गणेश चतुर्थी: मी अंटार्क्टिकात गणेशोत्सव असा केला साजरा

गणपती Image copyright Mahesh Darvatkar

गणेशोत्सव सातासमुद्रापार केव्हाच पोहोचला आहे. पण अंटार्क्टिकावरही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाऊ शकतो, याची कल्पनाच कुणी केली नसेल. आज मी तुम्हाला अशाच अनुभवलेल्या गणेशोत्सवाची गोष्ट सांगणार आहे.

त्या आधी अंटार्क्टिका म्हणजे काय आहे, हे थोडंसं जाणून घेऊ या.

अंटार्क्टिका म्हणजे पृथ्वीवर असणाऱ्या सात खंडांपैकी एक खंड. पृथ्वीवरील सर्वात कमी तापमान असणारा प्रदेश म्हणून अंटार्क्टिका प्रसिद्ध आहे, कारण यावर फक्त आणि फक्त बर्फाचं साम्राज्य आहे. याच खंडावर पृथ्वीचा भौगोलिक दक्षिण ध्रुव देखील आहे.

भारत सरकारद्वारे दरवर्षी इथे वैज्ञानिक संशोधन मोहिमा राबविल्या जातात. या अशा ठिकाणी वर्षभर राहण्याची आणि काम करण्याची संधी मला मिळाली ही गणपती बाप्पाचीच कृपा म्हणावी लागेल.

सन 2016. घरापासून 12,000 हजार किलोमीटर दूर सर्वबाजूंनी समुद्राने वेढलेल्या बर्फाने आच्छादलेल्या महाकाय बेटावर राहायला येऊन जवळजवळ 8-9 महिने झाले होते. रोजची कामं करून दिवस काढायचं काम सुरू होतं. या दिवसात सूर्य केवळ 3-4 तासच दिसायचा!

काम नसताना सहकाऱ्यांशी गप्पा मारत वेळ घालवणं यासारखा विरंगुळा इथे नव्हता. अशातच एकेदिवशी सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारताना एकजण म्हणाला, "अरे! आता गणेशोत्सव 15 दिवसांवर आलाय. आपल्याकडे जोरात तयारी सुरू झाली असेल ना?"

"हो ना रे. आपल्याला आता या सगळ्याची यावर्षी मजा घेता येणार नाही," असं म्हणत दोघंही चुकचुकलो. पण मनात मात्र गणेशोत्सवाचाच विचार घोळत राहिला.

लहानपणापासून घरातील गौरी-गणपतीची आरास करण्यापासून ते पूजा-अर्चा, नैवेद्य करेपर्यंत दहा दिवस कसे जायचे, कळायचंच नाही. मात्र यंदा हे सगळं करता येणार नाही, याची हूरहूर मनाला होत होती.

दोन दिवस याच विचारात गेले. जुन्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या. विचार करता करता सरतेशेवटी मनाने पक्कं केलंच की, यंदा छोट्या प्रमाणात का होईना पण गणेशोतसव साजरा करायचाच.

Image copyright Mahesh Darvatkar

त्यासाठी सर्वप्रथम एका सहकाऱ्याशी चर्चा केली. त्यानेही माझ्या कल्पनेस होकार दर्शवला. मग काय? लागलो आम्ही तयारीला.

संशोधन केंद्रात "प्रार्थनागृह" नावाची खोली होती. इथे मोहिमेतील सर्व जातीधर्माचे सदस्य प्रार्थना करू शकायचे. आम्ही दर मंगळवारी सामूहिक आरतीचे आयोजन करायचो. म्हणून गणपती याच प्रार्थनागृहात मांडायचा, असं आम्ही ठरवलं. या प्रार्थनागृहात फार आधी कुणी एका गणेशभक्ताने सुंदर अशी सुबक गणेशाची लहानशी मूर्ती आणून ठेवली होती. याच छानशा मूर्तीची गणेशोत्सवाच्या काळात प्राणप्रतिष्ठा करायची, असं ठरलं.

गणपतीच्या मूर्तीचं सारंकाही ठरल्यानंतर आम्ही आमचा मोर्चा आरास करण्याकडे वळविला. आपल्याकडे गणेशोत्सव म्हटलं की गणपती समोरील आरास ही देखील तितकीच महत्त्वाची असते. गणेशोत्सव काळात आराशीला एक प्रकारचं भक्ती-भावनेचं वलय असतं.

ज्याठिकाणी खाण्यापिण्याचं, दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणारं सामान हे वर्षातून एकदाच यायचं, तिथे आम्हाला आरास करण्यासाठी सामान मिळणं ही अशक्य गोष्ट होती. तरीदेखील काहीतरी आरास करायचीच, असा निश्चयच आम्ही केला होता. पण कशी, हा प्रश्न माझ्या मनात कायम होता.


माशांच्या पोटात जाणार गणपती - पाहा व्हीडिओ


एके दिवशी माझ्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोर नजर जाईपर्यंत बर्फच बर्फ दिसला. नुकताच स्नोफॉल झाल्यामुळे बाहेरची शुभ्रता डोळे दिपवणारी होती.

मनात विचार आला, कितीतरी वर्षानुवर्षं हा प्रदेश बर्फाच्छादित आहे. ना इथे मनुष्यवस्ती आहे, ना इथल्या भूभागावर कुठल्याही प्रकारची झाडं आहेत. इथे कुठल्याही प्रकारचा भूचर प्राणी वास्तव्यास नाही.

समुद्रातील मासे, इतर जलचर आणि पेंग्विन पक्षी हीच इथली जैवविविधता. यातील पेंग्विन पक्षी हे समुद्रकिनाऱ्यावर, आमच्या केंद्राजवळ 'शतपावली' करायला यायचे, म्हणून मग ठरवलं की, आराशीची थीम हा अंटार्क्टिकाच असेल.

