चांद्रयान 2: चंद्राच्या जन्माची विध्वंसक कहाणी

चंद्राची निर्मिती

अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक दुसरा ग्रह आदळला आणि त्यातून चंद्राची निर्मिती झाल्याचे पुरावे संशोधकांना सापडले आहेत.

अपोलो मोहीमेतल्या अंतराळवीरांनी पृथ्वीवर परतताना चंद्रावरून आपल्यासोबत दगडांचे काही नमुने आणले. या नमुन्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांवर थिया (Theia) नावाच्या ग्रहाच्या खुणा मिळाल्या आहेत.

एक प्रचंड मोठी विनाशकारी टक्कर झाली आणि त्यातून चंद्राची निर्मिती झाल्याच्या सिद्धांताला या संशोधनामुळे दुजोरा मिळाल्याचा संशोधकांचा दावा आहे.

विज्ञान पत्रिकांमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे.

4.5 बिलियन वर्षांपूर्वी पृथ्वी आणि थिया नावाच्या ग्रहाची टक्कर झाली आणि परिणामी चंद्राची निर्मिती झाली असा सिद्धांत 1980च्या दशकापासून स्वीकारण्यात आला आहे.

ग्रीक पुराणांतली एक देवता थियावरून या ग्रहाला नाव देण्यात आलं थिया (Theia). चंद्राची देवी सलीन (Selene) हिची थिया ही आई. टक्कर झाल्यानंतर थिया ग्रहाची शकलं उडाली. पृथ्वीचाही काही हिस्सा वेगळा झाला. आणि पृथ्वी आणि थिया ग्रहांच्या शकलांमधून एकत्र येऊन चंद्र तयार झाला.

हे चंद्राच्या निर्मितीसाठीचं सगळ्यात सोपं स्पष्टीकरण असून कॉम्प्युटर सिम्युलेशन्स करून पाहिली असता हा सिद्धांत तिथेही लागू होतो.

या सिद्धांतातली मुख्य उणीव म्हणजे चंद्रावरच्या दगडांच्या नमुन्यांमध्ये कोणालाही थियाचे अंश आढळले नव्हते.

चंद्रावरच्या खडकांची उत्पत्ती ही पूर्णपणे पृथ्वीपासून झाल्याचं आधीचा अभ्यास सांगत होता. पण कॉम्प्युटर सिम्युलेशन्सवरून असा निष्कर्ष निघत होता ही चंद्राचा बहुतांश भाग हा थियापासून बनलेला आहे.

भिन्न उगमाचे अंश

चंद्रावरच्या दगडांचा आता अजून सखोल अभ्यास करण्यात आला आणि त्यामध्ये यापैकी काही अंशांचा उगम वेगळा असल्याचं आढळलं.

युनिव्हर्सिटी ऑफ गोएटिंगेनचे प्रमुख संशोधक डॉ. डॅनियल हेरवार्टझ यांच्यानुसार आतापर्यंत कोणालाही या कोलिजन थियरी (टक्कर होऊन निर्मिती झाल्याचा सिद्धांत) विषयीचे ठोस पुरावे मिळालेले नव्हते.

"हे सगळ्या इतक्या पातळीपर्यंत आलं होतं की टक्कर झालीच नाही असं काही जण म्हणू लागले. पण आता आम्हाला पृथ्वी आणि चंद्रावरच्या खडकांमध्ये काही फरक सापडले आहेत. याने मोठी टक्कर झाल्याच्या गृहितकाला दुजोरा मिळतो." बीबीसी न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितलं.

पण काहींच्या मते चंद्राची निर्मिती झाल्यानंतर पृथ्वीमध्ये काही गोष्टी शोषल्या गेल्या. त्या वरून या फरकांविषयीचा तपशील समजू शकेल असं काहींचं म्हणणं आहे.

चंद्रावरच्या दगडामध्ये सापडलेले थिया ग्रहाचे अंश आणि पृथ्वी यामध्ये अत्यंत कमी प्रमाण भेद असल्याचं अनेक वैज्ञानिकांना आश्चर्य वाटतं. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक ऍलेक्स हॅलिडे हे त्या वैज्ञानिकांपैकी एक आहेत.

Image copyright NASA/NEWSMAKERS

"खरंतर आम्ही मोठ्या प्रमाणावरचा वेगळेपणा शोधत होतो. कारण अशनींच्या आतापर्यंतच्या अभ्यासावरून सूर्यमालेविषयी तसं आढळलं होतं."

