृहमंत्री पदाची माळ पडलीये. मनात असलेलं आक्रमकपणे लोकांसमोर मांडणं आणि त्यासाठी आग्रही राहणं हा त्यांची राजकीय ओळख बनलीये.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याप्रमाणेच त्याही कट्टर उजव्या विचारसरणीच्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या त्या समर्थक आहेत. मोदींच्या लंडन दौऱ्यात त्यांच्या आदरातिथ्याची जबाबदारी प्रीती यांच्यावरच होती.

इंग्लंडमधले भारतीय वंशाचे अनेक लोक याच मुद्यांसाठी त्यांना पाठिंबा देतात. करी हाऊसेसमध्ये भारतीय वंशाचे शेफ असावेत यासाठी केलेलं आंदोलन असो वा समलैंगिक लग्नांना असलेला विरोध किंवा धूम्रपानविरोधी मोहीम या सगळ्यामुळे ब्रिटिश राजकारणात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ब्रेक्झिटसाठीच्या 'Vote Leave' मोहीमेमध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. शिवाय बोरीस जॉन्सन यांच्या पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दिला होता.

'ब्रेक्झिट दरम्यान इंग्लंड आणि टोरीजना वाचवू शकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बोरीस जॉन्सन' असं विधान त्यांनी केलं होतं.

त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा कार्यकाळ कसा असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे.

प्रीती पटेल यांची राजकीय कारकीर्द

1995 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या (हुजूर पक्ष) जनसंपर्क विभागात त्यांनी अनेक वर्षं काम केलं.

व्हिटम, एसेक्समधून 2010 साली त्या पहिल्यांदा निवडून आल्या. कन्झर्व्हेटिव्ह पार्टीमधील वेगाने उदयाला येणाऱ्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं.

Image copyright PA WIRE

2014 मध्ये त्या पहिल्यांदा मंत्री झाल्या. त्यावेळी त्या 'ट्रेजरी मिनिस्टर' होत्या.

2015 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर त्या रोजगार मंत्री झाल्या.

जून 2016 मध्ये ब्रेक्झिटवरील सार्वमतानंतर थेरेसा मे पंतप्रधान झाल्या आणि पटेल यांना आंतरराष्ट्रीय विकास सचिवपदी (Secretary of State for International Development) बढती देण्यात आली.

2017 मध्ये नेमकं काय घडलं?

2017 च्या ऑगस्टमध्ये प्रीती पटेल सुटीसाठी इस्रायलला गेल्या होत्या. त्यावेळी त्या युकेच्या आंतरराष्ट्रीय विकास सचिव होत्या.

12-13 दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान प्रीती यांनी 2 दिवस काम करायचं ठरवलं. या दोन दिवसांत त्यांनी 12 बैठका घेतल्या.

यादरम्यान त्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनाही भेटल्या. पण या बैठकींची लंडनमधल्या कोणालाच कल्पना नसल्याने लंडनमध्ये गदारोळ उडाला.

Image copyright Reuters

इस्रायलमधल्या ब्रिटीश राजनयिक अधिकाऱ्यांनाही प्रीती यांच्या या भेटीगाठींची माहिती नव्हती.

आपण याविषयी बोरिस जॉन्सन यांना सांगितलं होतं आणि परराष्ट्र विभागाला याची माहिती होती असं स्पष्टीकरण प्रीती पटेल यांनी दिलं.

पण त्यांना अखेरीस याबद्दल माफी मागावी लागली आणि पदाचा राजीनामाही द्यावा लागला.

कुटुंब आणि बालपण

47 वर्षांच्या प्रीती यांच्या जन्म 29 मार्च 1972 साली लंडनमध्येच झाला. त्यांचे आई-वडील मूळ गुजरातचे पण 1960 नंतर ते युगांडात स्थायिक झाले.

युगांडातील परिस्थिती आणि ईदी अमीन राजवटीतून जीव वाचवून त्यांनी पळ काढला. ते लंडनमधील हॅरो इथं स्थायिक झाले.

तिथं त्यांचं दुकान होतं. याच दुकानामध्ये टीनएजर म्हणून काम करत असताना एकदिवस प्रीती यांची गाठ स्थानिक खासदार सेसिल पार्किन्सन यांच्याशी पडली आणि इथेच राजकारणाची बीजं रोवली गेली. सेसिल यांनीच प्रीती यांना पक्षाचं सभासद करून घेतलं होतं.

वॉटफर्ड ग्रामर स्कूल फॉर गर्ल्समध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. कील विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली तर एसेक्स युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी 'ब्रिटीश गर्व्हमेंट अँड पॉलिटिक्स'मध्ये उच्च शिक्षण घेतलं.

प्रीती पटेल या मार्गारेट थॅचर यांना आपला राजकीय आदर्श मानतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)