राफेल नदाल: US ओपन जिंकणाऱ्या झुंजार लढवय्याची गोष्ट

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राफेल नदाल

US ओपनच्या प्रसिद्ध ऑर्थर अशे स्टेडियमवर मेन्स फायनलसाठी स्टेडियम हाऊसफुल्ल झालेलं. 33 वर्षांचा राफेल नदाल आणि 23 वर्षांचा दानिल मेदव्हेदेव समोरासमोर होते. नदाल 19वं ग्रँड स्लॅम जिंकण्यासाठी उत्सुक तर पहिलंवहिलं ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी मेदव्हेदेव आतूर होता. अनुभव आणि कर्तृत्व यांचा सुरेख मिलाफ साधत नदालने तरण्याबांडला मेदव्हेदेवला नमवत शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

समकालीन रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच यांचं आव्हान संपुष्टात आलेलं असताना 33 वर्षीय राफेल नदालने चिवटपणे वाटचाल करत US ओपनचं जेतेपद पटकावलं.

प्रचंड ताकद, खेळासाठी आवश्यक कौशल्यांवर असलेले अफाट प्रभुत्व आणि कोणत्याही स्थितीतून पुनरागमन करण्याची हातोटी यामुळे नदाल वेगळा ठरतो. पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर त्वेषाने आक्रमण करणारा नदाल एखाद्या योद्धासारखा भासतो. त्याला निव्वळ बघूनही प्रतिस्पर्ध्यांना घाम फुटू शकतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राफेल नदाल

फ्रेंच ओपनची लाल माती हा नदालचा बालेकिल्ला. यंदाही नदालने तो गड राखला होता. US ओपनच्या निमित्ताने नदालने हार्ड कोर्टवरही हुकूमत सिद्ध केली.

रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच या त्रिकुटाची ग्रँड स्लॅम जेतेपदावर सद्दी आहे. त्रिकुटापैकी फेडररने यंदाच्या US ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतून गाशा गुंडाळला तर जोकोव्हिचला दुखापतीमुळे लढतीतून माघार घ्यावी लागली. या दोघांच्या तुलनेत असंख्य दुखापती झेललेल्या नदालने तरुण प्रतिस्पर्ध्यांना चीतपट करत कारकिर्दीतील 19व्या तर US ओपनच्या चौथ्या जेतेपदाची कमाई केली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राफेल नदाल युएस ओपन करंडकासह

नदालच्या दुखापतींची यादी ऐकली तर सामान्य माणूस दडपून जाईल. नदालला कारकिर्दीच्या सुरुवातीला म्हणजे 2003 मध्ये कोपऱ्याच्या दुखापतीने त्रासलं होतं. दोन वर्षांनंतर टाचेला झालेल्या दुखापतीने तो हैराण झाला होता. त्यानंतर गुडघ्याच्या दुखण्याने उचल खाल्ली. त्यापाठोपाठ पाठीने साथ सोडली. एवढं पुरेसं नाही म्हणून डाव्या हातालाही दुखापत झाली होती. मनगटानेही त्याला दगा दिला होता. मांडीच्या स्नायू ताणले गेले होते.

21व्या वर्षांपासून नदालच्या गुडघ्यांना विशिष्ट व्याधी आहे. अनेक वर्षं पेनकिलर्स इंजेक्शनचा मारा सुरू होता. मधल्या काळात गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. दुखापतींच्या ससेमिऱ्यामुळे नदाल अनेक स्पर्धा खेळू शकला नाही, काही वेळेला त्याला माघार घ्यावी लागली आहे. परंतु त्याची जिंकण्याची उर्मी जराही कमी होत नाही.

ताकदवान फोरहँड हे नदालचं मुख्य अस्त्र आहे. एखाद्या तरुणाला साजेशा सळसळत्या ऊर्जेसह खेळणारा नदाल लक्ष्यभेदी फोरहँड लगावत प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करतो. समोरच्या खेळाडूला कोर्टभर पळवत राहून ठराविक कोन साधत आक्रमण करण्यात नदाल माहीर आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नदाल फोरहँडचा फटका मारताना

नदाल डावखुरा आहे. तो फटके लगावतो ते समोरच्या खेळाडूच्या विरुद्ध दिशेने जातात. उदाहरणार्थ नदालचा फोरहँड उजव्या हाताने खेळणाऱ्या खेळाडूसाठी बॅकहँडच्या पट्ट्यात येतो. त्याला एका बाजूला जाऊन खेळणं भाग पडतं. त्याचं संतुलन हरवतं. पुढचा फटका मारण्यासाठी कोर्टची दुसरी बाजू गाठेपर्यंत त्याची दमछाक उडते. डावखुरं असण्याचा नदाल पुरेपूर फायदा उठवतो.

