#NoBra, #FreeTheNipple : दक्षिण कोरियातल्या महिला ब्रा घालण्याला विरोध का करतायत?

दक्षिण कोरियातल्या महिला ब्रा न घातलेले स्वत:चे फोटो #NoBra या हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या मोहिमेनं आता सोशल मीडियावर महिलांच्या चळवळीचं रूप घेतलंय.
दक्षिण कोरियन अभिनेत्री आणि गायिका सल्ली हिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पहिल्यांदा ब्रा न घातलेले फोटो शेअर केले. सल्लीचं इन्स्टाग्रामवर लाखोंच्या घरात फॉलोअर्स असल्यानं सोशल मीडियावर तिचे फोटो वाऱ्यासारखे पसरले आणि ब्रा न घातलेले फोटो शेअर करण्याला चळवळीचं रूप आलं.
सल्ली आता बऱ्याच लोकांसाठी दक्षिण कोरियातल्या 'ब्रालेस' चळवळीची प्रतिकच बनलीय आणि तिने स्पष्टपणं संदेश दिलाय की, ब्रा घालणं किंवा न घालणं हा संपूर्ण 'वैयक्तिक विषय' आहे.
ब्रालेस चळवळ
ब्रालेस चळवळीला समर्थन वाढत असतानाच सल्लीवर टीकाही होतेय. अनेक सोशल मीडिया युजर्स तिला 'अटेन्शन सिकर' म्हणजेच 'प्रसिद्धीसाठी लक्ष वेधून घेणारी' म्हणतायत, तर काहीजण तिच्यावर जाणीवपूर्वक चिथावणी देणारी कृती करत असल्याचा आरोप करतायत.
- B for Bra : महिलांनी ब्रा घालायला कधी सुरुवात केली?
- मी महिला जननेंद्रियाचा ज्ञानकोश तयार केला कारण...
काही जणांना ठामपणे वाटतं की, महिलांच्या चळवळीचा सल्ली तिच्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी वापर करतेय.
"ब्रा घालणं ही वैयक्तिक बाब असल्याचं मला माहितंय. पण ती कायम स्तन उठून दिसतील असे घट्ट शर्ट घालते आणि त्याचे फोटो घेते. तिनं तसं करायला नको." असं एका सोशल मीडिया युजर्सनं इन्स्टाग्रामवर म्हटलंय.
"तुम्ही ब्रा घातलीत म्हणून आम्ही तुम्हाला दोष देत नाही. पण तुम्ही तुमचे निपल दाखवू नये, असं आम्ही सांगतोय." असंही एकानं म्हटलंय.
"तुझी लाज वाटते. तू चर्चमध्ये अशी जाऊ शकतेस का? तू तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला किंवा सासऱ्यांना असं भेटू शकतेस का?" आणि "यामुळं केवळ पुरुषांनाच नव्हे, महिलांनाही अवघडल्यासारखं वाटतं." अशी एकानं इन्स्टाग्रामवर कमेंट केलीय.
नुकतंच हवासा या प्रसिद्ध गायिकेच्या फोटोंमुळं #NoBra चळवळ पुन्हा चर्चेत आलीय.
निवडीचं स्वातंत्र्य
हाँगकाँगमधील एका कार्यक्रमानंतर हवासा दक्षिण कोरियातल्या सोल शहरात परतत असतानाचे फोटो आणि व्हीडिओ आता व्हायरल झालेत. यात हवासानं टी शर्ट घातलीय, मात्र त्याआत ब्रा घातली नव्हती.
मात्र तेव्हापासून #NoBra चळवळीत सर्वसामान्य महिलाही सहभागी होऊ लागल्यात आणि हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय.
हा काही दक्षिण कोरियातल्या महिलांचा निवडीच्या स्वातंत्र्यासाठी वेगळा मुद्दा नाहीय.
2018 मध्ये दक्षिण कोरियातली 'एस्केप द कॉर्सेट' चळवळ प्रचंड गाजली. या चळवळीअंतर्गत अनेक महिलांनी आपापल्या डोक्यावरील केस कापले आणि त्या मेकअपविना फिरत होत्या. क्रांतिकारी पाऊल म्हणून या चळवळीकडे सोशल मीडियावर म्हटलं गेलं.
