काश्मीर कलम 370 : भारतासोबतचा व्यापार थांबवल्याने पाकिस्तानी कामगारांचे हाल

भाजी विक्रेता Image copyright Getty Images

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्याची बातमी मोहम्मद रशीदसारख्या पाकिस्तानी कामगारांना कळताच त्यांच्या रोजीरोटीचा मार्ग आता बंद होणार याची त्यांना स्पष्ट कल्पना आली.

त्यामुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध थांबवण्याची घोषणा केली, तेव्हा या कामगारांना आश्चर्य वाटलं नाही की धक्काही बसला नाही.

मोहम्मद रशीद नियंत्रण रेषेवर चकोठी क्रॉसिंग पॅाईंटवर मजुरी करतात. ते श्रीनगरहून येणाऱ्या आणि मुझफ्फराबादहून भारतात जाणाऱ्या ट्रकमध्ये माल चढवण्याचं आणि उतरवण्याचं काम करतात. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

मोहम्मद रशीद म्हणतात, "व्यापार सुरू होता तेव्हा दर आठवड्याला आम्ही सहा-सात हजार रुपये कमवायचो. सुरुवातीला वाटलं चर्चा होईल, काहीतरी मार्ग निघेल आणि इथे नियंत्रण रेषेवर पुन्हा काम सुरू होईल. आम्ही याच आशेवर होतो. मात्र, नरेंद्र मोदींनी नवा कायदा लागू करून आमच्या आशेवर पाणी फिरवलं."

भारतातल्या कामगारांचेही हाल

हे केवळ पाकिस्तानातलं चित्र नाही. तर व्यापारी सांगतात की व्यापार मार्ग बंद झाल्याने भारतातल्या काश्मीरमधल्या कामगारांचेही हाल होत आहेत.

जम्मू आणि काश्मीरला जोडणार श्रीनगर मार्ग त्या दोन मार्गांपैकी एक आहे जिथून नियंत्रण रेषेच्या अलिकडे आणि पलिकडे व्यापार होतो. मात्र, आता इथली गजबज कमी झाली आहे.

Image copyright Getty Images

भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी जवळपास 11 वर्षांपूर्वी नियंत्रणरेषेवरून व्यापार सुरू केला होता. दोन्ही देशांनी व्यापारयोग्य 21 उत्पादनांची यादी तयार केली. त्यानंतर उरी-मुझफ्फराबाद मार्ग आणि पूंछ-रावलकोट मार्ग व्यापारासाठी खुला करण्यात आला.

व्यापार संबंध स्थापित करण्याच्या निर्णयामुळे अनेक वर्षांनंतर या मार्गांवरून मालवाहू ट्रक ये-जा करू लागले होते. काश्मिरी नागरिकांना एकमेकांना भेटण्याची, व्यापाराची संधी मिळाली. शिवाय हजारो लोकांना रोजीरोटी मिळाली.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतासोबतचा व्यापार थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र, नियंत्रणरेषेवरून होणारा व्यापार आधीच बंद आहे आणि तो भारतानेच थांबवला होता.

'काश्मीर आंदोलनाला प्रथम प्राधान्य'

चकोठी सेक्टरमधला क्रॉसिंग पॉइंट भारताने एप्रिल महिन्यातच बंद केला होता. या मार्गाने पाकिस्तान काश्मीर खोऱ्यात शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचा आरोप भारताने केला होता. त्यामुळे पाकिस्तान कठोर कारवाई करत नाही तोवर व्यापार बंद राहील, असा निर्णय भारताने घेतला होता.

Image copyright Getty Images

पाकिस्तानने मात्र, आरोपांचं नाकारत भारताने उचलेलं पाऊल खेदजनक असल्याचं म्हटलं होतं. याच कारणामुळे मोहम्मद रशीद यांना वाटतं की त्यांच्यावर ओढावलेल्या आर्थिक संकटाचं कारण भारत आहे.

ते म्हणतात, "भारताने चार महिन्यांपूर्वी व्यापार बंद करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे माझ्यासारखे तीनशेहून जास्त कामगार घरी बसले. आमच्या चुली पेटल्याच नाही."

नियंत्रण रेषेवर होणाऱ्या व्यापाराशीसंबंधित गौहर अहमद कश्मिरी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काश्मीरचं आंदोलन आहे.

ते म्हणतात, "मात्र, हेदेखील वास्तव आहे की व्यापारी काळजीत आहेत. शिवाय ही समस्या नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूने आहे. विशेषकरून कामगार वर्ग हतबल झालाय. कारण त्यांच्यासाठी रोजगाराचा एक मार्ग तयार झाला होता आणि तो मार्ग आता बंद आहे."

