ग्रेटा थुनबर्ग : पर्यावरण वाचवण्यासाठी शाळा बुडवणारी मुलगी

ग्रेटा थुनबर्ग Image copyright Getty Images

ऑगस्ट 2017 मधला थंडीचा एक दिवस. स्वीडनच्या संसदेबाहेर एक शाळकरी मुलगी एकटीच हातात फलक घेऊन बसली होती. त्या फलकावर लिहिलं होतं - 'School Strike for climate (पर्यावरणासाठी शाळा बंद).

पहिल्या दिवशी तिच्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. दिवसभर ती एकटीच बसून होती.

दुसऱ्या दिवसापासून मात्र तिच्याकडे आणि ती ज्या मुद्द्याविरोधात आवाज उठवत होती, त्याकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं.

स्वीडनमधले नागरिक, शाळकरी मुलं सोबत आली आणि हवामान बदलाविरोधातला लढा सुरू झाला.

16 वर्षांच्या या मुलीने सुरू केलेल्या चळवळीला जगभरातल्या शाळकरी मुलांनी साथ दिली. या मुलींचं नाव ग्रेटा थुनबर्ग.

'फ्रायडेज फॉर फ्युचर'

कायदे तयार करणाऱ्यांचं, धोरणं बनवणाऱ्यांचं हवामान बदलाकडे वेधून घेण्यासाठी ग्रेटाने मोहीम सुरू केली. या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या शाळकरी मुलांनी शाळेवर बहिष्कार टाकत आपापल्या देशांच्या संसदेबाहेर ठाण मांडलं.

दर शुक्रवारी जगभरातल्या अनेक मुलांनी असं धरणे आंदोलन केलं. जर्मनी, जपान, युनायटेड किंग्डम, भारत, ऑस्ट्रेलियासारख्या अनेक देशातली मुलं #FridaysforFuture मोहिमेत सहभागी झाली.

Image copyright Getty Images

डिसेंबर महिन्यात पोलंडमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या 'क्लायमेट टॉक'साठी ग्रेटाला बोलावण्यात आलं. जगानं खऱ्या अर्थानं ग्रेटाच्या कामाची दखल घेतली.

भोवतालच्या पर्यावरणात झपाट्याने भयंकर बदल घडत असून हे सगळं थांबवण्याची संधी अजूनही आपल्याकडे आहे, म्हणूनच पर्यावरण शास्त्रज्ञ जे सांगत आहेत त्याकडे लक्ष देत त्यानुसार पावलं उचला, असं आवाहन ग्रेटा जगभरातल्या धोरणकर्त्यांना करत आहे.

"मी मतदान करू शकत नाही, म्हणून मी या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी इतर मार्ग अवलंबतेय," ती सांगते.

कसा सुरू झाला हा प्रवास?

बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ग्रेटा सांगते, "मी लहान असताना माझे भरपूर प्लॅन्स होते. अभिनय करण्यापासून ते शास्त्रज्ञ होण्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा मी विचार करत होते.

"नंतर एकदा शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला हवामान बदलाविषयी सांगितलं आणि माझे डोळे उघडले. त्याबद्दल मी जितकं वाचत गेले तितकं हे सर्वांसाठीच किती भयंकर आहे हे माझ्या लक्षात आलं."

या सगळ्याने व्यथित झालेल्या ग्रेटाने शाळेत जाणं सोडलं, लोकांशी बोलणंही सोडलं.

Image copyright Getty Images

मग एक दिवस 'आता बस्स!' असं तिने ठरवून टाकलं. हा तिच्यासोबतच इतरांच्याही भविष्याचा प्रश्न होता. तिला वाटलं की बाकी कोणी याविषयी काही करत नसेल तर मग आता तिला स्वतःलाच याविषयी काहीतरी करायला हवं. म्हणून मग शाळेत न जाता तिने स्वीडनच्या संसदेबाहेर हातात फलक घेऊन आंदोलन करायला सुरुवात केली.

पहिल्या दिवशी ती एकटीच होती. पण दुसऱ्या दिवसापासून तिला लोकांची साथ मिळाली.

खरंतर असं काही घडेल आणि इतक्या पटकन घडेल याची ग्रेटाला अपेक्षाच नव्हती. ग्रेटाचा कित्ता जगभरातल्या लाखो मुलांनी गिरवला.

Image copyright Getty Images

ग्रेटाचा प्रश्न सरळसाधा आहे, "जर आमचं भविष्यच धोक्यात असेल तर शाळेत कशाला जायचं? जर मोठी माणसं सगळ्यात महत्त्वाच्या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करणार असतील तर आम्ही इतर गोष्टी कशाला शिकायच्या?"

पोलंडमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलविषयक परिषदेमधलं तिचं भाषणही धोरणकर्त्यांना विचार करायला लावणारं होतं. "माझ्या असं लक्षात आलं, की आम्ही वयाने लहान असलो तरी बदल घडवता येतात. जगभरातली काही मुलं शाळेत न जाता याविषयाकडे जगाचं लक्ष वेधून घेऊ शकतात, जगभरातल्या बातम्या या घटनेच्या हेडलाईन देऊ शकतात, तर विचार करा, की जर आपण खरंच एकत्र काम करायचं ठरवलं, तर काय काय साध्य करता येईल."

