'मी माझ्या चेहऱ्यावर मासिक पाळीचं रक्त लावते कारण...'

लॉरा Image copyright LAURA MOCELLIN TEIXEIRA

27 वर्षांची लौरा टेक्सिरिया दर महिन्याला होणाऱ्या रजोस्रावाचं रक्त गोळा करून चेहऱ्याला लावते. यानंतर उरलेल्या रक्तात पाणी टाकून ते पाणी ती झाडांना टाकते.

हे ऐकल्यावर कुणाच्याही अंगावर शहारा येईल, किळस वाटेल. मात्र ही एक अतिशय जुनी प्रथा आहे. याला 'सीडिंग द मून' म्हणतात.

या प्रथेला मानणाऱ्या स्त्रिया मासिक पाळी आपल्याच पद्धतीने जगतात. लौराने बीबीसीला सांगितलं, "मी झाडांना पाणी टाकताना एक मंत्र म्हणते, माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि मी तुमची ऋणी आहे. माझं काही चुकलं असेल तर माफ करा."

मासिक पाळीतलं रक्त चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर लावताना आपल्या शरीरात एक प्रकारची शक्ती संचार करत असल्याचा भास आपल्याला होतो, असं लौरा सांगते.

सशक्त करणारी प्रथा

लौराला वाटतं या प्रथेमुळे ती सशक्त बनत आहे.

Image copyright RENATA CHEBEL PARA DANZAMEDICINA

ती म्हणते, "समाजात सर्वांत मोठा भेदभाव मासिक पाळीशी जोडला गेला आहे. मासिक पाळीला अशुद्ध मानलं जातं आणि हा लज्जेचाही विषय आहे. मासिक पाळीच्या काळात स्त्रीला सर्वाधिक लाजीरवाणं वाटत असतं."

व्यवसायाने बॉडी सायकोथेरपिस्ट, डान्सर आणि लेखिका असलेल्या मोरेना कार्डोसो यांनी 2018 साली 'वर्ल्ड सीड युवर मून डे' हा कार्यक्रम सुरू केला. त्या म्हणतात, "सीडिंग द मून स्त्रियांसाठी अतिशय सोपी आणि त्यांना मजबूत करणारी पद्धत आहे."

गेल्या वर्षी या कार्यक्रमावेळी दोन हजार स्त्रियांनी त्यांच्या मासिक पाळीच्यावेळी गोळा केलेलं रक्त झाडांना टाकलं होतं.

स्त्रियांचं आध्यात्मिक कार्य

मोरेना सांगतात, "मासिक पाळीदरम्यान येणारं रक्त लज्जेचं नव्हे तर सन्मान आणि शक्तीचं प्रतिक आहे, हे लोकांना कळावं, हाच या कार्यक्रमाचा उद्देश होता."

Image copyright LAURA MOCELLIN TEIXEIRA

मोरेना सांगतात मेक्सिकोसह उत्तर अमेरिका आणि पेरूमध्ये पाळीदरम्यान येणारं रक्त जमिनीवर पसरवण्यात आलं. यातून स्त्रिला गर्भधारणा होईल, अशी त्यामागची भावना होती.

मानववंश शास्त्रज्ञ डानियेला टोनेली गेली 20 वर्ष ब्राझिलच्या यूनीकॅम्प विद्यापीठात या विषयावर अभ्यास करत आहेत. इतर समाजात मासिक पाळीत होणाऱ्या रक्तस्रावाविषयी फारच नकारात्मक भावना असल्याचं त्या सांगतात.

त्या म्हणतात, "खराब रक्त निघून जाणे, म्हणजे मासिक पाळी असं मानलं जातं. त्याची तुलना मलमूत्राशी होते."

1960च्या दशकात स्त्रीवादी चळवळींनी हा दृष्टिकोन बदलण्याचा आणि स्त्रीला तिच्या शरीराविषयी मोकळेपणाने बोलण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर अनेक कलाकारांनी मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या रक्तस्रावाच्या प्रतिकाचा वापर त्यांच्या राजकीय, पर्यावरणीय आणि लैंगिक विचारांना मांडण्यासाठी केला.

