काश्मीर प्रश्नी डोनाल्ड ट्रंप यांचा पुन्हा एकदा मध्यस्थीचा प्रस्ताव

डोनाल्ड ट्रंप Image copyright EPA

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी काश्मीरची परिस्थिती स्फोटक आणि गुंतागुंतीची असल्याचं सांगत पुन्हा एकदा याप्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

या आठवड्याच्या शेवटी फ्रान्समध्ये मोदी यांना भेटणार असल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "काश्मीर ही एक गुंतागुंतीची समस्या आहे. इथं हिंदू आहेत, मुस्लीमसुद्धा आहेत आणि त्यांच्यात एकोपा आहे, असं मी म्हणणार नाही."

"हा मुद्दा बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. हा एक गंतागुतीचा मुद्दा आहे. मी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान इमरान खान आणि नरेंद्र मोदी यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. या आठवड्याच्या शेवटी मी मोदी यांना भेटणारसुद्धा आहे."

भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचंही ट्रंप यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images

पण भारत नेहमीच काश्मीर मुद्द्यावर कोणाच्याही मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळत आला आहे.

आधीही मध्यस्थीची मागणी

इमरान खान यांनी वारंवार अमेरिकेला काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप आणि मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे.

याआधीही राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यावेळी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता. मोदी यांनी काश्मीरबाबतच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास सांगितल्याचं ते म्हणाले होते. पण भारताने ट्रंप यांचा हा दावा फेटाळून लावला होता.

काश्मीरवर राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचं सध्याचं वक्तव्य पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत फोनवर केलेल्या चर्चेनंतर केलं आहे.

ट्रंप यांनी इमरान खान आणि मोदी यांच्याशी फोनवर याबाबत चर्चा केली होती. ट्रंप यांनी दोन्ही नेत्यांना तणाव कमी करण्याचं आवाहन केलं. त्यांनी पाकिस्तानला काश्मीरबाबत भारतावर कोणतीही टीका करण्यावर नियंत्रण आणण्याचा सल्ला दिला आहे.

याआधी सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी ट्रंप यांच्यासोबत 30 मिनिट फोनवरून संवाद साधला. यामध्ये मोदी यांनी पाकिस्तानकडे बोट दाखवताना काही नेते भारतविरोधी हिंसेला खतपाणी घालत असल्याचं सांगितलं. हे शांतता राखण्याच्या दृष्टीने अनुकूल नसल्याचं मोदी म्हणाले.

दुसरीकडे काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेऊन जाण्याची तयारी पाकिस्तान करत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी याबाबत सांगितलं आहे.

या आठवड्याच्या शेवटी डोनाल्ड ट्रंप आणि मोदी फ्रान्समध्ये जी-7 राष्ट्रांच्या बैठकीदरम्यान भेटणार आहेत. यावेळी ट्रंप आणि मोदी प्रत्यक्ष भेटून बातचित करू शकतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)