बेट्टी बिगोम्बे : युद्धखोराचं मन बदलणारी स्त्री

बेट्टी बिगोम्बे आणि ब्रिग सॅम कोलो (उजव्या बाजूला) Image copyright Reuters
प्रतिमा मथळा बेट्टी बिगोम्बे आणि ब्रिग सॅम कोलो (उजव्या बाजूला)

ही कहाणी आहे उत्तर युगांडात किशोरवयीन मुलांना युद्धाचं प्रशिक्षण देऊन, विरोध करणाऱ्याचे हात-पाय कापून दहशत पसरवणाऱ्या क्रूरकर्मा जोसेफ कोनीला युद्धसमाप्तीच्या उंबरठ्यावर आणणाऱ्या धाडसी बेट्टी बिगोम्बे यांची. जे आजवर कुणालाही जमलं नाही, ते उत्तर युगांडासारख्या अतिमागास भागातील या स्त्रीने कुणाचीही मदत न घेता एकटीच्या हिमतीवर करून दाखवलं.

युगांडाच्या उत्तर भागात जन्मलेल्या बेट्टी बिगोम्बे 1950 च्या दशकात शाळेत जाण्यासाठी रोज चार मैलांची पायपीट करायच्या. कारण फक्त एकच. त्यांना ठाऊक होतं की त्यांचं आणि त्यांच्या समाजाचं शोषिक आयुष्य बदलण्याची ताकद फक्त आणि फक्त शिक्षणातच आहे.

(या लेखातला काही मजकूर अस्वस्थ करू शकतो)

त्यावेळी त्यांना कल्पनाही नव्हती की हेच शिक्षण एक दिवस त्यांना लॉर्ड्स रेझिस्टंस आर्मीचा नेता आणि कुख्यात बंडखोर जोसेफ कोनीशी शांततेसाठी वाटाघाटी करण्यापर्यंत आणि या क्रूरकर्म्याच्या अनन्वित अत्याचाराखाली पिचलेल्या तिच्या भागाचं भवितव्य बदलण्यापर्यंत नेऊन ठेवेल.

बिगोम्बे तिच्या 11 भावंडांपैकी आठवी. बहुपत्नित्वाला सामाजिक मान्यता असलेल्या समाजात त्या वाढल्या.

त्या सांगतात, "मी शिक्षण घेतलं नसतं तर कदाचित मला आज 20 मुलं असती. पाठीवर एक मूल बांधून, सोबत एक रांगणारं मूल घेऊन मी शेतात खुरपणी, लावणी, तोडणी, अशी काम करत असते. मला कदाचित 2-3 सवती असत्या."

त्यांच्या समाजात मुली क्वचितच शिकतात. तिथल्या मुली लहानपणीच शिक्षण सोडायच्या. मात्र, बिगोम्बे किशोरवयात येईपर्यंत शिकत होत्या. शिक्षणासाठीची आर्थिक मदत त्यांना एका चर्चने पुरवली. पुढे त्यांना हार्वर्डची शिष्यवृत्ती मिळाली.

1980 साली त्या घरी परतल्या. एव्हाना त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना दोन मुलंही होती. याच काळात त्यांच्या देशात युद्ध सुरू झालं होतं. राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटोचं सैन्य योवेरी मुसेविनीच्या गमिनी चळवळीचा सामना करत होतं.

त्या सांगतात, "त्यावेळी राष्ट्राध्यक्षांच्या बाजूने असणाऱ्या काही लोकांना मी आश्रय दिला होता. त्यावेळी मी एका जर्मन महिलेसोबत काम करत होते. ती महिला संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थ्यांसाठी काम करणाऱ्या UNHCR या संस्थेशी संलग्न होत्या. ज्या लोकांच्या जीवाला धोका आहे अशा लोकांना आम्ही गुपचूप केनियामध्ये पाठवायचो. आमच्याकडे संयुक्त राष्ट्रांचा झेंडा असल्याने कामगिरी सोपी होती. नाकाबंदी असलेल्या ठिकाणांहूनही आम्हाला जाण्याची परवानगी मिळायची आणि त्यांना आम्ही सुरक्षित स्थळी पोचवायचो. इथेच माझ्या मनात अन्यायाविरोधात लढण्याची ठिणगी पेटली."

Image copyright Betty bigombe
प्रतिमा मथळा बेट्टी बिगोम्बे त्यांच्या आई आणि बहिणीसोबत

1986 साली मुसेव्हिनी राष्ट्राध्यक्ष झाले. ते आजही या पदावर आहेत. त्यांनी बिगोम्बे यांना सरकारमध्ये मंत्रीपद देऊन त्यांचा गौरव केला.

त्या सांगतात, "माझी नियुक्ती झाली तेव्हा माझी खूप निराशा झाली. कारण त्यावेळी सगळी कामं ही पुरूषच करायचे. ते मला फक्त बसून कागदपत्र वाचायला सांगायचे. त्यामुळे मी थेट राष्ट्राध्यक्षांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला राजीनामा द्यायचा आहे. कारण मला ऑफिसमध्ये कोडी सोडवत बसायचं नाही, ऑफिसमध्ये बसून एखादी कादंबरी वाचत बसायचं नाही. मला काम करायचं आहे. मला राजीनामा द्यायचा आहे हे ऐकून त्यांना धक्काच बसला. आफ्रिकेतले मंत्री राजीनामा देत नाहीत. विशेषतः महिला मंत्री."

