अॅमेझॉन जंगल आग: हे जंगल नष्ट झालं तर तुम्ही गुदमराल

अॅमेझॉन, सदाहरित वने Image copyright Getty Images

अॅमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीविषयी या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

आग का लागली?

ब्राझीलमधील पत्रकार सिलो बोकनेरा यांच्या मते देशातील जंगलाला काही ठिकणी आग लागणं सामान्य असतं मात्र अॅमेझॉनमध्ये सध्याची वनांला लागलेली आग जाणीवपूर्वक आहे.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांनी जंगलांची वृक्षतोड रोखली नाही. शेती तसंच खाणकामासाठी जंगलं ओसाड करण्याला त्यांनी प्रोत्साहनच दिलं.

मोठ्या उद्योगसमूहांऐवजी छोट्या गटांनीच आग लावण्याचं काम केलं आहे. जाणीवपूर्वक लावण्यात आलेल्या आगी हा पारंपरिक प्रश्न आहे. मात्र तो एवढा उग्र रुप धारण करेल असं वाटलं नव्हतं.

आग नक्की किती पसरलेय?

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आगीचं प्रमाण 84 टक्क्यांनी वाढलं. एकंदरीत 74,000 किरकोळ आगीच्या घटना आपण विचारात घेत आहोत. आगीनं नेमकं किती क्षेत्रफळ व्यापलं आहे याची आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही.

कारण अनेक ठिकाणी अजूनही आग धुमसते आहे. आम्ही हा प्रश्न युरोपियन युनियनच्या कोपर्निकस या उपक्रमाला विचारला. आग लागल्यानंतर किती प्रमाणात कार्बन डायऑक्साईड यावरून आगीची दाहकता लक्षात येऊ शकेल.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा अॅमेझॉनचं जंगल

कोपर्निकस मॉनिटरिंग सर्व्हिसनुसार आगीमुळे 228 मेगाटन कार्बनडाय ऑक्साईडचं उत्सर्जन झालं आहे.

आगी पूर्णपणे निवळल्यानंतर आगीमुळे झालेलं नुकसान स्पष्ट होऊ शकेल.

आग रोखण्यासाठी काय केलं?

आग रोखण्यासाठीच्या उपायांवरून ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो टीकेच्या लक्ष्यस्थानी आहेत. मॅक्रॉन यांनी आगीचं कारण देत ब्राझीलशी होणार असलेला एक महत्वपूर्ण व्यापारी करार रोखण्याची धमकी दिली आहे. जंगलतोड थोपवणं आवश्यक आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा अॅमेझॉन वाचवण्यासाठीची चळवळ

आग लागल्याचं जगाला कसं कळलं?

अॅमेझॉन जंगलांना लागलेल्या आगीची तीव्रता Prayforamazonas आणि Prayforamazonia या हॅशटॅगमुळे कळली असं म्हटलं जातं. बीबीसीसह अन्य संघटनांनी आग दुर्घटनेचं वृत्तांकन केलं. अमेझॉन जंगलांची होणारी धूप यावरही आम्ही वाचकांचं लक्ष वेधलं आहे.

2 जुलै ते 20 जुलै या काळात आम्ही अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या. 2 ऑगस्टलाही याविषयी बातमी दिली.

प्रतिमा मथळा आगीची ठिकाणं

साओ पाऊलो शहराला या आगीची झळ बसली तेव्हा खऱ्या अर्थाने आगीचं गांभीर्य लक्षात आलं.

बीबीसी ब्राझील सर्व्हिससने सातत्याने आगीच्या प्रश्नावर वार्तांकन केलं.

सदाहरित वने पुन्हा उभी राहण्यास किती वेळ जातो?

आगीत भस्मसात झालेलं जंगल पुन्हा उभं राहण्यासाठी 20 ते 40 वर्षांचा कालावधी लागेल. मात्र अजूनही अनेक ठिकाणी आग कायम असल्याने झाडांचं प्रचंड नुकसान होत आहे.

आगीमुळे नुकसान झालं आहे. मात्र तरीही 80 टक्के जंगल शाबूत आहे. अजूनही आग धूमसत आहे. जर 30 ते 40 टक्के जंगल नष्ट झालं तर हवामानाचं चक्रच बदलू शकतं.

2005 पूर्वी ब्राझीलमध्ये प्रचंड जंगलतोड होत होती.

अॅमेझॉनमधून नक्की किती ऑक्सिजन मिळतो?

अॅमेझॉनचं जंगल हा जगाच्या ऑक्सिजनसाठीचं माहेरघर आहे असं अनेक ठिकाणी म्हटलं गेलं. बीबीसी रिअलिटी चेक टीमने हा आकडा नक्की काय याची शहानिशा केली. जगात असलेल्या एकूण ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन अॅमेझॉन जंगलांमधून निर्माण होत असल्याचं म्हटलं जातं.

अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हा आकडा सांगितला. मात्र हे प्रमाण 10 टक्के असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेतून ऑक्सिजन बाहेर पडतो.

आगीवरून राजकारण तापलं

ब्राझीलच्या अॅमेझॉन सदाहरित वनांमध्ये लागलेल्या भीषण आगीवर काबू मिळवण्यासाठी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी लष्कराची मदत घेण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी एका आदेशाद्वारे प्रशासनाला सीमेनजीकचा प्रदेश, आदिवासी आणि संरक्षित परिसरात लष्कराला पाचारण केलं आहे.

युरोपीय नेत्यांच्या दडपणामुळे ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे.

अॅमेझॉन जंगलांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत ब्राझीलशी कोणताही व्यापारी सौदा केला जाणार नाही अशी भूमिका फ्रान्स, आयर्लंड यांनी घेतली होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अॅमेझॉन आग

पाणी आणि हवेच्या परिवर्तनासंदर्भात ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो खोटं बोलले असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे.

पृथ्वीचा ऑक्सिजन असं अॅमेझॉन जंगलांचं वर्णन केलं जातं.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांच्या चुकीच्या डावपेचांमुळे ही आग लागली असा आरोप करण्यात येत आहे. मात्र बोलसोनारो यांनी याचा इन्कार केला आहे.

युरोपीय देशांनी या आगीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

अॅमेझॉनला लागलेली आग ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे. अत्यंत हृदयद्रावक अशी ही दुर्घटना असल्याचं मत युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, 'आग रोखण्यासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही पूरवू. अॅमेझॉन जंगल हा पृथ्वीवरचा चमत्कार आहे असंही त्यांनी सांगितलं'.

अॅमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग ही आपात्कालीन परिस्थिती आहे. ब्राझीलसाठी ही दुर्घटना दूरगामी परिणामकारक आहे, त्याचवेळी अन्य देशांसाठीही ही दुर्घटना धोकादायक असल्याचं जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल यांनी म्हटलं आहे.

आग कशी आटोक्यात आणता येईल यासंदर्भात विविध उपाययोजना विचाराधीन आहेत. लष्कराला पाचारण करणं हा त्यापैकीच एक उपाय आहे.

राजकीय लाभासाठी मॅक्रॉन याप्रकरणी हस्तक्षेप करत असल्याचा आरोप बोलसोनारो यांनी केला. फ्रान्मसध्ये जी7 परिषद सुरू आहे. या परिषदेत ब्राझीलचा सहभाग नाही. या परिषदेत आगीवर चर्चा म्हणजे औपचारिकता निभावण्याची मानसिकता होती असं बोलसोनारो यांनी म्हटलं आहे.

व्यापारी सौदा काय?

युरोपियन युनियन आणि मेर्कोसूर या नावाने प्रसिद्ध हा व्यापारी करार युरोपियन युनियनच्या आतापर्यंतचा सगळ्यात मोठा करार आहे.

दक्षिण अमेरिकेतील देशांशी होणारा हा करार मूर्त स्वरुपात येण्यासाठी वीस वर्षांचा कालावधी लागला आहे. या गटात अर्जेंटिना, ब्राझील, उरुग्वे आणि पॅराग्वेचा समावेश आहे.

वस्तूंच्या व्यापारात मेर्कोसूर दुसरा सगळ्यात मोठा भागीदार आहे. 2018 मध्ये युरोपियन युनियनच्या एकूण निर्यातीपैकी मेर्कोसूरला केलेल्या निर्यातीचं प्रमाण 2.3 टक्के एवढं आहे.

दोन्ही देशांदरम्यान अनेक वस्तूंची देवाणघेवाण होते. दक्षिण अमेरिकेतून खाद्यपदार्थ, दारू, तंबाखू आणि कृषी उत्पादनं पाठवली जातात. युरोपीय युनियनकडून मशीन्स, रसायनं, औषध घेतली जातात.

ब्राझीलकडून बीफ आयातीवर बंदी घालण्यासंदर्भात युरोपियन युनियनने विचार करायला हवा असं फिनलंडच्या अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.

युरोपियन युनियनचं अध्यक्षपद फिनलंडकडे आहे. दर सहा महिन्यांनी सदस्य देशांना अध्यक्षपदाचा मान मिळतो.

पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी ब्राझीलमध्ये अनेक ठिकाणी प्रदर्शनं केली.

लंडन, बर्लिन, मुंबई, पॅरिसमध्ये ब्राझीलच्या दूतावासासमोर निदर्शनं करण्यात आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)