चांद्रयान 2: पाकिस्तानातून आल्या खवचट प्रतिक्रिया'आम्ही सांगितलं होतं का 900 कोटी रूपये खर्च करायला?'

चंद्र Image copyright @ISRO

भारताच्या 'चांद्रयान 2'च्या विक्रम मून लँडरशी चंद्रभूमीपासून दोन किलोमीटरवर असताना संपर्क तुटला. 22 जुलै रोजी 'चांद्रयान 2'चं प्रक्षेपण झालं होतं. त्यानंतर 47 दिवस प्रवास करून 'चांद्रयान 2' चंद्रभूमीपासून अवघ्या काही अंतरावर पोहोचला होता.

सुरूवातीला सर्वकाही नीट होतं, मात्र चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किमी अंतरावर विक्रम लँडरचा संपर्क तुटला, असं इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितलं.

आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन हे देश चंद्रावर अंतराळ यानाचं सॉफ्ट लँडिंग करू शकले आहेत. भारत या यशापासून केवळ दोन पावलं दूर राहिला आहे.

विक्रम मून लँडर चंद्रभूमीवर उतरणार असल्यानं या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरूस्थित इस्रोच्या मुख्यालयात उपस्थित होते.

यावेळी विक्रम मून लँडरशी संपर्क तुटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, कोणत्याही मोठ्या कामात चढ-उतार येत असतात.

चांद्रयान 2 बाबत भारतीयांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. लोकांच्या नजरा इस्रोच्या मिशनवर होतं. जेव्हा विक्रम मून लँडरशी संपर्क तुटण्याचं वृत्त इस्रोनं दिलं, त्यावेळी भारतीय निराश झाले. मात्र, याही स्थितीत भारतीयांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानातून मात्र विक्रम मून लँडरशी संपर्क तुटल्याच्या वृत्तानंतर इस्रोवर टीका केली आणि भारताची खिल्ली उडवली गेली.

पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीडिओला रि-ट्वीट करत म्हणाले, "मोदीजी सॅटेलाईट कम्युनिकेशनवर भाषण देतायत. खरंतर हे राजकीय नेते नसून अंतराळवीर आहेत. एका गरीब देशाचे 900 कोटी रूपये मातीत घातल्याबद्दल लोकसभेनं मोदींना जाब विचारला पाहिजे."

Image copyright Twitter

यापाठोपाठ फवाद चौधरींनी दुसरा ट्वीट केला, त्यात ते म्हणाले, "मला आश्चर्य वाटतंय की, भारतीय ट्रोल्स मला अशाप्रकारे ट्रोल करतायत की, जसं त्यांच्या चंद्र मोहिमेला मीच अयशस्वी केलंय. आम्ही सांगितलं होतं का 900 कोटी रूपये खर्च करायला? आता वाट पाहा आणि झोपण्याचा प्रयत्न करा. #IndiaFailed"

Image copyright Twitter

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कंट्रोल रूममधून पळताना पाहिलं का? असं पाकिस्तानातील एका ट्विटर युजरनं विचारल्यावर, फवाद चौधरी म्हणाले, अरेरे, तो क्षण मी पाहू शकलो नाही.

Image copyright Twitter

अभय कश्यप नामक भारतीय युजरनं नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यावर फवाद चौधरी म्हणाले, "झोपून जा भाई, चंद्राऐवजी खेळणं मुंबईत उतरलं. जे काम येत नाही, त्यात पडायचंच नाही."

Image copyright Twitter

फवाद चौधरींना उद्देशून भारतातील पत्रकार आदित्य राज कौल यांनी म्हटलं, "ही व्यक्ती पाकिस्तानसाठी चांगली नाहीय. जसं माहिती आणि प्रसारण मंत्रिपदावरून हटवलं गेलं, तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रिपदावरूनही हटवायला हवं. यांचं एकच काम आहे, ते म्हणजे सूर्योदय आणि चंद्राचा वेळ लिहून ठेवणं आहे. हा काय वेडेपणा आहे? बुद्धी विकून खाल्लीय का?"

Image copyright Twitter

पाकिस्तानात #IndiaFailed हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होता. इस्रोचा विक्रम मून लँडरशी संपर्क तुटल्यानं या हॅशटॅगद्वारे पाकिस्तानातून भारताची खिल्ली उडवली जात होती.

पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी ट्वीट केलंय की, "इस्रो, खूप भारी. कुणाची चूक आहे? पहिले - निर्दोष काश्मिरींची, ज्यांना कैद करून ठेवलंय? दुसरे - मुस्लीम आणि अल्पसंख्यांक? की भारतातील हिंदुत्त्वविरोधी आवाज? चौथा आयएसआय? तुम्हाला हिंदुत्व कुठेच नेणार नाही."

Image copyright Twitter

पाकिस्तानात कालपासून सातत्यानं भारताच्या चांद्रयान-2 मिशनची खिल्ली उडवली जात असून, काही लोक तर या मिशनला विंग कमांडर अभिनंदन यांच्याशी जोडत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)