जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीसह टीम इंडिया अजिंक्य

अजिंक्य रहाणे, भारत, वेस्ट इंडिज Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणेचं शतक आणि जसप्रीत बुमराहने घेतलेल्या पाच विकेट्सच्या बळावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

या विजयासह भारतीय संघाने आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 60 गुणांची कमाई केली.

या विजयासह विराट कोहलीने कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीच्या 27 टेस्ट विजयांच्या पराक्रमाची बरोबरी केली.

विदेशी भूमीवर कर्णधार म्हणून 12वा विजय मिळवत सर्वाधिक विजय मिळवण्याच्या सौरव गांगुलीच्या (11) विक्रमाला कोहलीने मागे टाकलं.

भारतीय संघाने पहिल्या डावात 297 धावांची मजल मारली. रहाणेने 81 तर रवींद्र जडेजाने 58 धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडिजकडून केमार रोचने सर्वाधिक 4 तर शॅनन गॅब्रिएलने 3 विकेट्स घेतल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इशांत शर्मा

वेस्ट इंडिजचा पहिला डाव 222 धावांतच आटोपला. रॉस्टन चेसने 48 धावा केल्या. इशांत शर्माने 5 विकेट्स घेत विंडीजच्या डावाला खिंडार पाडलं.

भारतीय संघाने दुसरा डाव 343/7 धावांवर घोषित केला. अजिंक्य रहाणेने दोन वर्षांनंतर कसोटी प्रकारात शतक साजरं केलं. त्याने 5 चौकारांच्य साह्याने 102 धावांची खेळी केली.

हनुमा विहारीने 10 चौकार आणि एका षटकारासह 93 धावांची खेळी साकारली. विराट कोहलीने 51 धावा केल्या. वेस्ट इंडिजतर्फे रॉस्टन चेसने 4 विकेट्स घेतल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जसप्रीत बुमराह

419 धावांचं लक्ष्य मिळालेल्या वेस्ट इंडिजचा डाव 100 धावांतच आटोपला. भारतीय गोलंदाजांच्य भेदक कामगिरीपुढे वेस्ट इंडिजची 5 बाद 15 अशी घसरगुंडी उडाली होती.

मात्र तळाच्या फलंदाजांनी प्रतिकार केल्यामुळे विंडीजने शंभरी गाठली. बुमराहने 8 ओव्हर्समध्ये 4 मेडनसह केवळ 7 रन्समध्ये 5 विकेट्स घेतल्या. इशांत शर्माने 3 तर मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

भारतीय गोलंदाजांनी कमीत कमी रन्स देत पाच विकेट्स घेण्याचा मान आता बुमराहच्या नावावर आहे. या विक्रमासह बुमराहने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये डावात पाच विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर केला.

81 आणि 102 धावांची खेळी करणाऱ्या रहाणेला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

या विजयासह भारतीय संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)