Man vs Wild: नरेंद्र मोदी यांना जंगलातील थरार अनुभवायला लावणारा बेअर ग्रिल्स कोण?

बेयर ग्रिल्स Image copyright FACEBOOK/BEAR GRYLLS

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि Man vs Wild हा शो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. डिस्कव्हरी चॅनेलच्या या कार्यक्रमाचा टीझर सोमवारी (30 जुलै) ट्वीटरवर रिलीज झाला आणि पंतप्रधान मोदींचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.

नरेंद्र मोदी Man vs. Wild मध्ये बेअर ग्रिल्ससोबत जंगलातील काही थरारक अनुभव घेताना दिसतील.

Man vs Wild मध्ये यापूर्वीही बेअर ग्रिल्ससोबत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचंही नाव या यादीत आहे.

ज्याच्यासोबत अनेक सेलिब्रिटी धोका पत्करून जंगलात, दऱ्याखोऱ्यात भटकतात तो बेअर ग्रिल्स नेमका आहे तरी कोण?

वडिलांकड़ून साहसाचा वारसा

बेअर ग्रिल्सचा जन्म 7 जून 1974 साली लंडनमध्ये झाला. बेअर ग्रिल्सच्या अधिकृत वेबसाईटवरच ही माहिती दिली आहे.

बेअर ग्रिल्सचे वडील हे रॉयल नेव्हीत कमांडो म्हणून कार्यरत होते. ते राजकारणातही होते. त्यांनीच बेअरला गिर्यारोहण आणि बोटिंगसारखे साहसी खेळ शिकवले.

त्याच्यामध्ये साहसाची आवड रुजवण्यामध्ये या खेळांचा खूप मोठा वाटा होता. वडिलांसोबत हायकिंग आणि समुद्र किनाऱ्यावर बोटी बनवणं या बेअरच्या लहानपणाच्या सर्वांत सुंदर आठवणी आहेत.

Image copyright DISCOVERY

तरूणपणी बेअरनं युके स्पेशल फोर्सेस रिझर्व्हच्या 21 व्या बटालियनमध्ये प्रवेश घेतला. तिथं त्यानं तीन वर्षांचं कठोर प्रशिक्षण पार पाडलं.

साउथ आफ्रिकेमध्ये पॅराशूटमधून उडी मारताना बेयर ग्रिल्सला जीवघेणा अपघात झाला. मणक्यामध्ये त्याला तीन फ्रॅक्चर झाले.

डॉक्टरांनी सांगितलं, की यापुढे कदाचित तो धावू शकणार नाही. हा त्याच्या आयुष्यातला सर्वांत कठीण काळ होता.

पण बेअरनं यावरही मात केली आणि वर्षभरातच आपल्या पायांवर उभा राहिला. तो केवळ हिंडायला-फिरायला लागला नाही, तर त्यानं नेपाळमध्ये गिर्यारोहणही केलं. 16 मे 1998 साली त्यानं माउंट एव्हरेस्टही सर केलं.

विक्रमांची मालिका

त्याचा हा साहसी प्रवास इथेच थांबला नाही. त्यानंतर 2000 साली आपल्या मित्रासाठी त्यानं अजून एक धाडस केलं. त्यानं मोजक्याच कपड्यांत बाथटबमध्ये बसून थेम्स नदी पार केली.

Image copyright FACEBOOK/BEAR GRYLLS

ब्रिटीश रॉयल नॅशनल लाइफबोट इन्स्टिट्युशनसाठी बेअरनं जेट स्कीईंग टीमही तयार केली होती.

2005 साली बेअर ग्रिल्सनं अजून एक विक्रम केला. जमिनीपासून तब्बल 25 हजार फूट उंचीवर हॉट एअर बलूनमध्ये त्यानं डिनर केलं. 'द ड्युक्स अॅवॉर्ड'साठी निधी जमविण्याच्या उद्देशानं त्यानं हे साहस केलं.

2008-09 साली त्यानं अंटार्क्टिकच्या बर्फाळ प्रदेशात पॅरामोटार चालविण्याचा प्रयोग केला. मात्र त्यावेळी त्याला बर्फाच्या वादळाला तोंड द्यावं लागलं. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली.

या दुखापतीमुळे बेअर ग्रिल्सला दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. त्यानंतर तो पुन्हा नवीन जोमानं परतला.

Image copyright FACEBOOK/BEAR GRYLLS

2010 साली थंडीनं गोठवणाऱ्या आर्क्टिक सागराच्या वायव्य भागात त्यानं उघड्या जहाजातून अडीच हजार मैलांचा प्रवास केला.

2011 साली त्यानं Survival Academy ची सुरुवात केली. 2013 साली त्यानं A Survival Guide for Life हे पुस्तक लिहिलं.

2014 साली बेअर ग्रिल्सचं Children's Survival हे पुस्तक प्रसिद्ध झालं. 2018 साली त्यानं How to Stay Alive हे पुस्तक लिहिलं.

Man Vs Wild

एकीकडे त्याची ही साहसांची मालिका सुरू असतानाच Man Vs Wildच्या निर्मात्यांनी त्याच्याशी संपर्क साधला.

आधी हा शो युकेमधल्या चॅनेल 4 वर पहिल्यांदा प्रदर्शित झाला. त्यानंतर 2006 साली डिस्कव्हरी चॅनेलनं Man Vs Wild हा शो लाँच केला.

या शोमध्ये बेअर ग्रिल्स आणि त्याच्या क्रूला जंगल किंवा एखाद्या बेटावर सोडलं जातं. त्यांना फारशा सुविधा नसतात. तिथं त्यांना येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत स्वतःच्या अस्तित्त्वासाठी झगडा करावा लागतो.

Image copyright FACBOOK/BEAR GRYLLS

आतापर्यंत या शोचे सात सीझन झाले आहेत. बॉर्न सर्व्हायवर, अल्टिमेट सर्व्हायवल, सर्व्हायवल गेम, रिअल सर्व्हायवल अशी यातल्या काही सीझन्सची नावं होती.

या कार्यक्रमाच्या वाइल्ड वीकेन्ड या कार्यक्रमात युकेमधील प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. 2015 साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हेसुद्धा बेअर ग्रिल्सच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)