पृथ्वी आणि चंद्रावरील खडकांमधील आयसोटोपिक कॉम्पोझिशन ऑफ ऑक्सिजन (Isotopic composition of the oxygen) म्हणजे ऑक्सिजनच्या संयुगांचा अभ्यास करून डॉ. हेरवार्टझ यांनी फरक अभ्यासला. ऑक्सिजनच्या विविध रूपांमधलं हे गुणोत्तर असतं.

मंगळावरचे आणि सौर मालेतल्या इतर अशनींच्या अभ्यासावरून असं आढळलं की हे गुणोत्तर प्रकर्षाने वेगळं असतं. म्हणूनच पृथ्वी आणि थियावरच्या खडकांमध्ये इतकं साधर्म्य आढळल्याने प्राध्यापक हॅलिडे आणि इतर चकित झाले आहेत.

साधर्म्य

थियाची निर्मिती पृथ्वीच्या जवळच झाली होती आणि म्हणूनच पृथ्वी आणि थियामध्ये साधर्म्य होतं, अशी एक शक्यता आहे. असं असेल तर मग सौरमालेतल्या प्रत्येक ग्रहामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, या तत्त्वाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं प्राध्यापक हॅलिडे म्हणतात.

"मंगळावरच्या उल्का आणि सौरमालेत बाहेरच्या बाजूला असणाऱ्या अशनींच्या पट्ट्यांमधल्या उल्का या सौरमालेच्या आतल्या बाजूला असणाऱ्या ग्रहांचं प्रतिनिधित्व करू शकतात का असा प्रश्न यामुळे उभा राहतो. आपल्याकडे बुध (Mercury) आणि शुक्राचे (Venus) नमुने नाहीत."

Image copyright LUIS ARGERICH/SCIENCE PHOTO LIBRARY

"कदाचित त्यांच्यात आणि पृथ्वीमध्ये साधर्म्य असेल आणि तसं झाल्यास पृथ्वी आणि चंद्रामधल्या साधर्म्याविषयीचे सगळे वाद निकालात निघतील," त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.

हे संशोधन 'एक्सायटिंग' असल्याचं ओपन युनिव्हर्सिटीचे डॉ. महेश आनंद म्हणतात पण ही माहिती दगडांच्या फक्त तीन नमुन्यांमधून मिळाली असल्याचंही ते निदर्शनाला आणतात.

"या दगडांवरून संपूर्ण चंद्राविषयीचे आडाखे बांधायचे का, याविषयी थोडी काळजी घ्यायला हवी. या सिद्धांताला दुजोरा देण्यासाठी चंद्रावरच्या विविध दगडांचा अभ्यास होणं आवश्यक आहे," ते म्हणतात.

पृथ्वी आणि चंद्रामध्ये इतकं साधर्म्य का आहे हे सांगण्यासाठी इतरही काही सिद्धांत मांडण्यात आले आहेत. एका सिद्धांतानुसार टक्कर होण्यापूर्वी पृथ्वी अतिशय वेगाने फिरत होती. तर दुसऱ्या सिद्धांतानुसार सध्या अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्यापेक्षा थिया ग्रह बराच मोठा होता.

नेदरलँड्स मधल्या ग्रोनिनगेन युनिव्हर्सिटीमधल्या प्राध्यापक रॉब डे मेजे यांनी मांडलेला एक पर्यायी वादग्रस्त सिद्धांत असंही म्हणतो की पृथ्वीच्या गर्भामध्ये 2900 किलोमीटर खोल साचलेल्या आण्विक साठ्याचा स्फोट झाला आणि पृथ्वीच्या आवरणाची शकलं उडाली. हे सगळे तुकडे एकत्र आले आणि चंद्र तयार झाला.

पृथ्वी आणि चंद्राची निर्मिती वेगवेगळ्या गोष्टींपासून झाली असल्याचं सांगणाऱ्या नव्या संशोधनामुळे आपलं मत बदललं नसल्याचं त्यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं.

"हा फरक अतिशय लहानसा आहे. चंद्राची निर्मिती कशी झाली हे अजूनही आपल्याला नेमकं माहित नाही. आता चंद्रावर अंतराळवीर असणाऱ्या मोहीमा पाठवून चंद्राच्या पृष्ठभागावर खोलवर खोदून शोध घेण्याची गरज आहे. असे नमुने तपासायला हवेत जे उल्का आदळल्याने किंवा सौर वाऱ्यांमुळे दूषित झालेले नाहीत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)