कीटकनाशकांवर बंदी आणल्याने आत्महत्यांचं प्रमाण कमी होईल का? – बीबीसी रिअॅलिटी चेक

कीटकनाशकं, भारत, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कीटकनाशक फवारणी

जगभरात दरवर्षी साधारण दीड लाख लोक कीटकनाशकाचं सेवन करून आत्महत्या करतात.

भारतात 2015 मध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या 1.34 लाख होती. यापैकी 24 हजार जणांनी कीटकनाशक प्राशन करून जीव संपवला होता. मात्र या मृत्यूंविषयी फारशी माहिती समोर आली नाही.

कीटनकाशक घेऊन आत्महत्या केली, हे सर्वसाधारणपणे कोणाला सांगितलं जात नाही, कारण नियमानुसार त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागते, असं चंदीगडस्थित इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेतील डॉ. आशिष भल्ला यांनी सांगितलं.

Image copyright Jaideep Hardikar
प्रतिमा मथळा भारतात शेतीसाठी कीटकनाशकं सर्रास वापरली जातात.

युकेच्या एका संशोधन गटाने केलेल्या संशोधनानुसार, आत्महत्येसाठी वापरली जाणाऱ्या 10 अत्यंत विषारी घटकांवर भारत सरकारने बंदी घातली आहे. आणखी वर्षभरात प्रतिबंधित घटकांची यादी वाढण्याची शक्यता आहे.

मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशक तत्त्वांनुसार, अजूनही अत्यंत धोकादायक अशी विषारी रसायनं उपलब्ध आहेत.

प्रतिमा मथळा शेतमजुरांपर्यंत अजूनही सुरक्षेसंदर्भातल्या सूचना पोचलेल्या नाहीत.

या आत्महत्या रोखण्यासाठी या कीटकनाशकांची उपलब्धता कमी करण्याची सूचना संयुक्त राष्ट्र संघटनेने केली आहे.

श्रीलंकेने गेल्या दोन दशकांमध्ये अनेक कीटकनाशकांवर बंदी घातली आहे आणि त्याचा परिणाम तिथे पाहायला मिळाला. मात्र अन्य काही देशांमध्ये अत्यंत विषारी अशी कीटकनाशकं आत्महत्येला कारणीभूत ठरत आहेत.

कीटकनाशक प्राशनासह आत्महत्या करण्याचं प्रमाण 90च्या दशकापासून निम्म्यावर आलं आहे. मात्र आशिया खंडातील गरीब समाजामध्ये कीटकनाशक पिऊन जीव देण्याचं प्रमाण वाढत आहे.

1980 आणि 1990च्या दशकात श्रीलंकेत आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक होतं. या आत्महत्यांपैकी दोन तृतीयांश घटनांमध्ये कीटकनाशकं पिऊनच जीव संपवला गेला होता.

मात्र श्रीलंकेच्या सरकारने या घटनांची नोंद घेत कारवाई केली. यामुळे श्रीलंकेतील आत्महत्येचं प्रमाण 70 टक्क्यांनी घटलं आहे.

कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरतीचं प्रमाण वाढलं आहे. आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण साधारण तेवढंच आहे.

दुसऱ्या शब्दांत, विविध देशांमधले लोक आत्महत्येचा प्रयत्न करत आहेतच, मात्र त्यांच्या हाती असणारी कीटकनाशकं कमी विषारी आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा श्रीलंकेत कीटकनाशकांमुळे आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं.

शेतीमध्ये पिकांसाठी कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे कीटकनाशकं सहज मिळू शकतात. हे टाळण्यासाठी पूर्वीच्या कीटकनाशकांमध्ये बदल करण्यात आला असून, आता कमी तीव्रतेची कीटकनाशकं शेतीसाठी वापरली जातात.

कमी तीव्रतेच्या कीटनाशकांमुळे शेतीचं उत्पादन घटतं असे पुरावे मर्यादित आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

आत्महत्या करण्याचे अन्य मार्ग निकाली निघालेले नाहीत.

गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्य सेवेत झालेल्या सुधारणांमुळे आत्महत्या केल्यानंतरही वाचवण्यात आलं आहे.

आशियाती परिस्थिती

2000च्या दशकात बांगलादेशमध्ये कीटकनाशकांसंदर्भात अशी नियमावली जारी करण्यात आली. यामुळे आत्महत्या करण्याचं प्रमाण कमी झालं. मात्र कीटकनाशकांचं प्राशन करून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या घटलेली नाही असं दोन वर्षांपूर्वीच्या अभ्यासात स्पष्ट झालं आहे. अपूर्ण माहितीमुळे हा निष्कर्ष आलेला असू शकतो.

2012 मध्ये दक्षिण कोरियाने अत्यंत विषारी अशा कीटकनाशकावर बंदी घातली. याचा थेट परिणाम दिसून आला. कीटनाशकं प्राशन करून आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण घटलं आहे.

2006 ते 2013 या कालावधीदरम्यान चीनमध्ये आत्महत्येचा दर खाली आहे. कीटकनाशकं सेवन करून आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण झपाट्याने घटलं आहे असं एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे.

कठोर नियमावली, शेतीशी संबंधित कामाचं घटलेलं प्रमाण, शहरीकरण, आरोग्याचा सुधारलेला दर्जा आणि आपत्कालीन सेवा यामुळे कीटकनाशक पिऊन आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण चीनमध्ये कमी झालं आहे.

कीटकनाशकांमुळे होणाऱ्या आत्महत्याचं प्रमाण कमी करण्यात चीनचा वाटा मोलाचा आहे.

2001 पासून नेपाळने 21 कीटकनाशकांवर बंदी घातली आहे. यापैकी काहींवर सर्वसाधारण आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने बंदी घालण्यात आली. मात्र काहींवर जाणीवपूर्वक आत्महत्या टाळण्यासाठी बंदी घातली गेली, असं नेपाळच्या पेस्टिसाईड मॅनेजमेंट सेंटरचे प्रमुख डॉ. दिल्ली शर्मा यांनी सांगितलं.

प्रतिमा मथळा बीबीसी रिअॅलिटी चेक

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)