जेव्हा न्यायालयाने दिला कोंबड्याला आरवण्याचा ‘कायदेशीर अधिकार’

न्यायालयात कोंबड्याच्या आरवण्यासाठी लढा Image copyright Reuters

प्रश्न : कोंबडा काय करतो?

उत्तर : कुकडू कू...

कोंबड्याचा आवाज म्हणजे 'कुकडू कू...' मराठीत याला बांग देणं किंवा आरवणं म्हणतात. तसं पाहिलं तर कोंबड्याने बांग देणं नैसर्गिक आहे. पण आरवता यावं म्हणून एखाद्या कोंबड्याला कोर्टात धाव घ्यावी लागली तर?

पण खरंच असं घडलंय. फ्रान्समधल्या एका न्यायालयाने एका कोंबड्याला कायदेशीररित्या 'बांग देण्याचा अधिकार' दिलाय.

या कोंबड्याचं नाव आहे - मॉरिस आणि या कोंबड्याच्या आरवण्यामुळे फ्रान्समधल्या शहरी आणि ग्रामीण गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पण आता न्याय मिळाल्यामुळे मॉरिस दररोज सकाळी बांग देऊ शकतो.

सकाळी होणाऱ्या आवाजामुळे एका शेजाऱ्याने मॉरिसच्या मालकाला कोर्टात खेचलं आणि या वादाला सुरुवात झाली.

फ्रान्समधल्या ऑलाँ शहरात 4 वर्षांचा मॉरिस राहतो. फ्रान्समधल्या अनेकांनी या शहरामध्ये आपलं 'सेकंड होम' घ्यायला सुरुवात केली आहे. यापैकीच एक असणाऱ्या ज्याँ लुई बिहाँ यांना मॉरिसच्या आरवण्याचा त्रास व्हायला लागला.

जॅकी आणि त्यांची पत्नी कोहिना या मॉरिसच्या मालकांकडे त्यांनी याबाबत तक्रार केली.

कोंबड्याच्या आरवण्याचा राष्ट्रीय वाद

2017 साली ज्याँ लुईने आपल्या शेजाऱ्यांना पत्र लिहून कळवलं, "हा कोंबडा पहाटे साडेचारपासून ओरडायला सुरुवात करतो आणि अख्खी सकाळ ओरडत रहातो. दुपारीदेखील याचा आवाज थांबत नाही."

पण मॉरिसला गप्प करण्यास त्याच्या मालकाने नकार दिल्यावर लुईंनी हे प्रकरण कोर्टात नेलं. लवकरच हा फ्रान्समध्ये राष्ट्रीय वादाचा मुद्दा बनला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा न्यायालयाबाहेर लोक मॉरिसचे फोटो घेत होते.

फ्रान्समधल्या एका मोठ्या गटाला मॉरिसबद्दल सहानुभूती वाटत होती आणि बांग देण्याचा त्याचा हक्क वाचवण्यासाठी लोकांनी ऑनलाईन याचिका दाखल केल्या. इतकंच नाही तर मॉरिस आणि त्याच्या बांगेच्या समर्थनार्थ लोकांनी 1 लाख 40 हजार सह्या गोळा केल्या आणि त्याचा फोटो असलेला टी-शर्ट घालायला सुरुवात केली.

मॉरिसचे समर्थक असणाऱ्या आणि त्याचा फोटो असणारे टी-शर्ट विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने सांगितलं, "आम्हाला मॉरिस आणि त्याच्या मालकांना पाठिंबा तर द्यायचाच होता. पण सोबतच या गोष्टीचाही राग येत होता की कोणी एखाद्या कोंबड्याला कसं कोर्टात खेचू शकतं?"

'ही तर असहिष्णुता'

मॉरिसच्या समर्थनार्थ ऑनलाईन याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे, "यापुढे काय? आता लोक पक्ष्यांच्या किलबिलाटावरही बंदी आणणार का?"

'शांतता भंग' केल्याच्या आरोपाखाली लुईच्या वकिलांना मॉरिसच्या मालकांकडून मोठी भरपाई हवी होती. पण कोर्टाने मॉरिसच्या बाजूने निर्णय दिला. इतकंच नाही तर कोर्टाने उलट मॉरिसच्या मालकांना त्रास दिल्याबद्दल लुईला 1100 डॉर्लसची नुकसान भरपाईही द्यायला सांगितली.

मॉरिसची मालकीण कोहिनाने कोर्टाच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केलाय. रॉयटर्स वृत्तसंस्थेला त्यांनी सांगितलं, "गावं पूर्वीसारखीच रहायला हवीत. आज मॉरिसने अख्ख्या फ्रान्सची लढाई जिंकलीये."

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा मॉरिसच्या समर्थनार्थ तयार केलेले टी-शर्ट

कोंबड्याला आरवण्याचा अधिकार देणारा हा निर्णय फ्रान्समध्ये हे एक उदाहरण बनला आहे. ऑक्टोबरमध्ये आता याच्याच धर्तीवर अशाच इतर प्रकरणांची सुनावणी होणार आहे. बदक आणि सारस पक्षी जोराने आवाज करत असल्याच्या या तक्रारी आहेत. फ्रान्समध्ये चर्चच्या घंटा आणि गायींच्या हंबरण्याच्या आवाजांवरूनही कायदेशीर युद्ध होत आहेत.

फ्रान्समध्ये दररोज अनेक लोक ग्रामीण भागात स्थायिक होतात. शेती करण्यासाठी नाही तर फक्त शांतपणे राहण्यासाठी हे लोक दूरवरच्या भागांत जाऊन राहतात आणि प्रत्येकाला आपली 'स्पेस' हवी असते, असं भूवैज्ञानिक ज्याँ लुई यांचं म्हणणं आहे.

ऑलाँचे महापौर ख्रिस्टोफर यांनी म्हटलं, "ही तर असहिष्णुता आहे. तुम्ही स्थानिक परंपरांचा स्वीकार करायला हवा."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)