पर्यावरण परिषदेला ग्रेटा जाणार बोटीने

न्यूयॉर्कमध्ये 23 सप्टेंबरला होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलाविषयीच्या शिखर परिषदेत सहभागी होण्याचं आमंत्रण ग्रेटा थुनबर्गला देण्यात आलंय.

तिलाही या परिषदेत सहभागी व्हायचं होतं. पण तिथे जायचं कसं, हा प्रश्न होता. कारण विमानांतून होणारं उत्सर्जन पर्यावरणासाठी घातक असल्याने तिला विमानप्रवास करायचा नव्हता. क्रूझ शिपनं जाण्याचा पर्यायही याच कारणामुळे बाद झाला.

याच कारणामुळे आता एका अनोख्या बोटीनं प्रवास करत ग्रेटा या परिषदेला पोहोचणार आहे. या बोटीचं नाव आहे मलिझिया - टू (Malizia II).

ही साठ फुटी यॉट पृथ्वी प्रदक्षिणा घालत पार पडणाऱ्या 'वेंडी ग्लोब रेस'साठी (Vendee Globe Race) बांधण्यात आली होती. ही बोट चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा ही बोटीवरचे सोलर पॅनल्स आणि पाण्याखालच्या टर्बाईन्समधून निर्माण करण्यात येते. त्यामुळे पर्यावरणाची हानी करणारं उत्सर्जन या बोटीतून होत नाही.

ग्रेटाला अमेरिकेला घेऊन जायची तयारी मलिझियाच्या टीमने दाखवली आणि ग्रेटाही त्यासाठी तयार झाली. आता ती तिच्या वडिलांसोबत या बोटीने दोन आठवड्यांचा प्रवास करून अमेरिकेला पोहोचेल. ऑगस्टमधल्या परिषदेनंतर ती डिसेंबरमध्येही अमेरिकेतच आणखी एका महत्त्वाच्या परिषदेत सहभागी होणार आहे.

राजकारण्यांकडून टीका

ग्रेटाने सुरू केलेल्या मोहिमेमुळे तिच्यावर आतापर्यंत अनेकदा टीकाही करण्यात आली आहे. जुलै महिन्यात तिच्यासह इतर मुलांनाही फ्रेंच संसदेमध्ये निमंत्रित करण्यात आलं होतं. पण जुन्या विचारसरणीच्या 'रिपब्लिकन्स' आणि उजव्या विचारसरणीच्या 'नॅशनल रॅली' पक्षाच्या खासदारांनी तिच्या भाषणावर बहिष्कार टाकला.

ग्रेटाच्या भाषणावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करताना रिपब्लिकन नेते गिलियम लारिव्ह यांनी ट्विटरवर लिहिलं, "जगाचा अंत होण्याचं भाकित करणाऱ्या गुरुंची आम्हाला गरज नाही."

Image copyright Getty Images

तर इतर काहींनी ग्रेटावर 'प्रॉफेटेस इन शॉर्ट्स' (शॉर्ट्स घालून भविष्य सांगणारी), 'जस्टिन बीबर ऑफ इकॉलॉजी' अशा शब्दांत टीकाही केली.

बहिष्कार टाकणाऱ्यांना ग्रेटाने उत्तर दिलं, "तुम्ही आमचं ऐकण्याची गरज नाही. पण विज्ञान काय सांगतंय हे तुम्ही ऐकायलाच हवं."

युनायटेड किंग्डममध्ये युनायटेड किंग्डम इंडिपेंडन्स पार्टी (UKIP)चे खासदार नील हॅमिल्टन यांनीही ग्रेटाची थट्टा उडवणारं ट्वीट केलं होतं. त्याबद्दल युकेमध्ये त्यांचा निषेध करण्यात येत आहे.

अॅस्पर्गर्स सिंड्रोम

ग्रेटाला अॅस्पर्गर्स म्हणजेच एक प्रकारचा ऑटिझम असल्याचं निदान चार वर्षांपूर्वी झालं.

"वेगळं असणं छान असतं. यामुळे मला वेगळ्या पद्धतीने विचार करता येतो. मी थापांना बळी पडत नाही. जर मी इतरांसारखीच असते तर कदाचित मी हा 'स्कूल स्ट्राईक' सुरूच केला नसता," ग्रेटा बीबीसीशी बोलताना सांगते.

रोझा पार्क यांच्याकडून आपण प्रेरणा घेतल्याचं ग्रेटाने रोलिंग स्टोन मासिकाला सांगितलं होतं. "मला असं समजलं,की त्या इन्ट्रोव्हर्ट आहेत. मी ही अबोल स्वभावाची आहे. एक माणूस किती मोठा बदल घडवून शकतो याचं त्या उत्तम उदाहरण आहेत."

नोबेलसाठी शिफारस

हवामान बदलाबद्दल जागृती घडवणाऱ्या ग्रेटाच्या नावाची शिफारस शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

जगभरामध्ये शांतता नांदावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला हा प्रसिद्ध पुरस्कार दिला जातो.

Image copyright Getty Images

यापूर्वी मलाला युसुफजाई, कैलाश सत्यार्थी, महंम्मद युनुस, नेल्सन मंडेला आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांना हा पुरस्कार मिळालेला आहे.

नोबेलसाठी शिफारस होणं हा आपला बहुमान असल्याचं ग्रेटाने म्हटलंय.

या पुरस्कारासाठी एकूण 301 लोकांची आणि संस्थांची शिफारस करण्यात आली असून ऑक्टोबरमध्ये या पुरस्कारांची घोषणा होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)