विशाल गर्भाशय

रेनेटा रिबेरियो यांना या प्रथेविषयी इंटरनेटवरून कळलं. त्या म्हणतात, "सीडिंग माय मून या प्रथेने मला पृथ्वीला एका मोठ्या गर्भाशयाच्या रुपात बघायला मदत केली. या विशाल योनीतही अंकुर फुलतो. अगदी स्त्रीच्या गर्भाशयात फुलतो तसा."

आजही अनेक ठिकाणी वर्ज्य

जगभरात 14 ते 24 वर्षांच्या 1500 स्त्रियांवर एक संशोधन करण्यात आलं. त्यात असं आढळलं की अनेक समाजात आजही हा विषय वर्ज्य आहे.

Image copyright ANA OLIVEIRA

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने ब्राझील, भारत, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना आणि फिलिपिन्समध्ये हे सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात असं दिसलं की स्त्रियांना सॅनेटरी नॅपकीन खरेदी करण्याचीही लाज वाटते. मासिक पाळीदरम्यान जागेवरून उठायलाही त्यांना लाज वाटते.

फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ बहियाच्या 71 वर्षांच्या समाज मानववंश शास्त्रज्ञ असलेल्या सेसिला सार्डेनबर्ग सांगतात की त्यांची पहिली पाळी त्या काळी आली होती ज्यावेळी कुणीच याविषयावर बोलायचं नाही.

स्त्रियांनी याविषयावर मोकळेपणाने संवाद साधला तर याविषयीची लाज आपसूकच दूर होईल, असं त्या सुचवतात. त्या पुढे असंही म्हणतात की आजकालच्या स्त्रिया याविषयी फार बुजऱ्या राहिलेल्या नाहीत.

सीडिंग द मून आणि वाद

लौरा सांगते की सगळ्यांना ही प्रथा मान्य नाही. ती तिला आलेला अनुभव सांगते, "इन्स्टाग्रामवर मला केवळ 300 जण फॉलो करायचे. मी या प्रथेचं अनुकरण केल्यानंतरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर टाकला."

Image copyright SOFIA RIBEIRO

मात्र, चार दिवसांनंतर त्या फोटोची हेटाळणी करण्यात आली. ब्राझिलचे एक वादग्रस्त कॉमेडियन डेनिलो जोन्टेली यांनी हा फोटो त्यांच्या 16 दशलक्ष फॉलोअर्सना शेअर केला.

शेअर करताना त्यांनी लिहिलं, "मासिक पाळीत रक्तस्राव होणं सामान्य बाब आहे. मात्र, ते रक्त आपल्या चेहऱ्यावर लावणं, असामान्य बाब आहे."

या फोटोवर 2300 हून अधिक कमेंट आल्या. मात्र, त्यातल्या बहुतांश कमेंट्स नकारात्मक होत्या.

या विषयाकडे आजही किती नकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं जातं, त्याचंच हे प्रतीक असल्याचं लौरा म्हणते.

ती म्हणते, "लोकांना वाटतं एखादी गोष्ट त्यांच्यासाठी सामान्य नसेल तर ती नक्कीच चुकीची असेल. त्यांना वाटतं ते मोबाईलच्या मागे लपून कुणालाही शिव्या घालू शकतात."

Image copyright MORENA CARDOSO

"हा माझ्या शरीरातला द्रव आहे. त्यामुळे कुठली गोष्ट सामान्य आहे आणि कुठली नाही, हे मी ठरवणार. मी इतर कुणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाहीय."

"खरंतर लोकांना शिव्या घालणं, चुकीचं आहे. लोक जेव्हा मासिक पाळीतल्या रक्तस्रावाला नैसर्गिक बाब म्हणून बघू लागतील तेव्हा मी हे करणं बंद करेन."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)