'पुढे रस्ताच उरला नसल्याचं लक्षात आलं, माझी गाडी हवेत तरंगू लागली होती'

इटली, पूल, बांधकाम Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पुलाची झालेली अवस्था

इटलीतल्या जेनोव्हा पुलावरून दररोज हजारो गाड्यांची वाहतूक होत असे. शहराची लाईफलाईन असणारा हा पूल कोसळण्याला आता वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे.

हा पूल तुटला तेव्हा 45 मीटरच्या उंचीवरून गाड्या खाली कोसळल्या. या दुर्घटनेत 43 जणांचा मृत्यू झाला.

या अपघाताने सात लोकांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम झाला.

13 ऑगस्ट 2018 रोजी इमॅन्युअल डियाज भाऊ हेन्री मोरांडी पुलावरून जात होते. मानसशास्त्राच्या शिक्षणासाठी इमॅन्युअल कोलंबियाला जाणार होते. त्यांना सोडण्यासाठी हेन्री त्यांच्याबरोबर विमानतळावर जात होते.

इमॅन्युअल यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगितलं. 'मी घरापासून दूर जाणार होतो. मी हेन्रीला आलिंगन दिलं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं मी त्याला सांगितलं. मला अस्वस्थ वाटत होतं. त्याला सोडून जाताना मला वाईट वाटत होतं. मला सोडून परत जातानाचे शब्द मला आजही आठवतात- इमॅन्युअल, मला आता निघायला हवं'.

प्रतिमा मथळा इमॅन्युअल डियाज

तो एक नशिबाने घडवून आणलेला योगायोग होता. नियतीनेच आम्हाला एकमेकांना अलविदा करण्याची संधी दिली. हेन्री कायम सोबत असावा असं मला वाटे.

पुढच्या दिवशी सकाळी इमॅन्युअल बोगोटामध्ये कनेक्टिंग फ्लाईटची वाट बघत होते. तिथे बातम्या चाळत असताना त्यांना जेनोवा पुल पडल्याचं कळलं.

काहीतरी गडबड झाली आहे याची मला जाणीव झाली. आम्हा भावांचं नातं खास होतं. आता हेन्रीचा फोटो पाहतो तेव्हा तो किती दूर गेला आहे याची जाणीव होते.

'जेव्हा मी मैडलिनला पोहोचलो तेव्हा माझ्या, हेन्रीच्या मित्रांना फोन करायला सुरुवात केली. इटलीत आईला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण पदरी निराशाच पडली. मी घरापासून 14,000 किलोमीटर दूर येऊन पडलो होतो. ऑनलाईन जेवढ्या बातम्या वाचता येईल ते वाचायचा प्रयत्न केला. आमच्याकडे पिवळ्या रंगाची गाडी होती. दुरुनही ही गाडी ओळखता येऊ शकते'.

'फेसबुकवरच्या एका पेजवर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होतं. पुल कोसळला, त्याखालच्या ढिगाऱ्यातून पिवळ्या रंगाची गाडी बाहेर काढताना मी पाहिलं. तेव्हाच मनात चर्र झालं. हेन्री गेला हे माझ्या लक्षात आलं. गाडीची अवस्था बघून कोणी वाचण्याची शक्यता धुसर आहे हे उमगलं होतं. मी मटकन खाली बसलो. शरीरातलं चैतन्य हरवून गेल्यासारखं झालं'.

डेप्युटी अभियोजक पाओलो डी ओवितियो सुट्टी संपवून घरी येत होते. फोन ते घरीच विसरून गेले होते. हे सांगण्यासाठीच त्यांनी बायकोला फोन केला.