सर्व्हिस हा टेनिसचा कणा आहे. टेनिसपटू पहिली सर्व्हिस कशी करतो यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. नदाल इथेही वेगळा आहे. दुसरी सर्व्हिस हे नदालचं वैशिष्ट्य आहे. प्रतिस्पर्ध्याला निरुत्तर करण्यासाठी नदालचा याचा उपयोग करतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राफेल नदाल

पॉवरगेम हे नदालच्या खेळाची ओळख आहे. नदालच्या फटक्यातली ताकद समोरच्याला खेळाडूला लेचंपेचं करून टाकते. मात्र त्याचवेळी नदालच्या शरीराची लवचिकता विलक्षण आहे. दुखापतींनी कितीही जर्जर केलं असलं तरी तरी चेंडू परतावण्यासाठी नदाल संपूर्ण कोर्टभर पळत असतो. आपण लगावलेला फटका नदालच्या टप्प्यात नाही असा विचार प्रतिस्पर्धी करतात मात्र नदाल कोर्टच्या कुठच्याही भागात वेगाने सरसावतो आणि चेंडू परतावून लावतो.

प्रदीर्घ काळ चालणाऱ्या रॅलीत प्रतिस्पर्ध्याला दमवून टाकण्यात नदाल वाकबगार आहे. टेनिस हा दमसासाची परीक्षा पाहणारा खेळ आहे. उष्ण आणि दमट वातावरणात टेनिस खेळणं अवघड आहे. त्यात नदालच्या शरीरला दुखापतींचा वेढा आहे. परंतु टेनिसचा सच्चा पाईक असणारा नदाल खेळत राहतो. आव्हानांना, अडथळ्यांना पार करत झुंजत राहतो. त्याची इच्छाशक्ती केवळ खेळ जगतातल्या नव्हे तर सर्वसामान्य चाहत्यांनाही प्रेरणादायी ठरते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नोव्हाक जोकोव्हिच, राफेल नदाल आणि रॉजर फेडरर

योगायोग म्हणजे रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच नदालचे समकालीन आहेत. या दोघांची जिंकण्याची उर्मी तितकीच प्रबळ आहे. सार्वकालीन महान खेळाडूंच्या मांदियाळीत समावेश असलेले हे दोघं यंत्रवत सातत्याने जिंकत असतात. या दोघांविरुद्धच्या नदालच्या मॅचेस ऑल टाईम ग्रेटमध्ये नोंदल्या गेल्या आहेत. फेडरर आणि जोकोव्हिच यांच्याविरुद्ध जिंकून जेतेपद पटकावण्याची किमया नदाल करतो. या दोघांव्यतिरिक्त अन्य प्रतिस्पर्धी तुल्यबळ असतात. कारण ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी पात्र होणंही खडतर असतं. अशा परिस्थितीत समोर येणारा प्रत्येकजण शेरास सव्वाशेर असतो.

2016-2017 कालखंड नदालसाठी निराशामय होता. ग्रँड स्लॅम जेतेपदं दुरावली होती. दुखापतींचे भोग होतेच. त्या काळात टेनिस सोडावं असं त्याच्या मनात आलं होतं. आता पुरे अशा विचारांना तो पोहोचला होता. मात्र कुठूनही पुनराममन करण्यासाठी प्रसिद्ध नदालने नकारात्मक विचारांना बाजूला सारत दिमाखात पुनरागमन केला.

नदाल ग्रँड स्लॅम आकडेवारी

स्पर्धा जेतेपदांची संख्या
ऑस्ट्रेलियन ओपन 1
फ्रेंच ओपन 12
विम्बलडन 2
अमेरिकन ओपन 4

नदालची यंदाच्या जेतेपदापर्यंतची वाटचाल

प्रतिस्पर्धी स्कोअर
जॉन मिलमन 6-3, 6-2, 6-2
च्युंग ह्युआन 6-3, 6-4, 6-2
मारिन चिलीच 6-3, 3-6, 6-1, 6-2
दिएगो श्वार्ट्झमन 6-4, 7-5, 6-2
मॅटो बेरटिनी 7-6 (8-6), 6-4, 6-1
दानिल मेदव्हेदेव 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)