त्यानंतर बिगोम्बे यांनी राष्ट्राध्यक्षांसमोर एक प्रस्ताव ठेवला. देशाच्या उत्तर भागात युद्ध सुरू झालं होतं. त्यामुळे बंडखोर नेमके कुठे आहेत आणि त्यांनी त्यांचा शस्त्रसाठा कुठे ठेवला आहे, आपण स्वतः जाऊन शोधण्याची आपली इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.

बिगोम्बे यांच्या प्रस्तावावर विचार करून राष्ट्राध्यक्ष मुसेव्हिनी यांनी प्रतिप्रस्ताव मांडला. ते बिगोम्बे यांना उत्तर युगांडात पाठवायला तयार होते. मात्र, बिगोम्बे यांनी बंडखोरांशी युद्धसमाप्तीसाठी वाटाघाटी कराव्या, अशी अट त्यांनी ठेवली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जोसेफ कोनी 2006 मध्ये

हा आत्मघात आहे, असाच सल्ला त्यांना त्यांच्या आप्तेष्टांनी आणि कुटुंबीयांनी दिला.

"मला अनेकांनी सांगितलं, 'राजीनामा दे, त्यांना तुला ठार करायचं आहे.' मित्र येऊन सांगायचे, 'हे महिलांचं काम नाही. त्यांनी हे काम तुला का दिलं? तुला कसलाच अनुभव नाही.'"

लॉर्ड्स रिसिस्टंट ऑर्मीचा क्रूर नेता जोसेफ केनी याच्याशी वाटाघाटी करायला कुणीच तयार नव्हतं, हे तर उघडच होतं. केनी सुरुवातीला बुवाबाजी करायचा. त्यानंतर त्याने स्वतःला देवाचा प्रेषित घोषित केलं होतं. त्याने त्याच्या मेसिअॅनिक पंथाच्या लोकांना मुलींचं अपहरण करून त्यांच्यांवर बलात्कार करायला सांगितलं होतं. किशोरवयीन मुला-मुलींचं अपहरण करून त्यांना हत्यार चालवण्याचं प्रशिक्षण द्यायला सांगितलं.

अशा या लॉर्ड्स रेझिस्टंट आर्मीने बिगोम्बेला पत्र पाठवलं. त्यात लिहिलं होतं, राष्ट्राध्यक्ष मुसेव्हेनी यांनी एका महिलेला वाटाघाटासाठी पाठवून आमचा अपमान केला आहे. बंडखोरांना बिगोम्बे यांना ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, बिगोम्बे युद्ध संपवण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. यानंतर बंडखोरांनी एका मुलाचा अनन्वित छळ करून त्यालाच रक्ताने माखलेलं दुसरं पत्र घेऊन पाठवलं.

त्या सांगतात, "त्या मुलाकडे बघून मला वाटलं हा मेला कसा नाही. तिथे टिटॅनसचं इंजेक्शन नव्हतं. किंवा काहीच नव्हतं. त्याचे ओठ फाडले होते. हातपाय तोडले होते. तो रक्तबंबाळ झाला होता. मला उद्देशून लिहिलेलं पत्रही रक्ताने माखलं होतं. अर्थातच मी त्याला हातही लावू शकले नाही."

मात्र, बिगोम्बेंचा निश्चय ढळला नाही. त्यांनी कोनीला पत्र लिहिण्याचं ठरवलं. त्यांनी पत्रात कोनीचा उल्लेख 'माझ्या मुला' असा केला आणि त्याच्याशी जोडून घेण्यासाठी धर्माचा आधार घेतला.

पुढे कोनीने त्यांच्याशी भेटायला होकार दिला. मात्र, बिगोम्बेंना भीती होती की कोनी आपलाही छळ करेल. त्यामुळे कोनीने बंदी बनवण्याआधी आपणच स्वतःला मारुन टाकायचं, असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं.

Image copyright centre of humanitarian dialogue
प्रतिमा मथळा सेंटर ऑफ ह्यूमनीटेरियन डायलॉगमध्ये बोलताना बिगोम्बे

अतिशय घनदाट जंगलाच्या आत दोघांची पहिली भेट झाली.

त्या सांगतात, "त्या अवतीभोवती सुरक्षारक्षक होते. चर्चमधलं संगीत सुरू होतं. काही पुरुषांनी नन्सचे कपडे घातले होते. त्यांच्या हातात बंदुकी होत्या. ते मंत्रोच्चार करत होते आणि आपल्या शरिरातून भूत-पिशाच्च बाहेर पडत आहेत, असं म्हणत ते खाली कोसळत होते. ते सगळं खूप विचित्र होतं. त्याने लष्करी गणवेश घातला होता. तो नक्कीच धमकावण्याच्या इराद्याने आला होता."

