सामूहिक बलात्कार पीडितेला 30 वर्षांची शिक्षा, 33 महिन्यानंतर निर्दोष सुटका

इव्हिलीन हर्नांडेझ Image copyright AFP
प्रतिमा मथळा इव्हिलीन हर्नांडेझ

एल साल्वाडोरमधल्या इव्हिलीन हर्नांडेझ या 21 वर्षीय सामूहिक बलात्कार पीडितेची अवैध गर्भपाताच्या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली आणि जगभरातून एकच आनंद व्यक्त करण्यात आला.

अत्यंत संवेदनशील आणि तितकंच किचकट बनलेल्या या प्रकरणाकडे एल साल्वाडोरसह अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. हे प्रकरणही तितकंच गंभीर आणि कुणाही संवेदनशील अन् मानवतावादी व्यक्तीचं लक्ष वेधून घेणारं होतं.

घरातील टॉयलेटमध्ये इव्हिलीन हर्नांडेझचं नवजात बाळ मृतावस्थेत सापडलं होतं.

त्यानंतर इव्हिलीनवर खटला सुरू झाला आणि तिला 30 वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेतील 33 महिने इव्हिलीनने तुरूंगाच्या अंधाऱ्या खोलीत काढलेही.

मात्र, यंदा पुन्हा खटला चालवण्याची मागणी करत, इव्हिलीनच्या वकिलाने पुन्हा कोर्टाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम तिच्या सुटकेत झाला. तिची निर्दोष मुक्तता झालीय.

अगदी पहिल्या दिवसांपासून इव्हिलीन हेच म्हणत होती की, मी निर्दोष आहे. गरोदर असल्याचंच मला माहीत नव्हतं. अखेर इव्हिलीनला न्याय मिळाला.

"देवाचे आभार की मला अखेर न्याय मिळाला. तुरुंगातील 33 महिने अत्यंत कठोर होते. आता मी पुन्हा माझा अभ्यास पुन्हा सुरू करेन आणि ध्येयाकडे वाटचाल करेन. मी खूप आनंदी आहे," असं इव्हिलीन म्हणाली.

नेमकं प्रकरण काय आहे?

6 एप्रिल 2016 रोजीची घटना. इव्हिलीन हर्नांडेझ तिच्या एल सिल्वाडोरमधील गावातील घरात होती. अचानक तिच्या पोटात तीव्र वेदना होत कळा येऊ लागल्या आणि रक्तस्रावही झाला.

इव्हिलीन तातडीने घराच्या शेजारीच असलेल्या टॉयलेटमध्ये गेली. तिथं टॉयलेटमध्येच बेशुद्ध पडली आणि जागीच कोसळली. त्यानंतर इव्हिलीनच्या आईने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तपासणी करताना डॉक्टरांना कळलं की, इव्हिलीननं बाळाला जन्म दिलाय.

टॉयलेटच्या सेप्टिक टँकमध्ये मृतावस्थेतील अर्भक आढळलं. त्यामुळे इव्हिलीनला अटक करण्यात आली.

'मी गरोदर असल्याचं मला माहीतच नव्हतं'

इव्हिलीन 18 वर्षांची होती, तेव्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. मात्र, गरोदर असल्याचं माहीत नव्हतं, असं इव्हिलीनचं म्हणणं आहे.

गरोदरपणाच्या लक्षणांबाबत इव्हिलीन गोंधळली होती. कारण अधूनमधून तिचा रक्तस्राव होत होता. त्यामुळे तिला वाटलं मासिक पाळी नियमित सुरू आहे.

"गरोदर असल्याचं मला माहीत असतं, तर मी आनंदानं आणि अभिमानानं बाळाला जन्म दिला असता, त्याची वाट पाहिली असती," असं इव्हिलीनचं म्हणणं होतं.

जाणीवपूर्वक हत्या केल्याचा इव्हिलीनवर ठपका

सुरुवातीला इव्हिलीनवर केवळ गर्भपाताचा आरोप करण्यात आला होता. मात्र, इव्हिलीनने गरोदरपणा लपवून ठेवला आणि प्रसूतीपूर्व काळजी घेतली नाही, असा दावा फिर्यादीने केला. फिर्यादीच्या युक्तीवादानंतर 'जाणीवपूर्वक केलेली हत्या' असा ठपका इव्हिलीनवर ठेवण्यात आला.

गरोदर असल्याचं इव्हिलीनला माहीत होतं, असं म्हणत 2017 च्या जुलै महिन्यात न्यायाधीशांनी इव्हिलीनला दोषी ठरवलं आणि तिला 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

इव्हिलीनने आतापर्यंत या शिक्षेतील 33 महिने तुरूंगात काढले आहेत.

