काश्मीर कलम 370: लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्ताबाहेर निदर्शनं

लंडनमधील निदर्शन
प्रतिमा मथळा लंडनमधील निदर्शन

भारतानं काश्मीरचा स्वतंत्र दर्जा काढून घेतल्याचे पडसाद लंडनमध्येही उमटले आहेत. लंडनच्या भारतीय उच्चायुक्ताबाहेर या निर्णयाविरोधात काही गटांनी निदर्शनं केली तर काही गटांनी भारतीयांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

भारतीय समुदायाच्या लोकांनी आनंद साजरा केला आणि जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र दर्जा काढून घेतल्याचं समर्थन केलं.

लंडनमधील भारतीय उच्चायुक्ताबाहेरील निदर्शनामध्ये दक्षिण आशियातील लोकांचे समूदाय सहभागी होते. भारत सरकारनं कलम 370बद्दलचा निर्णय रद्द करावा, अशी निदर्शकांनी मागणी केली.

ब्रिटनच्या काश्मीर काउन्सिलनं या निदर्शनाचं आयोजन केलं होतं. याला पाठिंबा देण्यासाठी काही खलिस्तानी गटही सहभागी झाले होते.

काश्मीर काउन्सिलशी संबंधित विद्यार्थ्यांनी मंगळवारी या निदर्शनाची तयारी केली होती. यासाठी अनेक बॅनर आणि पोस्टर तयार करण्यात आले होते.

गुरुवारी (15 ऑगस्ट) झालेल्या निदर्शनामध्ये मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले होते, असा आयोजकांचा दावा आहे.

बीबीसी प्रतिनिधी गगन सबरवाल यांच्या मते, काही शीख संघटनाही यात सहभागी झाल्या होत्या.

निदर्शकांनी बीबीसीला सांगितलं, "सरकारचा निर्णय म्हणजे एक प्रकारची बळजबरी आहे. कारण काश्मीरविषयी निर्णय घेण्याचा अधिकार तिथल्या स्थानिकांना असायला पाहिजे. सरकारचा निर्णय म्हणजे काश्मीरच्या नागरिकांच्या अधिकारांवर अतिक्रमण आहे. बेकायदेशीररीत्या हे पाऊल उचलण्यात आलं आहे."

संयुक्त राष्ट्रानं काश्मीरच्या लोकांचं जनमत जाणून घ्यायला हवं, असं एका निदर्शकानं सांगितलं.

तर भारत सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्यांचं म्हणणं होतं, "भारत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक आहे. आम्ही याचाच आनंद साजरा करण्यासाठी इथं जमलोय."

एका महिला समर्थकानं म्हटलं, "मी नरेंद्र मोदींचं मनापासून अभिनंदन करते. भारतासाठी ते मोठी पावलं उचलत आहेत, जे आजवर कुणीच उचलले नाहीत."

प्रतिमा मथळा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देणारा मोर्चा

"सरकारच्या या निर्णयामुळे काश्मीरचा विकास वेगानं होईल. तुम्ही पाहा काश्मीर किती पुढं जाईल ते," असं एका समर्थकाने सांगितलं.

या निदर्शनावेळी स्कॉटलँड यार्डचे 100हून अधिक सुरक्षारक्षक तैनात होते.

लंडन वगळता बर्मिंगहम, लूटन, ब्रेडफर्ड आदि शहरांमध्येही काश्मीरच्या मुद्द्यावर भारत सरकारच्या विरोधात निदर्शनं झाली आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)