जरी आम्ही बर्फाच्छादित प्रदेशात राहत असलो तरी केंद्रामध्ये बाहेरचा बर्फ आराशीसाठी आणणं शक्य नव्हतं, कारण केंद्रामध्ये हीटरद्वारे 15 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान कायम राखलं जातं.

म्हणून बर्फाच्या जागी कापूस वापरून बर्फाच्छादित भूभाग तयार करायचं ठरवलं. त्यावर चार-पाच पेंग्विन्स फिरताना दिसावेत यासाठी पेंग्विन्सचे फोटो प्रिंट करून पुठ्ठ्यावर चिकटवले. अजून चारपाच पुठ्ठे घेऊन गणपतीसाठी सिंहासन बनविले. त्यामागे अंटार्क्टिकाचा अंतराळातून घेतलेला फोटो चिकटवला आणि इतर छोटी मोठी सजावट करून आराशीचं काम पूर्ण केलं.

Image copyright Mahesh Darvatkar

अखेर गणेशचतुर्थीचा दिवस उजाडला. आदल्या दिवशीच तिथल्या आचाऱ्याला मराठमोळ्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे याची कल्पना देऊन ठेवली होती. सुदैवाने तोही दिल्लीचा रहिवासी होता, हे एक बरं झालं.

केंद्रामध्ये सर्व सहकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. सर्वजण पारंपरिक पोषाख घालून तयार झाले होते. मोदकाचा सुगंध संपूर्ण केंद्रामध्ये दरवळत होता.

श्रीगणेशाचे आगमण केंद्राबाहेरून प्रार्थनागृहापर्यंत करण्यासाठी छोट्याशा मिरवणुकीचं आयोजन केलं. प्रार्थनाघरातून कुणी पखवाज घेतले, कुणी ताशा घेतला, कुणी खंजिरी तर कुणी टाळ! सर्वजण गणेशमूर्ती घेऊन केंद्राबाहेर बर्फात गेलो.

गणेशमूर्ती माझ्याच हातात असल्यामुळे अनवाणी पायानेच बर्फात गेलो. तिथून केंद्राकडे वाजत गाजत गणपती बाप्पा आगमनस्थ झाला. संपूर्ण केंद्रात एकच जल्लोषाचं वातावरण होतं. "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया", "एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार" असे जयघोष केंद्रात घुमू लागले. काही हौशी सदस्य या वाद्यांच्या तालावर नाचू लागले. उत्साह पार पराकोटीला गेला.

जवळपास अर्ध्या पाऊण तासाच्या मिरवणुकीनंतर वाजतगाजत गणपती बाप्पा प्रार्थनागृहाजवळ आले. मी पुढे होऊन आणखी चार जणांना हात लावण्यास सांगून गणपतीस स्थानापन्न केले. केंद्रात उपस्थित लोकांपैकी उत्तर भारतातील हिंदी भाषिकांची संख्या जास्त असल्यामुळे आरती सुरू केली...

"जय गणेश जय गणेश जय गणेश देवा I माता जाकी पार्वती पिता महादेवा II"

यानंतर "सुखर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपाजयाची".....

मोदकांचा नैवेद्य बाप्पाचरणी ठेवून मनोभावे नमस्कार केला. सर्व सदस्यांनी एक-एक करत गणरायाचे दर्शन घेतले. सर्वांनी मोदकरूपी नैवेद्य ग्रहण केला. सर्वत्र हर्षोल्हासाचं वातावरण होतं.

गणपतीला पूजेसाठी कुठलीही ताजी फुलं नाही, ना हार, ना अगरबत्ती, ना धूप-दिवा... तरीही बाप्पाने हे सर्व गोड मानून घेतले असावे.

विशेष म्हणजे कुठल्याही भौगोलिक परिस्थितीमुळे गणेशभक्तीत खंड पडला नव्हता, यामुळे एक आत्मिक समाधान लाभले. माझा तर आनंद गगनात मावत नव्हता.

Image copyright Mahesh Darvatkar

तिथून पुढे रोज एक-एक सदस्यांना आरतीचा मान देऊन सकाळ-संध्याकाळ आरती केली जात होती. सर्वच जण भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले असल्यामुळे नवीन-नवीन चालीरीतींची, परंपरांची ओळख होत होती. आपापल्या भाषेत संध्याकाळच्या आरतीच्या वेळी प्रत्येक जण गणरायाचं नामस्मरण करत होता. नैवेद्यासाठी कधी शिरा तर कधी जिलबी तर कधी लाडू, असे पदार्थ केले जात होते. श्रीगणेशाची मनोभावे पूजा होत होती.

अखेर तोही दिवस उजाडलाच.. अनंत चतुर्दशी. प्रत्येक गणेशभक्ताचा गणेशोत्सोवातील नावडता दिवस. आज गणपतीला निरोप द्यावा लागणार होता.

यावेळी मात्र आम्हाला विसर्जन मिरवणूक काढता येणार नव्हती. केंद्र प्रमुखांनी तशी परवानगी नाकारली होती. इतके दिवस खूप उत्साहाचं वातावरण होतं, पण आता जड अंत:करणाने गणरायाला निरोप द्यायचा होता. आमच्यातील एका तेलुगू भाषिक ज्येष्ठ सदस्याच्या सांगण्यावरून आम्ही आकाराने छोटी हळदीची मूर्ती मुख्य मूर्तीबरोबर स्थानापन्न केली होती. तीच छोटी मूर्ती आम्ही एका बादलीत पाणी घेऊन विसर्जित केली, कारण बाहेर होता तो केवळ बर्फच!

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)