हुथी बंडखोरांच्या हल्लांपुढे सौदी अरेबिया हतबल आहे कारण...

सौदी अरेबिया, येमेन, इराण, इराक, अमेरिका, पाकिस्तान, तेल Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सौदी अरेबियाला येमेनमध्ये अपयश का येतंय?

तेल उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर सौदी अरेबिया लष्करी ताकदीच्या बाबतीत एवढा दुबळा का?

सौदी अरेबियाच्या अराम्को कंपनीच्या तळावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हा हल्ला कोणी केला आहे याची माहिती आहे असं ट्रंप म्हणाले. प्रत्युत्तर कारवाईनंतर याबाबत तपशीलवार माहिती देण्यात येईल असं ट्रंप म्हणाले.

ट्रंप यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, 'सौदी अरेबियाच्या तेल कंपनीवर हल्ला झाला आहे. आम्हाला हा हल्ला कोणी घडवून आणला हे ठाऊक आहे. सौदीकडून दुजोरा मिळाल्यानंतर आम्ही ही माहिती जाहीर करू शकू. सौदीची काय प्रतिक्रिया आहे याकडे आमचं लक्ष आहे. त्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ शकू'.

ट्रंप यांच्या ट्वीटमधून अमेरिका लष्करी कारवाई करू शकते असं संकेत मिळत आहेत. शनिवारी सौदीची कंपनी अराम्कोच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर तणाव वाढला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ट्रंप आणि सौदीचे राजे

जूनमध्ये अमेरिकेने इराणवर हल्ल्याची योजना गुंडाळली होती तेव्हा ट्रंप यांनी असा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी इराणने अमेरिकेचं ड्रोन पाडलं होतं. शनिवारी अराम्को कंपनीच्या तळावर झालेल्या हल्ल्यामुळे जागतिक स्तरावरच्या पाच ट्क्के तेल वितरणावर परिणाम झाला आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र त्यांना इराणचं समर्थन मिळालं आहे.

हल्ल्यानंतर एका दिवसात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरलं होतं. हा हल्ला येमेनने केला याचे कोणतेही पुरावे नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी भेटू शकतात अशी शक्यता आहे.

सौदीच्या ज्या तेलतळांवर हल्ला झाला ते पाहता, हा हल्ला येमेनने केला असावा असं वाटत नाही असा अमेरिकेत मतप्रवाह आहे. संशयाची सुई इराक आणि इराणच्या दिशेने आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सौदीची अवस्था केविलवाणी का?

शनिवारी झालेल्या हल्ल्यात सौदी अरेबियाच्या 19 केंद्रांना फटका बसला आहे. 10 ड्रोनच्या साह्याने एवढा भाग काबीज करणे शक्य नाही असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सीएनएनशी बोलताना सांगितलं.

हुथी बंडखोरांनी 10 ड्रोनच्या साह्याने हल्ला केल्याचा दावा केला होता. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सॅटेलाईट इमेज शेअर केली आहे. सौदीच्या वायव्येकडील भागांना हल्ल्याचा फटका बसला आहे. येमेनहून त्या भागात हल्ला करणं अवघड आहे असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

ट्रंप प्रशासनाच्या मते ड्रोन इराक किंवा इराणहून आल्याची चर्चा आहे. मात्र अधिकृतपणे कोणीही भाष्य केलेलं नाही. सीएनएनचे लष्कर विशेषज्ञ कर्नल सेड्रिक लीगटन म्हणतात, "हा गुंतागुंतीचा डावपेचात्मक तिढा आहे. रडारच्या कक्षेत येणार नाही अशा पद्धतीने ड्रोनचा हल्ला करण्यात आला आहे. ज्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं त्या जागा अतिशय संवेदनशील आहेत. असे हल्ले बंडखोर नव्हे तर फक्त सरकारच घडवून आणू शकतं. म्हणूनच ड्रोन इराक किंवा इराणहून आलं आहे."

इराणची प्रतिक्रिया

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी सौदीवरील हल्ल्याचा उल्लेख केला नाही. मात्र इराणमधील प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की "अमेरिका युद्ध मोहीम चालवत आहे. याअंतर्गत सौदी आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना हत्यारं आणि गुप्त मदत पुरवण्यात येत आहे. या भागात जे घडतं आहे ते चिंताजनक आहे."

या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ट्रंप यांच्याकडे बरेच पर्याय आहेत, असं व्हाईट हाऊसचे वरिष्ठ काऊंन्सिलर केलनी कोनवे रविवारी म्हणाले.

ट्रंप आता रुहानी यांच्याबरोबर बैठक करण्यास तयार आहेत का? असं फॉक्स न्यूजने केलनी यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, "अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत रुहानी यांच्या बरोबरी बैठक करू असं आश्वासन दिलं नव्हतं. ट्रंप यांनी फक्त शक्यता वर्तवली होती."