दक्षिण कोरियात महिलांनी भरपूर वेळ मेकअप करून, त्वचेची निगा राखून सुंदर दिसावं, या अशक्यप्राय अशा सामाजिक अपेक्षांविरोधात 'एस्केप द कॉर्सेट' या चळवळीला सुरुवात झाली.
अनेक महिलांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, या दोन्ही चळवळींमध्ये एक धागा आहे आणि या चळवळी सोशल मीडियावर ज्याप्रकारे पसरल्या ते म्हणजे नवीन प्रकारचं आंदोलन असल्याचे संकेत आहेत.
'गेझ रेप'
गेल्या काही वर्षात दक्षिण कोरियातल्या महिलांनी विविध विषयांवर आंदोलनं केली. सांस्कृतिक पितृसत्ताक चालीरिती , लैंगिक हिंसाचार आणि सार्वजनिक ठिकाणं किंवा रेस्टॉरंटमध्ये लावण्यात येणारे छुपे कॅमेरे यांविरोधात दक्षिण कोरियन महिलांनी आवाज उठवला आहे.
2018 मध्ये तर दक्षिण कोरियात महिलांचं सर्वात मोठं आंदोलन झालं होतं. तब्बल 10 हजार महिला सोल शहरातील रस्त्यावर उतरल्या होत्या आणि स्पायकॅम पॉर्नवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.
बीबीसीशी बोलताना दक्षिण कोरियतल्या अनेक महिलांनी सांगितलं की, त्या आता काहीशा पेचात अडकल्यात. म्हणजे, त्यांना 'ब्रालेस' चळवळीला समर्थन तर द्यायचंय, पण सार्वजनिक ठिकाणी असं ब्रा न घालता जावं की नाही, याबाबत त्या साशंक आहेत. कारण 'गेझ रेप'ची त्यांना भिती वाटतेय.
'गेझ रेप' ही संकल्पना दक्षिण कोरियातूनच पुढे आली. गेझ रेप म्हणजे एखाद्या व्यक्तीला अवघडल्यासारखं वाटेल इतकं त्याच्याकडे टक लावून पाहणं.
'नो ब्राब्लेम' ही 2014 साली डॉक्युमेंट्री बनवण्यात आली. जिआँग सिआँग-इयुन ही 28 वर्षीय तरूणी या डॉक्युमेंट्री बनवणाऱ्या टीममधील सदस्या होती. ब्रा न घालणाऱ्या महिलांच्या अनुभवांबद्दल ही डॉक्युमेंट्री भाष्य करते.
जिआँग सिआँग-इयुन म्हणते, विद्यापीठातल्या काही मित्रांसोबत मिळून त्यांनी डॉक्युमेंट्रीचा प्रकल्प सुरू केला. "ब्रा घालणं हे स्वाभाविक किंवा नैसर्गिकच आहे, असं आपल्याला का वाटतं?" असे प्रश्न त्यांनी विचारले.
निवडीचा अधिकार
तिच्या मते, या विषयावर महिला सार्वजनिकरित्या चर्चा करतायत ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र, अनेक महिलांना अजूनहीटी-शर्ट्समधून सार्वजनिकरित्या निपल्स दाखवणं 'लाज वाटणारी' गोष्ट वाटते.
"ब्रा घालणं हे दक्षिण कोरियात अजूनही सामान्य गोष्ट मानली जाते आणि त्यामुळंच त्या ब्रा घालणं योग्य मानतात." असं ती सांगते.
- हस्तमैथुन बायकाही करतात, हो मग?
- या महिलांनी शरीरावरचे केस वाढवल्यानंतर त्यांना काहींनी राक्षस म्हटलं
24 वर्षीय दक्षिण कोरियन मॉडेल पार्क आय-स्युअल ही बॉडी पॉझिटिव्हिटी चळवळीत सहभागी झाली होती. सोलमध्ये तीन दिवस ब्रा न घालता फिरण्याचा तिने एक व्हीडिओ बनवला. तो व्हीडिओ प्रचंड गाजला. त्याला 26000 हजार व्ह्यूज मिळालेत.
