झाकीर नाईक: हिंदूंच्या निष्ठेबाबत शंका घेणं पडलं महागात, मलेशियात भाषणावर बंदी

झाकीर नाईक Image copyright Getty Images

धार्मिक तेढ वाढवण्याचा आरोप असलेले इस्लाम प्रचारक झाकीर नाईक यांनी भारतातून पलायन करून मलेशियात आश्रय घेतला. पण मलेशियातही धार्मिक तेढ वाढवणारं वक्तव्य केल्याबद्दल ते आता मलेशियन सरकारच्या रडारवर आले आहेत.

भारतीय मुस्लीम प्रचारक झाकीर नाईक यांच्यावर मलेशियामध्ये भाषण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हिंदू आणि चिनी-मलेशियन लोकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.

सोमवारी (19 ऑगस्ट) नाईक यांची पोलीस मुख्यालयात 10 तासांपेक्षा जास्त चौकशी करण्यात आल्यानंतर मंगळवारी (20 ऑगस्ट) याविषयीची घोषणा करण्यात आली.

8 ऑगस्टला दिलेल्या भाषणाबद्दल नाईक यांची झालेली ही दुसरी चौकशी होती. या भाषणामध्ये नाईक यांनी मलेशियन हिंदूंच्या निष्ठेबाबत शंका वक्त केली होती आणि चिनी-मलेशियन व्यक्ती या देशात 'पाहुणे' असल्याचं म्हटलं होतं.

देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बंदी घालण्यात आल्याचं मलेशियन अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

"सगळ्या पोलीस पथकांना हे आदेश देण्यात आले असून देशाची सुरक्षितता आणि जातीय शांतता जपण्यासाठी हे करण्यात आलं आहे," असं पोलिसांच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सच्या प्रमुख अस्मावती अहमद यांनी म्हटल्याचं वृत्त स्टारने दिलंय.

नाईक यांनी माफीनामा प्रसिद्ध केला असून आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचं म्हटलं आहे. झाकीर नाईक मलेशियाचे 'पर्मनंट रेसिडंट' आहेत आणि यावर या बंदीचा काही परिणाम होणार का, हे अजून स्पष्ट नाही.

कोण आहेत झाकीर नाईक?

नाईक यांचा जन्म मुंबईत ऑक्टोबर 1965 मध्ये झाला. पेशाने ते डॉक्टर होते. पण 1991मध्ये इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनची (IRF) स्थापना केल्यानंतर ते पूर्णवेळ प्रचारक झाले.

इस्लामचे टीव्हीवरील प्रचारक (Televangelist) म्हणून ते प्रसिद्ध आहेत. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचं पीस टीव्ही (Peace TV) नावाचं चॅनल आहे. यावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि व्याख्याते धर्माविषयीची व्याख्यानं देतात. 125 पेक्षा जास्त देशांमध्ये पीस टीव्हीचं प्रसारण होतं आणि ऑनलाईन स्ट्रीमिंगही होतं.

Image copyright FACEBOOK ZAKIR NAIK

नाईक सोशल मीडियावरही प्रसिद्ध असून फेसबुकवर त्यांचे 17 मिलियन ( 1 कोटी 70 लाख) फॅन्स आहेत.

मनी लाँडरिंग आणि द्वेष पसरवणारी भाषणं केल्याप्रकरणी 2016 पासून भारतीय यंत्रणा नाईक यांच्या मागावर आहेत. प्रत्यक्ष हजर नसून मनी लाँडरिंगमध्ये सहभागी झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

मलेशियामध्ये देशव्यापी बंदी घालण्यात येण्याआधी नाईक यांच्यावर तिथल्या सात राज्यांमध्ये भाषण करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

गेल्या तीन वर्षांपासून झाकीर नाईक मलेशियामध्ये राहतात. त्यांना परत पाठवण्यात यावं अशी मागणी भारताने केली आहे. पण आतापर्यंत मलेशियन सरकारने त्यांच्या पर्मनंट रेसिडंट (PR) स्टेटसची पाठराखण करत नाईक यांच्यावर भारतात योग्य रीतीने खटला चालवला जाणार नाही, असं म्हटलं होतं.

काय म्हणाले होते झाकीर नाईक?