बायकोने त्यांना टीव्ही बघण्यास सांगितलं. मोरांडी पुल तुटला आहे हे बायकोने त्यांना सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पुलाची झालेली अवस्था

ते सांगतात, 'मी तात्काळ घरी गेलो. फोन घेऊन पोलिसांकडे गेलो. घटनेनंतर तासाभरात आम्ही घटनास्थळी पोहोचलो. तिथे अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, पत्रकार आधीच येऊन पोहोचले होते. सतत पाऊस पडत होता. मी निराश झालो होतो. तेव्हा मी जे पाहिलं ते दृश्य डोळ्यासमोरून आजही जात नाही. लोक जोराजोरात ओरडत होते. बरेचजण रडत होते. ढिगाऱ्याखाली कोणी जिवंत आहे का हे पाहण्यासाठी स्निफर डॉग हुंगत फिरत होते. पुलाचे मोठे मोठे तुकडे अस्ताव्यस्त पडून विखुरले होते. पुलावरून एक गाडी पडताना लटकली होती. त्या गाडीचा ड्रायव्हर अधांतरी अडकला होता'.

जिवंत व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढणं हे काम प्राधान्याने करणं आवश्यक असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर नक्की काय घडलं याचा तपास सुरू करायला लागणार होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डेव्हिड कापेलो

पुल पडला तो दुर्देवी क्षण डेव्हिड कापेलो यांनी पाहिला होता. पूल पडला तेव्हा ते फोक्सवॅगन टिगुआन मध्ये होते. त्यांची गाडी पुलावर जातच होती तेवढ्यात धातूचं मोठं काहीतरी पडल्याचा धापकन आवाज आला.

'एखाद्या स्फोटासारखा आवाज झाला. धातूचं काहीतरी मोठं पडलं असं वाटलं. पूल मध्यातून निखळला. थोडा वेळ काय होतंय मला कळलंच नाही. माझ्या डोळ्यासमोर पूल तुटला. माझ्यासमोरच्या गाड्या कोसळणाऱ्या पुलासह खाली पडू लागल्या'.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पूल असा कोसळला

'मी तात्काळ ब्रेक लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे रस्ताच उरला नसल्याचं लक्षात आलं. माझी गाडी हवेत तरंगू लागली होती. मी खाली पडण्याच्या बेतात होतो. स्टिअरिंग व्हीलवरचे हात काढून घेतले आणि मी मरतोय असं जोराने ओरडू लागल्याचं माझ्या लक्षात आहे. हे सगळं अवघ्या काही सेकंदात घडलं.

मला घाबरून जायला देखील वेळ मिळाला नाही. माणूस किती असहाय्य होऊ शकतो हे माझ्या लक्षात आलं. सगळं काही संपून जाणार होतं'.

माझं नशीब बलवत्तर की मी ढिगाऱ्यावर जाऊन पडलो. माझ्या गाडीचा मागचा भाग जमिनाला जाऊन टेकला. एखादं क्षेपणास्त्र पुलावर येऊन आदळलं आहे असं वाटलं.

मी मेलो नाही, जिवंत राहिलो होतो हे समजायला थोडा वेळ लागला. वीस मिनिटं गाडीबाहेर येऊ शकलो नाही. माझ्या चहूबाजूंना मोडलेल्य फुटलेल्या गाड्या होत्या. गाड्यांमध्ये आतमध्ये माणसं अडकली होती. एखाद्या युद्धासारखी ती परिस्थिती होती.

मिम्मा सर्टो त्यावेळी पुलाखालच्या आपल्या घरात होत्या. त्यांनाही एका मोठ्या धमाक्याचा आवाज ऐकू आला.

'मी आंघोळ करत होते. ढगांच्या गडगडण्याचा आवाज वाटला. मात्र तो आवाज थांबत नव्हता. मोठाल्या शिळ्या एकमेकांवर आदळत आहेत असं वाटलं. गाड्या खाली पडत आहेत हे माझ्या लक्षात आलं नाही. मात्र थोड्या वेळातच लोकांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या'.

प्रतिमा मथळा त्या बिल्डिंगमधून पूल असा दिसतो.