ती म्हणते की, "तिचे काही फॉलोअर्स मध्यम मार्ग म्हणून वायर्ड ब्राखाली पॅडऐवजी वायरलेस सॉफ्ट कप ब्रालेट्स वापरण्याकडे वळतायत."
"आपण वायर्ड-ब्रा घातले नाहीत, तर स्तन खाली लोंबकळतील आणि आपण कुरूप दिसू, असा माझा समज होता. पण ब्रा न घालता सोलमध्ये फिरण्याचा व्हीडिओ शूट केल्यानंतर आता मी ब्रा घालत नाही. आता उन्हाळ्यात मी ब्रालेट घालते आणि हिवाळ्यात ब्रा वापरतच नाही," असं ती सांगते.
ही चळवळ आता दक्षिण कोरियाच्या राजधानीपुरती मर्यादित राहिली नाहीय.
देग शहरातील व्हिज्युअल डिझाईनची विद्यार्थिनी असलेल्या 22 वर्षीय नाह्युन ली हिलाही या चळवळीनं प्रोत्साहन दिलंय.
तिनं किम्युंग विद्यापीठाच्या मास्टर्सच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून 'Yippee' नावाचं पॉप-अप ब्रँड सुरू केलंय. यंदा मे महिन्यापासून तिनं 'Brassiere, it's okay, if you don't!' या घोषणेसह निपल पॅच विकण्यास सुरूवात केलीय.
जेओलानाम-दो प्रांतातल्या दा-क्युंग ही 28 वर्षीय तरूणी सांगते की, ती अभिनेत्री आणि गायिका सल्लीच्या फोटोंवरून प्रेरित झाली. आता ती फक्त ऑफिसमध्ये ब्रा घालते, पण बॉयफ्रेंडसोबत बाहेर गेली असताना ब्रा घालत नाही.
"जर तुला ब्रा घालावं वाटत नसेल, तर तू घालू नकोस, असं माझा बॉयफ्रेंड म्हणतो." असं दा-क्युंग सांगते.
या सर्व तरूणी, महिलांचं एकच म्हणणं आहे की, महिलांना निवडीचा अधिकार आहे. मात्र, ब्रा न घालण्याबाबत संशोधन काय सांगतं?
ब्रा न घातल्यानं काही आरोग्याच्या समस्या निर्माण होतील?
डॉ. डिएडर एमसी घी हे फिजिओथेरेपिस्ट आणि वुलिंगाँग विद्यापीठात ब्रेस्ट रिसर्च ऑस्ट्रेलियाचे सहसंचालक आहेत.
ते म्हणतात, "महिलांना निवडीचा अधिकार आहे, हे मलाही मान्य आहे. मात्र, जर स्तन भरीव असतील आणि ब्रा घातला नसेल, तर शरीराच्या ठेवणीवर त्याचा परिणाम होईल. विशेषत: मान आणि पाठीच्या भागावर परिणाम होईल."
"महिलांचं वयोमानानुसार शरीररचना बदलते, त्वचेत बदल होतो आणि ब्राच्या रूपानं जो आधार मिळतो, त्याचंही स्वरूप बदलतं." असंही ते म्हणतात.
ते सांगतात की, "जेव्हा स्त्रिया ब्रा घालत नाहीत आणि कसरत करतात, त्यावेळी स्तनांची हालचाल होते. ब्रा घातल्यानं स्तनांच्या वेदना कमी होतात आणि मान, पाठीला होणारा त्रासही वाचतो."
"आमच्या संशोधनात असं आढळलंय की, जेव्हा एखाद्या महिलेला स्तन नसतात, विशेषत: बायलॅटरल मॅस्टेक्टॉमीनंतर, तेव्हा महिला ब्रा घालतात. कारण स्तन ही लैंगिक ओळख आहे."
तसेच, "स्तनांच्या दिसण्यामुळं किंवा स्तनांच्या हालचालींमुळं तुम्हाला संकोच वाटत असेल किंवा अवघडल्यासारखं होत असेल किंवा तर तुमच्या शरीराची ठेवण बिघडेल. ज्या महिलांनी मॅस्टेक्टॉमी केलीय, त्यांना तर मी आवर्जून ब्रा घालण्यास सांगतो." असं ते सांगतात.
