फेसबुक: तुमची माहिती कोण वापरतंय हे लवकरच कळणार

Facebook Image copyright Getty Images

इंटरनेटवरच्या एकूणच वापराबाबत आपण युजर्सची कोणकोणत्या प्रकारची माहिती गोळा करतो, हे दाखवायला फेसबुक लवकरच सुरुवात करेल.

आणि त्यांचा हा खुलासा अनेकांसाठी धक्कादायक असणार आहे.

फेसबुकचा नवा बदल काय आहे?

लवकरच आपल्याला 'ऑफ फेसबुक अॅक्टिव्हिटी' नावाचा पर्याय सेटिंग्समध्ये दिसायला लागेल.

यामध्ये गेल्यावर कोणकोणती अॅप्स आणि वेबसाईट्स तुमच्याविषयीची माहिती फेसबुकला पाठवतात ते समजेल.

या माहितीचा वापर करून फेसबुक तुम्हाला विशिष्ट जाहिराती दाखवतं. याला म्हणतात - टार्गेटेड अॅडव्हर्टायजिंग.

या पर्यायाचा वापर करून तुम्हाला 'हिस्ट्री' क्लिअर करता येईल. म्हणजे थोडक्यात तुमच्या पाऊलखुणा पुसून टाकता येतील.

Image copyright Getty Images

आणि यापुढे तुम्ही फेसबुकच्या अॅपवर नसताना काय काय करता यावर नजर ठेवणंही बंद करता येईल.

सध्या आयर्लंड, दक्षिण कोरिया आणि स्पेनमध्ये या फीचरची सुरुवात करण्यात आली आहे. आणि हळुहळू जगभरातल्या सगळ्या युजर्सना हा पर्याय उपलब्ध होईल.

पण नेमकं काय घडलंय?

अॅपल आणि मोझिला या दोन कंपन्यांनी यासाठी सर्वांत आधी पावलं उचलली. आपले (अॅपल आणि मोझिलाचे) युजर्स आपल्या ब्राऊजरचा वापर करत इतर प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईट्सवर काय करतात याची माहिती फेसबुक आणि इतर सेवांना मिळू नये, म्हणून या कंपन्यांनी उपाययोजना केल्या.

शिवाय जर्मनीच्या एका नियामक मंडळानेही फेसबुकला ते गोळा करत असलेल्या डेटाबद्दल ताकिद दिली होती. फेसबुक ज्या प्रकारे हा डेटा जमवतं आणि एकत्र करतं, त्यावर त्यांनी काही मर्यादा घालाव्यात किंवा मग युजर्सकडून याविषयीची विशिष्ट परवानगी घेण्यात यावी असं फेसबुकला सांगण्यात आलं होतं.

Image copyright Facebook

डेटा कसा जमवला आणि वापरला जातो?

तुम्ही फेसबुकवर काय करता याविषयीच्या सगळ्या नोंदी तर होत असतातच. पण त्या पलीकडे तुम्ही काय करता याविषयीही फेसबुक माहिती जमवतं. फेसबुकचं लॉग इन जर तुम्ही इतर कोणत्या अॅपचा वापर करण्यासाठी वापरत असाल, तर ती अॅप्स तुम्ही काय करता याची माहिती फेसबुकला पाठवतात.

यासोबतच वेबसाईट्स 'फेसबुक पिक्सेल' नावाची सेवा तुमच्या अॅक्टिविटीज ट्रॅक करायला वापरतात.

म्हणूनच जर तुम्ही ब्राऊजरचा वापर करून एखाद्या वेबसाईटवर बूट शोधलेत तर अर्ध्यातासानंतर तुमच्या फेसबुक फीडमध्ये तुम्हाला बुटांच्या जाहिराती दिसतात, किंवा मग तुम्ही पाहत असलेल्या बुटांवरच्या ऑफर्स दिसायला लागतात.

विविध ऍप्स आणि वेबसाईट्स तुमच्याबद्दल फेसबुकला काय सांगतात यावर तुम्ही 'ऑफ फेसबुक ऍक्टिविटी' पर्यायाचा वापर करून लक्ष ठेवू शकता.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : फेसबुक तुमच्या डेटाचं करतं तरी काय?

फेसबुकचं म्हणणं आहे की एका सामान्य युजरच्या फोनवर 80 ऍप्स असतात आणि त्यातली 40 दरमहिन्याला वापरली जातात.

त्यामुळे शेअर होणाऱ्या गोष्टींची यादी मोठी असेल. पण तुम्हाला हा डेटा तुमच्या फेसबुक प्रोफाईलपासून 'डिस्कनेक्ट' करता येईल.

पण हे लक्षात घ्यायला हवं आपला काही डेटा हा फेसबुककडे जाणारचं. पण तो ढोबळ डेटा असेल.

म्हणजे फेसबुकला हे समजेल की सध्या काही लोक इंटरनेटवर बूट शोधत आहेत. पण तुम्ही त्यापैकी एक आहात ते फेसबुकला समजणार नाही.

गेलं वर्षंभर या 'ऑफ फेसबुक अॅक्टिविटी' पर्यायावर काम करण्यात येतंय.

युजर्सचा डेटा कसा वापरला जातो याबाबतचे निर्णयाधिकार आपल्या युजर्सना द्यायचं वचन मार्क झकरबर्गने गेल्या वर्षीच्या F8 डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये दिलं होतं. ते वचन या नव्या सेटिंगमुळे पूर्ण होईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)