इराण : 9 भारतीय खलाशांची सुटका, इतर अजूनही ताब्यात

जहाज Image copyright ERWIN WILLEMSE

इराण आणि ब्रिटन यांच्यातल्या वाढत्या तणावाचा फटका भारतीय खलाशांना बसला आहे.

इराणने काही दिवसांपूर्वी 'एमटी रियाह' हा तेलवाहू टँकर जप्त केला होता. त्यावर 12 भारतीय खलाशी होते. यापैकी 9 खलाशांना इराणने सोडल्याची घोषणा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

इराणच्या लष्करी दलाची शाखा असलेल्या रिव्हॉल्युशनरी गार्डने 14 जुलै रोजी एमटी रियाह टँकर जप्त केला होता. या तेलवाहू जहाजावर पनामाचा झेंडा होता.

या जहाजातून बंदी घालण्यात आलेल्या इंधनाची तस्करी सुरू होती, असा इराणचा आरोप आहे.

इराण आणि ओमान या दोन देशांदरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी आहे. संपूर्ण जगात होणाऱ्या तेलवाहतुकीपैकी बहुतांश तेलवाहतूक याच सामुद्रधुनीतून होते आणि याच सामुद्रधुनीतून जात असताना इराणने ही कारवाई केली आहे.

इराण आणि ब्रिटनमध्ये वाढता तणाव

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इराणने याच भागातून ब्रिटनचा झेंडा असलेलं स्टेना इम्पेरो हे तेलवाहू जहाजही जप्त केलं होतं. त्यावर 23 खलाशी होते. यात 18 भारतीय, 3 रशियन आणि फिलिपिन्स आणि लाटवियाचा प्रत्येकी एक खलाशी आहे.

इराणने 9 भारतीयांची सुटका केली असली तरी रियाहवरचे तीन आणि स्टेना इम्पेरो जहाजावरचे 18 असे एकूण 21 भारतीय अजूनही इराणच्या ताब्यात आहेत.

Image copyright Getty Images

स्टेना इम्पेरो या ब्रिटनच्या तेलवाहू जहाजाला ताब्यात घेतल्यामुळे इराण आणि ब्रिटन यांच्यातला तणाव वाढला आहे. ब्रिटीश परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट यांनी हे जहाज लवकरात लवकर सोडावं नाहीतर गंभीर परिणामांना सामोरं जायला तयार रहा, असा इशारा दिला होता. मात्र, इराणने अजूनही या जहाजाची किंवा जहाजावर असलेल्या चालक दलाची सुटका केलेली नाही.

या घटनेनंतर आता ब्रिटीश सरकारने ब्रिटनचा झेंडा असलेल्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाताना रॉयल नेव्हीकडून सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटीश सरकारने सर्व जहाज मालकांना याबाबत सूचना दिली असून त्यांनी त्यांच्या जहाजांच्या मार्गाची माहिती द्यावी, अशी सूचना केली आहे.

4 जुलै रोजी ब्रिटनने सीरियाला तेलपुरवठा करण्यासाठी निघालेलं इराणचं एक जहाज ताब्यात घेतलं होतं. सीरियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध असल्याने तेलपुरवठा करणं, बेकायदेशीर असल्याचं सांगत ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने आता ब्रिटनची तेलवाहू जहाजं ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आहे.

शुक्रवारीदेखील लायबेरियाचा एक तेलवाहू टँकर इराणने जप्त केला. तो टँकरही ब्रिटीश मालकीचा होता. मात्र, त्याला त्याच दिवशी सोडून देण्यात आलं होतं. ब्रिटनने केलेल्या कारवाईचा सूड म्हणून होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या ब्रिटनच्या जहाजांना लक्ष्य करण्याची रणनीती इराणने आखल्याचं दिसतंय.

इराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव कायम

इराण आणि अमेरिका यांच्या गेल्या काही दिवसांपासून अणुकरारावरून वाद निर्माण झाला आहे.

Image copyright MOD

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत केलेल्या अणु करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे.

या करारावर 2015 साली संयुक्त राष्ट्रांसह अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने सह्या केल्या होत्या.

इराण आपला अणु कार्यक्रम मर्यादित ठेवेल आणि केवळ 3 टक्के युरेनियमचाच वापर करेल, असं या करारात नमूद करण्यात आलं होतं.

मात्र, डोनाल्ड ट्रंप यांनी या करारातून बाहेर पडत असल्याची घोषणा केल्याने आणि अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतर इराणने युरेनियम संवर्धन वाढवलं आहे.

अणुऊर्जा संयंत्रांमध्ये इंधन म्हणून युरेनियमचा वापर होतो. मात्र, अण्वस्त्र तयार करण्यासाठीदेखील युरेनियमचा वापर होतो आणि म्हणूनच इराणने युरेनियमचा मर्यादित वापर करावा, अशी अट अणुकरारामध्ये टाकण्यात आली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)