डॉ. जेनी बर्बेज या पोर्ट्समाऊथ विद्यापीठात बायोमेकॅनिक्सच्या व्याख्यात्या आहेत. त्या म्हणतात, "ब्रा घातल्यानं अवघडल्यासारखं होणं किंवा वेदना होण्याचा संबंध घट्ट ब्रा घालण्याशी आहे. ब्रा घातल्यानं स्तनांचा कर्करोग होतो असं सांगणारा कोणताही विश्वासार्ह अहवाल अद्याप आला नाही. "
मात्र, ब्राविरोधात महिलांनी आवाज उठवण्याचा हे काही पहिलेच प्रकरण नाहीय.
1968 साली मिस अमेरिका स्पर्धेच्या बाहेर महिलांनी आंदोलन केलं होतं, तिथूनच 'ब्रा-बर्निंग फेमिनिस्ट्स' ही संकल्पना आली. अर्थात त्यावेळी त्या महिलांनी काही ब्रा शब्दश: जाळल्या नव्हत्या. मात्र, ब्रा ही महिलांवरील अत्याचाराचं प्रतिक असल्याचं म्हणत त्यांनी ब्रा कचरापेटीत टाकल्या होत्या. मात्र, तेव्हापासून 'ब्रा बर्निंग' हे शब्द स्त्रीमुक्ती चळवळीशी जोडले गेले.
याच वर्षी जूनमध्ये स्वित्झर्लंडमधील हजारो महिला रस्त्यावर आल्या आणि त्यांनी ब्रा जाळल्या, रस्ते रोखले होते. योग्य वेतन, समानता आणि लैंगिक गैरवर्तन व हिंसाचार रोखणं, अशा त्यांच्या मागण्या होत्या.
13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणाऱ्या 'नो ब्रा डे' या दिवशी जगभरात स्तनांच्या कर्करोगाची जनजागृती केली जाते. मात्र गेल्यावर्षी फिलिपाईन्समधील महिलांनी या दिवशी लैंगिक समानतेचं आवाहन केलं.
पत्रकार वेनेसा अल्मेडा म्हणतात, 'नो ब्रा डे' हा दिवस स्त्रीत्वावर जोर देतो आणि महिला म्हणून कोण आहोत, याचं कौतुक करणारा दिवस असतो.
महिलांना कशाप्रकारे गुलामीत ठेवलं जातं, याचं प्रतिक म्हणजे ब्रा आहे, असं ती म्हणते.
गेल्या काही वर्षात आंदोलकांनी एक पाऊल पुढे टाकत या गोष्टीवर भर दिलाय की, महिला आणि पुरुषांच्या निपलवरील सेन्सॉरशिप कशाप्रकारे दुटप्पी आहे.
2014 च्या डिसेंबरमध्ये नेटफ्लिक्सने 'फ्री द निपल' नावाची ड्रामा डॉक्युमेंट्री प्रदर्शित केली. न्यूयॉर्कमधील तरूणींच्या ग्रुपनं महिलांच्या स्तनांवरील सेन्सॉरशिपविरूद्ध मोहीम सुरू केली होती. त्यावर ही डॉक्युमेंट्री आधारलेली होती. या डॉक्युमेंट्रीमुळं 'फ्री द निपल' मोहीम जगभरात पोहोचली.
दक्षिण कोरियातली 'नो ब्रा' चळवळ सुद्धा यावरच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते की, जगभरात कशाप्रकारे महिलांच्या शरीराबाबत कथित बंधनं आणली जातायत.
ज्या महिलांनी या चळवळीत भाग घेतलाय, त्या दक्षिण कोरियातल्या संस्कृतीला आव्हान देतायत, अशी त्यांच्यावर टीका होतेय. असं असलं तरी देशातल्या बहुतेक महिलांसाठी ही चळवळ म्हणजे त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याशी निगडीत बाब आहे.
जोपर्यंत ब्रा न घालणं ही समस्या असणार नाही, तोपर्यंत दक्षिण कोरियातल्या महिलांनी सुरू केलेल्या चळवळीचा वेग कमी होणार नाही.
हेही वाचलंत का?
- सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?
- महिलांसारखंच आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक 'पिल' येणार?
- लवकर वयात येण्यामुळे असे उद्भवतात आरोग्याचे धोके
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)