खटला पुन्हा का सुरू झाला?

इव्हिलीनच्या वकील बर्था मारिया डेलन यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुन्हा दाद मागितली.

"श्वास घेण्यास त्रास झाल्यानं बाळाचा मृत्यू झाला होता. बाळ गर्भाशयात असेल, प्रसूती होत असताना किंवा प्रसूती झाल्यानंतरच असं होतं. त्यामुळे इलिव्हीननं गर्भपाताचा कुठलाही प्रयत्न केला नाही. बाळाचा मृत्यून नैसर्गिकरित्या झाला. त्यामुळे यात इव्हिलीनची चूक नाही. तिने कुठलाच गुन्हा केला नाही," असा दावा बर्था मारिया डेलन यांनी केला.

2019 च्या म्हणजे यंदा फेब्रुवारी महिन्यातच इव्हिलीनची एल साल्वाडोरच्या सुप्रीम कोर्टाने 2017 च्या खटल्यातून सुटका केली आणि नव्या न्यायाधीशांसमोर खटला पुन्हा चालवण्याची परवानगी दिली.

इव्हिलीनला 2017 साली 30 वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, 33 महिन्यांची शिक्षा पूर्ण करून तिची गेल्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये सुटका झाली आणि नव्याने खटला सुरू झाला.

नव्याने खटला सुरू झाल्यानंतर फिर्यादीने इव्हिलीनला 40 वर्षांची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

बाळाला जन्म देण्याची निवड महिलेची स्वत:ची असावी, यासाठी अभियान राबवणाऱ्या मोरेन हेरेरा म्हणतात, "इव्हिलीनला 40 वर्षांची शिक्षा म्हणजे अत्यंत टोकाची मागणी होती. इव्हिलीनने ज्या स्थितीत बाळाला जन्म दिला होता, ती परिस्थितीच कुणी लक्षात घेत नव्हतं. तिला प्रचंड रक्तस्राव होत होता."

इव्हिलीनचं प्रकरण इतकं महत्त्वाचं का?

एल साल्वाडोरमध्ये गर्भपाताविरोधात जगातील अत्यंत कठोर कायदा आहे. परिस्थिती काहीही असो, गर्भपात बेकायदेशीरच असून, त्यात दोषी आढळणाऱ्यांना दोन किंवा आठ वर्षांचा तुरुंगास होतो.

एल साल्वाडोरमधील गर्भपातविरोधी कायद्यातील अत्यंत कठोर तरतुदींमुळे आणखी 17 महिला तुरुंगात बंदिस्त आहेत. गेल्या दशकभरात जवळपास 30 महिलांची सुटका करण्यात महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्यांना आलं आहे.

एल साल्वाडोरच्या अध्यक्षपदी नुकतीच नायिब बुकेले यांची निवड झालीय. जून महिन्यातच त्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात इव्हिलीनच्या रूपाने हे पहिलंच प्रकरण आहे.

त्यामुळे एल साल्वाडोरमधील महिलांच्या अनेक गटांना आशा वाटू लागलीय की, गर्भपातासंदर्भातील कायद्यांमध्ये सुटसुटीतपणा आणि महिलांचा विचार केला जाईल.

Image copyright AFP

बुकेले यांनी गर्भपाताला विरोध केलाय. मात्र, प्रसूतीवेळी ज्या महिलांना त्रास सहन करावा लागतो किंवा जीवावर बेततं, या गोष्टीबाबत बुकेले यांनी महिलांसाठी सहानुभूती व्यक्त केलीय.

"एखाद्या गरीब महिलेचं नवजात बाळ मृत्यूमुखी पडल्यास तिने गर्भपात केल्याचा संशय घेतला जातो. त्यामुळे इथं सामाजिक असमानतेचा मुद्दाही येतो," असं बुकेले म्हणतात.

बुकेले यांच्या या भूमिकेमुळे गर्भपाताविषयी अत्यंत कठोर कायदा असणाऱ्या एल साल्वाडोरमधील महिलांना आशा वाटू लागल्या आहेत की, गर्भपाताच्या कायद्यात समाधानकारक सुधारणा होतील.

इव्हिलीनची निर्दोष सुटका झाल्यानंतर मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या लंडनस्थित अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटलं की, एल साल्वाडोरमध्ये महिलांच्या अधिकारांचा मोठा विजय झालाय. शिवाय, एल साल्वाडोरमधील सरकारने महिलांना गुन्हेगार ठरवणाऱ्या या लाजीरवाण्या तरतुदी रद्द कराव्यात, असं आवाहनही केलंय.

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्तांनी सुद्धा एल साल्वाडोरमधील गर्भपातासंदर्भातील कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचं आवाहन केलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)