नासा करतंय चौकशी: लग्न मोडलं पृथ्वीवर, गुन्हा घडला अंतराळात?

अॅन मकलेन Image copyright Twitter / @AstroAnnimal

एका अंतराळवीरानं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून जोडीदाराच्या बँक खात्याचा गैरवापर केला, या आरोपाची चौकशी नासा करत आहे. जर हे आरोप सिद्ध झाले तर हा अंतराळात घडलेला पहिलाच गुन्हा ठरू शकतो.

अंतराळवीर अॅन मकलेन यांनी मान्य केलंय की त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात प्रवेश केला, पण त्याचा कुठलाही गैरवापर आपण केला नाही, असं त्यांनी म्हटल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं आहे.

अॅन यांच्या जोडीदार समर वॉर्डन यांनी फेडरल ट्रेड कमिशनकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मकलेन अंतराळातून परतल्या होत्या.

त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला वकिलामार्फत सांगितलं की त्या फक्त याची खात्री करत होत्या की घर चालवण्यासाठी पुरेसे पैसै उपलब्ध आहेत की नाही, घरातील बिलं भरण्यासाठी वगैरे. तसंच वेगळे झाल्यानंतर त्यांच्या मुलाच्या संगोपनाची पुरेशी व्यवस्था आहे की नाही, याचीही सुनिश्चिती त्या करत होत्या.

त्यांनी चुकीचं काहीच केलं नाही आणि त्या तपासात पूर्णपणे सहकार्य करत आहेत, असं त्यांचे वकील रस्टी हार्डिन यांनी सांगितलं.

मॅकलेन यांनीही ट्वीट करून म्हटलं आहे की त्यांच्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. "आमचं वेगळं होणं अत्यंत दुःखद आणि खासगी आहे, पण आता ही गोष्ट मीडियात सर्वत्र आहे. मी मला मिळत असलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानते, पण चौकशी पूर्ण होईस्तोवर काहीही बोलणं टाळेन. मला तपास प्रक्रियेत पूर्ण विश्वास आहे," असं त्या एका ट्वीटमध्ये म्हणाल्या.

Image copyright Twitter

वॉर्डन या हवाई दलात इंटिलिजन्स ऑफिसर होत्या. मकलेन आणि वॉर्डन यांनी 2014मध्ये लग्न केलं. यानंतर 2018मध्ये वॉर्डन यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. नासाच्या चौकशी अधिकाऱ्यांनी या दोघींशी संपर्क साधला आहे, असं न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे.

मॅकलेन यांनी प्रतिष्ठित वेस्ट पॉइंट लष्कर अकादमीतून पदवी पूर्ण केली आहे आणि लष्करी पायलट म्हणून इराकवर 800 हून अधिक तास उड्डाण केलं आहे. एका चाचणीनंतर त्या पायलट म्हणून पात्र ठरल्या आणि 2013मध्ये त्यांची नासासाठी निवड झाली.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात त्यांनी 6 महिने घालवले आहेत आणि पहिल्या महिला स्पेसवॉकसाठी त्यांची निवड झाली होती. पण सूटचे माप चुकल्याचं कारण देत नासाने त्यांचा सहभाग शेवटच्या क्षणी रद्द केला होता.

अंतराळात कायदा कुणाचा?

आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थेत US, कॅनडा, जपान, रशिया आणि युरोपियन देशांमधील पाच अंतराळ संस्थांचा समावेश आहे. यासाठी असलेल्या कायद्यात नमूद केलं आहे की, संबंधित देशातील राष्ट्रीय कायदा कोणतीही व्यक्ती अथवा जागेवरील वस्तूला लागू होईल.

याचा अर्थ कॅनडाच्या नागरिकानं अंतराळात गुन्हा केला तर कॅनडाच्या कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा होईल. तसंच रशियन नागरिकाला रशियाच्या कायद्याप्रमाणे.

Image copyright NASA

अंतराळ कायद्यात पृथ्वीवरील प्रत्यपर्णाची तरतूद देखील करण्यात आली आहे. या अंतर्गत एखादा देश दुसऱ्या देशातील नागरिकानं अंतराळात गुन्हा केला असेल तर खटला चालवायचा की नाही, हे ठरवू शकतो.

जसजशी अंतराळात जाऊन पर्यटन करण्याची संकल्पना वास्तवात येत आहे, तसतसं अंतराळातील गुन्ह्यांविरोधात खटले दाखल करण्याची गरज भासू शकते. सध्यातरी यासाठी अलिखित कायदेशीर चौकट आहे.

अंतराळ स्थानकावर झालेल्या कोणत्याही गुन्ह्यांची माहिती नाही, असं नासाच्या अधिकाऱ्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)