पुढच्या 18 महिन्यात दोघांच्या अनेकदा भेटी झाल्या. आता तो बिगोम्बेला 'आई' म्हणू लागला होता. नंतर नंतर तो राष्ट्राध्यक्ष मुसेव्हिनी यांच्याशी शांतता चर्चा करण्यासाठी जंगलातून बाहेर यायला तयार झाला.

बिगोम्बे परतल्या आणि त्यांनी राष्ट्राध्यक्षांना वाटाघाटीसाठी वातावरण तयार करण्याचा, असा सल्ला दिला. मात्र, मुसेव्हिनी यांनी बिगोम्बे यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत सार्वजनिक सभा घेतली आणि कोनीने तात्काळ जंगलातून बाहेर यावं, अन्यथा सैन्याचा सामना करण्यास सज्ज हो, असं आव्हान दिलं.

चवताळलेल्या कोनीने राष्ट्राध्यक्षांच्या या आव्हानाला सुदानच्या सीमेवर 300 लोकांच्या कत्तली करून उत्तर दिलं.

उद्विग्न झालेल्या बिगोम्बे यांनी राजीनामा दिला आणि त्या अमेरिकेला निघून गेल्या.

त्या सांगतात, "मी उद्ध्वस्त झाले होते. विमानात मी रडले. तो खूपच दुःखद पराभव होता. पण, ते माझं नाही तर लोकांचं दुःख होतं."

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा उत्तर युगांडामधील जंगलातील चर्चा

त्यांनी पुन्हा हार्वर्डमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर वॉशिंग्टनमध्ये जागतिक बँकेत नोकरीवर रूजू झाल्या. पुढे 2004 सालच्या एका सकाळी त्यांनी टीव्ही सुरू केला आणि सगळंच बदललं. सीएनएन या वृत्तवाहिनीवर बातमी सुरू होती. लॉर्ड्स रेझिस्टंट आर्मिनी कॅम्पवर हल्ला चढवून 300 लोकांना ठार केलं होतं.

त्या सांगतात, "मग एका बातमीच्या फ्रेममध्ये माझा फोटो आला. एकमेव व्यक्ती जिने युद्ध जवळपास संपवलं होतं. एकमेव व्यक्ती जी बंडखोरांच्या नेत्याला भेटली होती, असा उल्लेख होता. तेव्हा मला वाटलं हे माझ्यासाठी बोलावणं आहे."

बिगोम्बे युगांडात परतल्या आणि त्यांनी कोनीसोबत पुन्हा एका नव्या भेटीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना वाटलं की युगांडा सरकारचा निधी घेतला तर तो आपल्या निष्पक्षपातीपणाशी तडजोड केल्यासारखं होईल. त्यामुळे त्या स्वतःच्या पैशाने गेल्या. त्यांनी त्यांच्या मुलीच्या शिकवणीसाठी साठवलेली रक्कम खर्च केली.

एव्हाना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) कोनीला युद्ध गुन्हे आणि मानवतेविरोधातल्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं होतं. बिगोम्बे यांच्या कार्याने 2006 साली दक्षिण सुदानमध्ये शांतता चर्चेचा पाया रचला. मात्र, ऐनवेळी कोनीने शांतता करारावर स्वाक्षरी करायला नकार दिल्याने चर्चा फिस्कटली.

तेव्हापासून कोनी आणि त्याचे सहकारी फारसे सक्रीय नाहीत. सध्या त्याची प्रकृतीही खालावल्याचं कळतं. शिवाय, त्याच्या दलात आता केवळ 100 माणसं उरली असल्याचीही माहिती आहे.

सध्या बिगोम्बे त्यांच्या युगांडामधल्या अनुभवाच्या आधारे दक्षिण सुदानमध्ये संघर्षात त्यांच्या परीने मध्यस्थ म्हणून काम करत आहेत. कोनीचा त्यांच्या आयुष्यावर आणि त्यांचा कोनीच्या आयुष्यावर बराच परिणाम झाला आहे.

त्या सांगतात, "काही दिवसांपूर्वीच मी त्याच्या एका साथीदाराला भेटले. ते मला शोधत होते. हे खूपच विचित्र होतं. मात्र, ते शोधत होते. काही महिन्यांपूर्वी माझा त्यातल्या एकाशी संपर्क झाला, तो म्हणाला, 'सध्या कोनी अत्यव्यस्थ आहे. त्याला यायचं आहे.' आणि मी म्हणाले, 'खेळी खेळणं बंद करा. मला पुरावा दाखवा. त्याला मला कॉल करू द्या. मी त्याचा आवाज ओळखते.'"

अधिक माहितीसाठी

- बेट्टी बिगोम्बे यांनी बीबीसी रेडियो 4च्या 'Her Story Made History' या नव्या मालिकेच्या दुसऱ्या भागात बीबीसीच्या लिझे डोसेट यांच्याशी बातचीत केली आहे.

- ही मुलाखत तुम्ही ऑनलाईन बघू शकता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)