सौदीच्या तेलतळांवरील हल्ल्यासाठी जमिनीचा वापर केल्याच्या वृत्ताचा इराकने स्पष्ट शब्दांत इन्कार केला. "कोणीही संविधानाचं उल्लंघन करून शांततेला बाधा आणू शकत नाही," असं इराकचे पंतप्रधान अब्देल अब्दुल महदी यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

सौदीच्या तेल तळांवर झालेल्या हल्ल्यामुळे तेलाच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे, असं जपानच्या संरक्षण मंत्री तारो कोनो यांनी म्हटलं आहे. सौदीवरच्या हल्ल्यांमुळे तेलाच्या किंमतींमध्येही वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. जपान सौदीकडून 40 टक्के तेल आयात करतो. या हल्ल्यामुळे जपानला होणाऱ्या तेल पुरवठ्यावर कायमस्वरुपी परिणाम होऊ शकतो.

सीएनएनच्या वृत्तानुसार, हुथी बंडखोरांचे ड्रोन इराणच्या प्रारुपावर आधारित आहेत. उत्तर कोरियाच्या तंत्रज्ञानापासून ते तयार झाले आहेत. हे कमी अंतरावर मारा करणारे म्हणजे साधारण 300 किलोमीटरपर्यंतचं लक्ष्य गाठू शकतात.

संयुक्त राष्ट्राच्या या विषयाच्या तज्ज्ञांनी जानेवारीत दिलेल्या अहवालानुसार लांब पल्ल्याचे ड्रोनने हुथी बंडखोर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये हल्ला करू शकतात.

सौदी अरेबिया असहाय्य का?

येमेन मध्य पूर्वेतला एक छोटा गरीब देश आहे. सधन देश अनेक वर्षं येमेनविरुद्ध युद्ध लढत आहेत. येमेनविरुद्धच्या युद्धाचं सौदी अरेबिया नेतृत्व करत आहे.

सौदीकडे येमेनमधल्या शत्रूच्या तुलनेत अत्याधुनिक हत्यारं आहेत. मात्र युद्ध जिंकण्याऐवजी त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस चिघळते आहे.

हे असं का होतंय? सौदीकडे पैशांची कमतरता नाही. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची उणीव नाही. तरीही येमेनविरुद्धचं युद्ध जिंकण्यात त्यांच्या पदरी अपयश का पडत आहे?

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सौदीचं सैन्य दुबळं का?

सौदी अरेबियाने तेलाच्या माध्यमातून मिळणाऱ्या अमाप पैशाचं रुपांतर लष्करी ताकदीत करणं आवश्यक आहे.

प्रचंड पैशांच्या मोबदल्यात सौदी सगळं खरेदी करू शकत नाही. सौदी धनवान आहे मात्र बलवान नाही असं म्हटलं जातं.

मध्यपूर्वेचे जाणकार कमर आगा यांनी सांगितलं की, "सौदीचं लष्कर कमकुवत आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रं कशी चालवावी याचं त्यांचं प्रशिक्षणच झालेलं नाही. याचं कारण म्हणजे लष्कर मजबूत झालं तर राज राजघराण्याचं महत्त्व कमी होईल आणि त्यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण होईल. लष्कर सक्षम झालं तर सत्तापालटाचा प्रयत्नही होऊ शकतो. म्हणूनच सौदी सुरक्षेसाठी आणि लष्कराच्या गरजांकरता अमेरिका आणि पाकिस्तानवर अवलंबून आहे."

येमेनविरुद्धच्या लढाईत आतापर्यंत किती पैसे खर्च झाले याविषयी सौदीने कोणतीही माहिती जाहीरपणे मांडलेली नाही. मात्र गेल्या दोन वर्षांत सौदीच्या एकूण विदेशी मूल्यांमध्ये 200 अब्ज डॉलरची झालेली घसरण त्यांच्या आर्थिक नुकसानीचं प्रतीक आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लष्कर कमकुवत ठेवणं ही सौदी राजघराण्याची चाल?

सौदी अरेबियाने 2015 पासून येमेनमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. सौदीच्या नेतृत्वाखालील सैनिकांनी हवाई आक्रमणाला सुरुवात केली. थोड्या प्रमाणात खुश्कीच्या मार्गानेही सैनिक पाठवले होते.

वॉशिंग्टन इन्स्टिट्यूटमध्ये इराक, इराण आणि मध्यपूर्व विषयांचे जाणकार मायकेल नाईट्स यांच्या मते, "सौदीच्या तुलनेत इराणच्या सैन्याची ताकद जास्त आहे हे खरं आहे. सौदी सैन्याचं भय वाटतं असं म्हणणारा तुम्हाला इराणच्या सैन्यात कोणीही आढळणार नाही. येमेनमध्ये जे घडतंय ते पाहून अंदाज बांधता येतो. अनेक वर्षं युद्ध सुरू आहे, मात्र सौदीच्या पदरी काहीच पडलेलं नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)