Image copyright Getty Images

"ते कामगार आता कशा स्थितीत आहेत याची नियंत्रण रेषेच्या पलिकडे असणाऱ्यांना काळजी नाही आणि अलिकडल्यांनाही नाही."

चकोठी सेक्टरवर गोदामांमध्ये चार महिन्यांपासून माल भरून आहे. ते पुढे सांगतात, "तो माल आता आम्ही माघारी बोलवू शकत नाही आणि पुढेही पाठवू शकत नाही. व्यवस्था जॅम करून ठेवलीय. सामान नियंत्रण रेषेच्या पलिकडे पाठवण्यासाठी फैसलाबाद, लाहौर, पंडी इथल्या मंडयांतून आम्ही माल उचलला होता. मात्र, त्यांनी नव्याने लावलेल्या निर्बंधांमुळे सगळं संपलं."

"व्यापाऱ्यालाही फटका बसला, दुकानदारालाही फटका बसला आणि मंडईलाही फटका बसला. व्यापारी मार्ग आज नाही तर उद्या खुला होईल, यासाठी तेव्हा प्रयत्न सुरू होते. मात्र, आता भारताने जी परिस्थिती वाढून ठेवली आहे, त्यातून कुठलाच तोडगा निघताना दिसत नाही."

गौहर अहमद काश्मिरी सांगतात की दोन्ही बाजूंकडून ज्या 21 वस्तूंच्या आदान-प्रदानाला परवानगी होती त्यात सर्वात प्रसिद्ध श्रीनगरहून येणाऱ्या शाली होत्या. त्या हातोहात खपायच्या. याव्यतिरिक्त दोन्ही बाजूंनी फळं, मसाले, कालीन आणि फर्निचर यांचा व्यापार व्हायचा.

भारताच्या काश्मिरातून येणाऱ्या वस्तुंमध्ये जडी-बुटी आणि भाज्यांव्यतिरिक्त गालिचे, लाकडाचं फर्निचर आणि कपड्यांचा समावेश आहे. तर पाकिस्तानच्या काश्मिरातून येणाऱ्या मालात तांदूळ, अक्रोड, डाळी आणि कपडे यांचा समावेश आहे.

Image copyright Getty Images

भारताच्या निर्णयानंतर आम्ही पाकिस्तान सरकारकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की व्यापार तर थांबवण्यात आला आहे. मात्र, प्रवाशांची ये-जादेखील थांबवली जाणार आहे का? तेव्हा याविषयी आम्हाला माहिती नसल्याचं प्रशासनाने सांगितलं.

सेंट्रल ट्रेड युनियन ऑफ मुझफ्फराबादचे अध्यक्ष शौकत नवाज मीर सांगतात की सर्वच व्यापारी काश्मीर आंदोलनाला पहिलं प्राधान्य देतात आणि व्यापार दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ते म्हणाले, "एक काश्मिरी या नात्याने मला हे पक्कं माहिती आहे की मला कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं तरीदेखील मी काश्मीरच्या आंदोलनाला प्रथम प्राधान्य देईल आणि व्यापाराला दुसरं प्राधान्य."

वस्तूंच्या बदल्यात दुसऱ्या वस्तू देऊन व्हायचा व्यापार

ते सांगतात की भीती तर वाटायची. मात्र, दोन्हीकडून मार्ग खुला असल्याने थोडी आशा होती. कारण काहीतरी व्यापार होता. वस्तूच्या मोबदल्यात वस्तू तरी मिळायच्या.

"आज दोन्हीकडचा व्यापारी त्रस्त आहे. मात्र, हेदेखील स्पष्ट आहे की नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूकडचे व्यापारी कधीच व्यापाराला काश्मीर मुद्द्यापेक्षा जास्त प्राधान्य देणार नाही. पाकिस्तानने जो निर्णय घेतला तो असहाय्यतेतून घेतला. आधी भारताने काश्मीरमध्ये बेकायदा पावलं उचलली आणि काश्मिरी लोकांच्या हक्कांवर गदा आणली. काश्मिरी आपल्या पोटावर दगड बांधेल, मात्र, काश्मीरच्या मुद्द्यावर कधीच समझोता करणार नाही."

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकारी आकडेवारीनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात दरवर्षी 3 अब्ज रुपयांहून जास्त व्यापार होतो. दोन्ही बाजूकडून 35-35 ट्रक येण्याची आणि जाण्याची परवानगी आहे.

हे ट्रक आठवड्यातून चार दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सीमेपार जायचे. 300 नोंदणीकृत व्यापारी आहेत. त्यांच्यासाठी व्यापाराचे कठोर नियम आखण्यात आले आहेत. इथे व्यापाराची बार्टर सिस्टिम आहे. म्हणजे पैसे देऊन वस्तू विकत न घेता वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जाते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)