'मी खिडकी उघडली आणि पाहिलं तर नदीत गाड्या पडत होत्या. गाड्यांचे हेडलाईट्स जळत असल्याचे मी पाहिले. पुल गायब झाल्याचं भयंकर दृश्य मी पाहिलं. मी अक्षरशः गोठून गेले. बॅग घेतली, चप्पल घातली आणि त्वरित घराबाहेर निघाले. मी माझ्या बहिणीला फोन केला. अपघाताचे फोटोही पाठवले. मोरांडी पुल तुटला यावर कोणाचाही विश्वास बसेना'.

मिम्मा यांची बहीण ऐना रीटा सर्टो कामानिमित्ताने शहराबाहेर होत्या. दोन्ही बहिणींचं वय साठीच्या आसपास होतं. 1960च्या दशकात त्या दोघींनी त्यांच्यासमोर या पुलाची निर्मिती होताना पाहिलं आहे.

प्रतिमा मथळा मिम्मा आणि ऐना रीटा सर्टो

हा पुल माझ्या बालपणीच्या आठवणीत होता. राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते या महाकाय पुलाचं उद्घाटन झालं. वास्तूरचनेचा अद्भुत नमुना असा तो पूल होता. इटलीच्या विकासाचं तो पूल प्रतीक होता.

जेव्हा मी अपघाताचे फोटो पाहिले तेव्हा कोणीतरी गंमत करत आहे असं मला सुरुवातीला वाटलं. मी लहानपणापासून या पुलाला पाहते आहे. तो पूल माझ्या मित्रासारखा होता. माझा मित्र कोणाच्या मृत्यूचं कारण कसं काय होऊ शकतं? असं ऐना रीटा सर्टो म्हणाल्या.

वास्तूरचनाकार प्रोफेसर कार्मेलो जेन्टाइल इटलीपासून हजार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या युनानमध्ये सुट्यांचा आनंद घेत होते. त्यांना भावाकडून या अपघाताविषयी कळलं.

प्रतिमा मथळा प्रोफेसर कार्मेलो जेन्टाइल

'भावाचा मेसेज वाचून मी सुन्न झालो. 20 मिनिटं काय झालं आहे त्यावर विश्वासच बसला नाही. माझं डोकं काम करेनासं झालं'.

वर्षभरापूर्वीच मिलान पॉलिटेक्निकमध्ये आपल्या टीमसह ते याच पुलाच्या जीर्णोद्धाराची योजना तयार करत होते. काम सप्टेंबरमध्ये सुरू होणार होतं, म्हणजे पूल पडला त्याच्या महिनाभरानंतर.

पुलाची मजबूती मोजण्यासाठी आम्ही सेन्सर्सचा वापर केला होता. पुलाचा जो भाग पडला त्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या.

परीक्षण करताना जी गोष्ट सर्वसामान्य नाही, किंवा निर्धारित वेळेपेक्षा तारीख उलटून गेली आहे त्याचा सखोल अभ्यास करतो. जेवढं लवकरात लवकर काम सुरू करता येईल तेवढं सुरू करतो.

पुलाची स्थिती काय याची नियमित देखरेख केली जात होती असं पुलाची जबाबदारी असणाऱ्या ऑटोस्ट्रेड कंपनीचं म्हणणं आहे. ठराविक टप्प्याने पुलाची तपासणीही केली जात होती. परंतु कोणत्याही तपासणीत पुलाला तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे असं स्पष्ट झालं नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मोरांडी पूल असा दिसायचा

जेन्टाइलने आपला अहवाल एसपीए इंजिनियरिंगकडे सोपवला. एसपीए ऑटोस्ट्रेडची सबसिडिअरी कंपनी आहे. हीच कंपनी पुलासंदर्भात निर्णयांची अंमलबजावणी करते.

