पॉर्नहबला होतो रिव्हेंज पॉर्नमधून नफा, पण पीडितांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो?

निराश महिला Image copyright Getty Images

पॉर्न स्ट्रीम करणाऱ्या पॉर्नहब वेबसाईटला सध्या नफा होतोय तो 'रिव्हेंज पॉर्न'मधून. आणि तक्रार केल्यानंतरही हे व्हिडिओज काढून टाकले जात नसल्याचं बीबीसी न्यूजला सांगण्यात आलंय.

रिव्हेंज पॉर्न म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी किंवा बदनामीसाठी तिच्या परवानगीशिवाय लैंगिक चित्रण असणारे फोटो वा व्हिडिओज ऑनलाईन पसरवणं.

हे पसरवणारी व्यक्ती ही बळी पडलेल्या व्यक्तीसोबत पूर्वी नात्यात असलेली असू शकते किंवा बळी पडलेल्या व्यक्तीच्या डिजिटल अर्काईव्ह वा आय-क्लाऊडमधून हा डेटा चोरलेला असू शकतो.

'सोफी' नावाच्या महिलेने सांगितलं की तिचा एक व्हिडिओ ऑनलाईन अपलोड करण्यात आला तो हजारोवेळा पाहिला गेला. यामुळे आपल्या खासगी बाबी चव्हाट्यावर आल्याचं तिने म्हटलंय.

अशा प्रकारच्या कन्टेन्टमुळे माईंडगीक या पॉर्नहबच्या मालक कंपनीला जाहिरातींतून भरपूर उत्पन्न मिळत असल्याचं #NotYourPorn ही मोहीम चालवणाऱ्या गटाने म्हटलं आहे.

तर आपण रिव्हेंज पॉर्न म्हणजे बदला घेण्यासाठीच्या पॉर्नचा 'कडक निषेध' करत असल्याचं पॉर्नहबने म्हटलंय.

आपल्याकडे या इंडस्ट्रीमधील सर्वांत प्रगत 'अॅंटी रिव्हेंज पॉर्न पॉलिसी' असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Image copyright Getty Images

सोफी उल्लेख करत असलेले व्हिडिओ काढून टाकण्यात यावेत असे कोणतेही ईमेल्स आपल्याला सापडले नाहीत पण आता आपण सोफीच्या संपर्कात असून 'एकत्र तोडगा काढण्याच्या प्रयत्नात' असल्याचं पॉर्नहबने म्हटलंय.

'धक्का आणि लाज'

सोफीने (मूळ नाव बदलण्यात आलं आहे) याविषयी बीबीसीच्या व्हिक्टोरिया डर्बिशर कार्यक्रमात बोलताना सांगितलं. 18 महिन्यांपूर्वी ती तिच्या कुटुंबासोबत बाहेर गेली होती. फोन पाहिल्यानंतर तिला अनेक मिस्ड कॉल्स आणि मेसेजेस दिसले.

पॉर्नहब या जगातल्या सर्वांत मोठ्या पॉर्नसाईटवर तिच्या बहिणीच्या मित्राला तिचे व्हीडिओ सापडले होते. ते

व्हिडिओज टॉप 10 चार्टमध्ये होते आणि हजारो लोकांनी पाहिलेले होते.

"मला धक्काच बसला. लाज वाटली. माझ्या खासगी हक्कांचं उल्लंघन झाल्यासारखं वाटलं," तिने सांगितलं.

सोफीने तिच्या माजी प्रियकरासोबत पूर्वी 6 व्हिडिओज केले होते. पण अनेक वर्षांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला होता आणि हे व्हिडिओज ऑनलाईन टाकण्यासाठी तिने कोणालाही परवानगी दिलेली नव्हती.

पॉर्नहबवर हे व्हिडिओ टाकण्यात आल्याचं तिच्या लक्षात आल्यानंतर आठवड्याभरात ते काढून टाकण्यात आले.

पण हे सहा व्हिडिओज पॉर्नहबवर आल्याने कोणीतरी त्याच्या 100 व्हिडिओ क्लिप्स केल्या आणि त्या नंतर परत पॉर्नहबवर अपलोड करण्यात आल्या.

तिने याबद्दल पुन्हा साईटला कळवलं. पण त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं ती सांगते.

पॉर्नहबकडे येणाऱ्या व्हिडिओ काढून टाकण्याच्या मागण्यांचं काम पाहणाऱ्या कंपनीशी सोफीची गाठ घालून देण्यात आली, पण त्यांच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याचं ती सांगते.

तिने पोलिसांकडेही याविषयी दाद मागितली. पण आतापर्यंत कोणावरही आरोप दाखल करण्यात आलेले नाहीत.

अशा प्रकारच्या रिव्हेंज पॉर्नला पॉर्नहब 'अॅमेच्युअर' किंवा 'होम-मेड' कन्टेन्ट असं नाव देत असल्याचं #NotYourPorn मोहीमेच्या केट आयसॅक म्हणतात. पॉर्नहबवर सर्वांत जास्त शोधले जाणारे हे दोन शब्द असून यामुळे साईटला अधिक जाहिराती मिळतात.

अशा प्रकारच्या तक्रारी आल्याबरोबर त्या ताबडतोब डिलीट करण्यासाठी कंपनीने जास्त प्रयत्न करावेत आणि एकदा काढून टाकलेले व्हिडिओ पुन्हा अपलोड होण्यापासून रोखावेत अशी मागणी सोफीने केली आहे.

'कुटुंबावर परिणाम'

आपले व्हिडिओज ऑनलाईन असल्याचं सोफीच्या लक्षात आलं तेव्हा ती एका नव्या नात्यात होती.

पण या प्रकरणामुळे या नात्यात तणाव निर्माण झाला.

सोफीच्या प्रियकराच्या मित्रांनी त्याची पॉर्नहबवरच्या तिच्या व्हिडिओवरून थट्टा केल्याचं ती सांगते.

सोफीला एक टीनएजर मुलगी आहे आणि या सगळ्याचा तिच्यावर परिणाम झाल्याचं सोफी सांगते.

पॉर्नहबचे उपाध्यक्ष कोरी प्राईस म्हणाले, "आमच्या नियमांचा भंग करणारा कन्टेन्ट जर अपलोड करण्यात आलं तर ते आम्हाला कळल्याबरोबर लवकरात लवकर काढून टाकण्यात येतो. यामध्ये नॉन - कन्सेन्ट म्हणजे परवानगी न घेता उपलोड करण्यात आलेला कन्टेन्टही असतो."

"आमच्या सगळ्या फॅन्सच्या सुरक्षिततेसाठी आम्ही 2015मध्ये रिव्हेंज पॉर्नच्या विरोधात अधिकृतपणे कडक भूमिका स्वीकारली असून रिव्हेंज पॉर्नला आम्ही लैंगिक हल्ल्याचाच प्रकार मानतो. परवानगीशिवाय अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती करणारा एका फॉर्म आम्ही उपलब्ध करून दिला आहे," प्राईस म्हणाले.

"याशिवाय आम्ही अद्ययावत थर्ड पार्टी डिजिटल फिंगर प्रिंटिंग सॉफ्टवेअर वापरतो. हे सॉफ्टवेअर नव्याने अपलोड होत असलेले व्हिडिओ तपासतं आणि त्यामध्ये काही विनापरवाना गोष्टी आहेत का, आधी काढून टाकण्यात आलेला व्हिडिओ पुन्हा अपलोड केला जाणार नाही, याची खात्री केली जाते."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)