8 ऑगस्ट रोजी मलेशियातील केलांतान राज्यामध्ये झाकीर नाईक यांनी केलेल्या भाषणामुळे देशातल्या जातीय तणावात वाढ झाली.

मलेशियन हिंदू हे मलेशियन पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांच्यापेक्षा भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जास्त ईमान राखतात असा दावा नाईक यांनी केला होता. मलेशियाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 6% हिंदू आहेत.

तर देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 20 टक्के असणारे चिनी-मलेशियन या देशामध्ये 'पाहुणे' असल्याचं विधान त्यांनी केलं.

Image copyright FACEBOOK

भाषणबंदी घालण्यात आल्यानंतर नाईक यांनी त्यांच्या या विधानांबद्दल माफी मागणारं एक पत्रक प्रसिद्ध केलं. आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचं यामध्ये म्हटलं आहे.

"तुमच्या लक्षात आलंच असेल की गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर देशामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचे आरोप करण्यात येत आहेत आणि माझे विरोधक माझ्या भाषणातून निवडक वाक्य काढून त्याचा वेगळा अर्थ लावत आहेत. आज मी माझी भूमिका पोलिसांकडे स्पष्ट केली."

"या सगळ्या प्रकरणामुळे अनेक गैर मुस्लिमांना मी जातीयवादी असल्याचं वाटत असल्याचा मला खेद आहे. कुराणाप्रमाणेच मी देखील दुष्ट जातीयवादाच्या विरोधात आहे कारण एक इस्लामिक प्रचारक म्हणून मी मानत असलेल्या सर्व गोष्टींच्या ते विरोधात आहे," झाकीर नाईक म्हणतात.

भाषणबंदीवरील प्रतिक्रिया

यापूर्वी झाकीर नाईक यांच्या PR स्टेटसची पाठराखण करणारे महाथिर मोहम्मद यांनी या भाषणबंदीला पाठिंबा दिला आहे. राजकीय वक्तव्य करत नाईक यांनी मर्यादा ओलांडल्याचं त्यांनी म्हटलंय.

"सगळ्यांत आधी त्यांना पर्मंनंट रेसिडंट (PR) स्टेटस कोणी दिला हे मला माहीत नाही. पण पर्मनंट रेसिडंट व्हायचं असेल तर तुम्हाला राजकारणात सहभागी होता येत नाही."

"चिनी लोकांनी चीनला परत जावं, भारतीयांनी भारतात परतावं असं ते म्हणत होते. हे राजकारण आहे," असं महाथिर बोलल्याचं मलयसियाकिनी वेबसाईटने म्हटलं आहे.

Image copyright PEACE TV

स्टार वृत्तपत्राच्या वेबसाईटनुसार माजी पोलीस निरीक्षक अब्दुल रहीम नूर म्हणाले, "ते केलांतनमध्ये काय बोलले याविषयी आणि त्यांनी भारतामध्ये (तथाकथितपणे) काय केलं याविषयी ठोस पुरावे आहेत, झाकीर नाईक यांचा PR स्टेटस काढून घेण्यात यावं आणि त्यांना भारत सरकारकडे देण्यात यावं. तिथल्या कायद्याचा सामना त्यांना करू द्यावा, अशी मी सरकारला विनंती करतो."

पण असं असूनही मलेशियातला मुस्लीम समाज अजूनही नाईक यांच्या बाजूने आहे.

"झाकीर नाईक यांना देण्यात आलेला PR स्टेटस हा जगभरातल्या मानवी हक्कांनुसार देण्यात आला आहे, सर्व सुसंस्कृत देश असं करतात. ज्यांच्या सुरक्षिततेला धोका आहे अशांना इस्लाममध्ये सुरक्षिततेचीही हमी दिली जाते, अगदी गैर मुस्लिमांनाही," पॅन-मलेशियन इस्लामिक पार्टीचे अध्यक्ष अब्दुल हादी अवांग म्हणाले.

"धर्मांबद्दलचा त्यांचा तुलनात्मक अभ्यास आणि इस्लामच्या महानतेचा प्रचार करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे झाकीर यांचा छळ केला जातोय," असं पेनांग मुफ्ती (इस्लामिक न्यायाधीश) वान सलीम मोहम्मद नूर यांनी म्हटल्याचं वृत्त बेरिटा हारियन यांनी दिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)