त्यांनी मला आणखी तपासणी करायला सांगितली असती तर कदाचित मी समस्येच्या मुळापर्यंत गेलो असतो. कदाचित तपासणीला सुरुवात केल्या केल्या समस्या लक्षात आली असती. यासंदर्भात मी तपशीलात न्यायाधीशांसमोर गोष्टी मांडू शकलो असतो. सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरची वाहतूक थांबवू शकलो असतो.

डेप्युटी अभियोजक पाओलो डी ओवेतियो आणि त्यांच्या चमूने अपघाताशी संबंधित सगळे पुरावे एकत्र केले. आता हे पुरावे न्यायाधीशांसमोर सादर केले जाणार आहेत. यासंदर्भात त्यांनी अधिकारी ते इंजिनियर आणि तंत्रज्ञ अशा 80हून अधिक लोकांच्या भूमिकेची तपासणी करणार आहेत.

पूल तुटणार आहे हे ऑटोस्ट्रेड कंपनीला माहिती होतं असं डीओवेतिया म्हणत नाहीत.

प्रतिमा मथळा पाओलो डीओवितियो

पुलाच्या जोखिमेबाबत योग्य पद्धतीने मूल्यांकन झालं नाही आणि हा गुन्हा आहे असं त्यांना वाटतं.

पुरावे म्हणून त्यांनी ढिगाऱ्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत.

ऑटोस्ट्रेड कंपनीच्या म्हणण्यानुसार पुलाच्या डागडुजीचं काम सुरू होतं. पुल मोडून पडण्याच्या आधी त्याच्या दुरुस्तीसंदर्भात गेल्या तीन वर्षात 90 लाख युरो एवढा खर्च करण्यात आला होता.

कंपनी पुलाच्या डागडुजीबाबत जागरूक होती मग पुलाचा तो तुटलेला स्तंभ योग्यवेळी का उभारण्यात आला नाही असा सवाल पाओलो यांनी केला.

ही कंपनी इटली सरकारच्या अखत्यारीत असताना 1990च्या दशकात पुलाच्या खांबांचं नूतनीकरण करण्यात आलं. त्यावेळी प्रोफेसर कार्मेलो जेन्टाइल त्या योजनेचा भाग होते.

पुलाबाबत काही गोष्टी चिंताजनक होत्या असं त्यांना वाटलं होतं.

पुलाची तपासणी सुरू असताना सिमेंटचा एक तुकडा निखळला आणि खड्डाच पडला. पूल कोसळल्यानंतर झालेल्या ढिगाऱ्यात स्टीलचे तुकडे पाहायला मिळतात. सिमेंट क्राँकिट नाही असा एक भाग आम्हाला दिसला. या भागात पाणी शिरलं तर आतला धातू खराब होण्याची पूर्ण शक्यता होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पूल

पुलाचे वास्तूरचनाकार रिकार्डो मोरंडी यांना काँक्रिटमध्येही संगीत ऐकू येतं. त्यांना असा एक पूल उभारायचा होता ज्यामध्ये फक्त क्राँकिट दिसेल, धातू नाही.

या डिझाईनमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी होत्या. योग्य पद्धतीने काम झालं असतं तर पुलाच्या आतलं स्टील वाचवता आलं असतं. पुल बनवण्याची प्रक्रिया नीट नव्हती. स्टील क्राँकिटआड लपलं होतं. स्टीलची तपासणी करू शकत नाही. पूल किती मजबूत आहे हे कळू शकत नाही. पूल बांधण्यात आला तेव्हा तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं की बांधणीत एअर पॉकेट राहिलं असेल हे लक्षात यावं.

पाओलो डी ओवेतिया यांच्या मते ढिगाऱ्याचा अभ्यास केल्यानंतर काँक्रिटच्य आतलं स्टील पूर्णत: खचलं होतं.

पुलाची अवस्था डळमळीत झाली होती. हा पूल इतकी वर्ष कसा उभा राहिला हेच आश्चर्य आहे. हा अपघात तीन किंवा दहा वर्षांपूर्वी घडला असता.

ऑटोस्ट्रेड कंपनीची माणसं या गोष्टींचा इन्कार करतात. पूल डळमळीत अवस्थेत होता याचे कोणतेही पुरावे नाहीत. पुलाच्या आतला धातू अत्यंत खराब स्थितीत आहे की पूल उभाच राहू शकत नाही अशीही परिस्थिती नव्हती.

पाओलो म्हणतात, दोष कोणाला देणार? ज्यांच्यावर पुलाची जबाबदारी होती त्यांनी योग्यवेळी कार्यवाही करायला हवी होती. त्यांनी त्यांचं काम केलं नाही. ज्यांनी खर्च करणं आवश्यक होतं त्यांनी केलं नाही. ज्यांनी तपासणी करणं आवश्यक होतं त्यांनी ते केलं नाही.

याप्रकरणी अभियोजकांवर हत्येचा आरोप निश्चित केला जाणार आहे. मात्र न्यायालयाचा निर्णय जाहीर होण्यास बराच कालावधी लागू शकतो.

इमॅन्युअल आपलं शिक्षण अर्धवट सोडून इटलीत परतले आहेत जेणेकरून भाऊ हेन्रीला न्याय मिळवून देता येईल.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उरलेला पूल स्फोटकांच्या साथीने उडवून देण्यात आला.

इमॅन्युअल सांगतात, हेन्रीला न्याय मिळवून देणं हेच माझ्या आयुष्याचं ईप्सित आहे. अपघाताबाबत एकच सकारात्मक गोष्ट म्हणजे देवाने मला जिवंत ठेवलं. जेणेकरून आईची काळजी घेऊ शकेन. ते करतानाच मी हेन्रीला न्याय मिळवून देईन.

क्षणोक्षणी हिंसक घटना घडणाऱ्या कोलंबियात आम्ही लहानाचे मोठे झालो. आमचे वडील अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या मंडळींबरोबर होते. त्यांची हत्या करण्यात आली. आम्ही इटलीला आलो आणि कुटुंबाला स्थैर्य मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न होता.

माझ्या भावाचं इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण होण्याच्या बेतात होतं. कोलंबियात राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी तो पैसे गोळा करत होता. तो नेहमी हसतमुख असे. तो आयुष्य समरसून जगत असे. मिळालेलं आयुष्य ही अनमोल भेट आहे असं त्याचं म्हणणं होतं.

पूल पडण्यासाठी कारणीभूत माणसं याच जगात आहेत. त्यांना शिक्षा मिळायला हवी. माझ्या भावाला न्याय मिळायला हवा कारण अपघातात आप्तस्वकीय गमावलेल्या इटलीच्या प्रत्येक नागरिकाला हेच वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

Related Topics

मोठ्या बातम्या

गेल्या वर्षीची वर्ल्ड कप सेमीफायनल माहीची शेवटची मॅच ठरेल का?

'बलात्कारानंतर पीडिता झोपी कशी जाऊ शकते?’ न्यायमूर्तींनी मागे घेतलं वादग्रस्त वक्तव्य

पाच वर्षांच्या चिमुकलीनं सायकलिंग करून जमवले 21 हजार पौंड

विकास दुबेसारखे गुन्हेगार राजकारणात कसे यशस्वी होतात?

कोरोनावरची देशी लस 15 ऑगस्टपर्यंत आणण्याचा अट्टहास कशासाठी?

'खासगी शाळांना 100 टक्के अनुदान मिळतं, मग महापालिकेच्या शिक्षकांवर अन्याय का?'

विकास दुबे चकमकीचं नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र मिश्र यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

कुत्र्याचं मटण खाण्यावर भारताच्या या राज्याने आणली बंदी

फक्त मोदींच्या दौऱ्यासाठी लष्कराने हे हॉस्पिटल उभारलं का?