अफगाणिस्तान: तालिबानच्या हल्ल्यात हॉस्पिटल नष्ट, 20 लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तान Image copyright Reuters

दक्षिण अफगाणिस्तानातील एका हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यात 20 लोकांचा मृत्यू झाला. तालिबानने केलेल्या या हल्ल्यात हॉस्पिटल नष्ट झाले आहे.

कलात शहरामधील हॉस्पिटलमध्ये झालेल्या या हल्ल्यात मृतांमध्ये रूग्णांसह डॉक्टरांचाही समावेश असल्याचं स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. देशाच्या पूर्व भागामध्येही झालेल्या एका हल्ल्यात 15 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त येत आहे.

अफगाणिस्तानात ऑगस्ट महिन्यात दररोज सरासरी 74 जणांचा बळी गेल्याचं बीबीसीच्या खास पडताळणीत आढळून आलं होतं. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

गेल्या 18 वर्षांपासून युद्धग्रस्त असलेल्या अफगाणिस्तानमधून अमेरिका आपल्या सैनिकांना परत बोलावण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी अफगाणिस्तान, तालिबानच्या प्रतिनिधींसोबत अमेरिकेची शांतता चर्चा सुरू असतानादेखील जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये क्रूर हिंसाचार सुरू होता.

हिंसाचारात होणाऱ्या जीवितहानीचा आढावा घेण्यासाठी बीबीसीने ऑगस्ट महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या प्रत्येक घटनेची नोंद घेण्याचा प्रयत्न केला.

ऑगस्ट महिन्यात घातपाताच्या 611 घटना घडल्या ज्यामध्ये 2307 जणांचा बळी गेल्याचं बीबीसीला आढळून आलं. या हिंसाचारात 1948 लोक जखमी झाले.

पण तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार या दोन्हींनी बीबीसीने मांडलेल्या आकडेवारीच्या खरेपणाविषयी शंका घेतली आहे.

पाहा हा व्हीडिओ रिपोर्ट

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - अफगाणिस्तानात 31 दिवसांत हिंसाचाराचे 2 हजार 307 बळी

हे फक्त आकडे आहेत. पण यातून हे दिसून आलं, की मारल्या गेलेल्यांमध्ये सामान्य लोक आणि तालिबानी योद्ध्यांची संख्या जास्त आहे.

तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारनं मात्र बीबीसीच्या या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलावणं हा अमेरिकेसाठी परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आठवड्याभरापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी तालिबान आणि अमेरिकेदरम्यान गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली शांतता चर्चा रद्द केली. अर्थात, याविषयी भविष्यात चर्चाच होणार नाही, असं काही नाहीये.

पण या चर्चेदरम्यान अधिकृत युद्धबंदी जाहीर करण्यात आली नसल्यानं अफगाणिस्तानमध्ये दर आठवड्याला शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत. या महिन्याच्या अखेरीला अफगाणिस्तानात राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होणार आहेत. त्यावेळी हा हिंसाचार आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बीबीसीने ऑगस्ट महिन्यातील हिंसाचाराची ही आकडेवारी कशी गोळा केली हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रक्तरंजित 31 दिवस

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारच्या फौजांनी ईद अल्-अदाहच्या तीन दिवसांमध्ये अघोषित युद्धबंदी पाळली.

मात्र सुटीच्या या काळातही 10 ऑगस्टच्या संध्याकाळपासून 13 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत हिंसाचार झाला आणि यामध्ये 90 जणांचा मृत्यू झाल्याची खात्रीलायक आकडेवारी बीबीसीकडे आहे.

27 ऑगस्टला सर्वात जास्त लोकांचा बळी गेला. या दिवशी झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 162 जणांचा मृत्यू झाला तर 47 जण जखमी झाले. यामध्ये प्रामुख्याने तालिबानी योद्ध्यांचा समावेश आहे.

18 ऑगस्टचा दिवस हा सामान्य नागरिकांसाठी सर्वात वाईट होता. या दिवशी झालेल्या हल्ल्यांत 112 जणांनी प्राण गमावले. यातील बहुतेक जण एकाच घटनेत ठार झाले. काबुलमधल्या एका लग्नादरम्यान झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 92 जण ठार झाले तर 142 जण जखमी झाले.

या लग्नातील नवरा मुलगा मीरवाईज शिवणकाम करायचा. हा आपल्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण असेल, असं त्यांना वाटलं होतं. या दिवसासाठी त्यांनी मोठ्या कष्टाने पैसे साठवले होते.

मात्र लग्नात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात त्यांचे अनेक जीवलग त्यादिवशी मारले गेले. त्यांच्या नववधूचा भाऊ आणि मीरवाईजची चुलत भावंडंही ठार झाली. आपल्या नववधूला लग्नाचा पोशाख आणि फोटो आल्बम जाळावासा वाटत असल्याचं मीरवाईज सांगतात.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "माझ्या सगळ्या आशा-आकांक्षा आणि आनंद एका क्षणात नष्ट झाला."

या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली होती.

हिंसाचाराचा सर्वाधिक परिणाम कोणावर?

2001 नंतर तालिबानकडे पुन्हा तितकं सामर्थ्य कधीच आलं नाही. पण ऑगस्टमधल्या ज्या मृत्यूंविषयी बीबीसीने खातरजमा केली त्यातल्या जवळपास अर्ध्या मृत्युंसाठी तालिबान जबाबदार आहे. हा आकडाही मोठा आहे.

यामागे अनेक कारणं असू शकतात. शांतता चर्चेदरम्यान तालिबानचा पवित्रा आक्रमक होता आणि याला प्रतिसाद म्हणून अमेरिकेच्या नेतृत्वाखाली फौजांनी हवाई हल्ले आणि रात्रीच्या छाप्यांमध्ये वाढ केली. यामध्ये अनेक तालिबानींचा आणि त्याबरोबरीने सामान्यांचाही बळी गेला.

गेल्या काही वर्षांमध्ये एकूण किती तालिबानींचा बळी गेला याची आकेडवारी उपलब्ध नाही. असं म्हटलं जातं, की आजही त्यांच्याकडे साधारण 30,000 सशस्त्र बंडखोर आहेत.

गेल्या महिन्याभरामध्ये 1000 सशस्त्र बंडखोर मारले गेल्याचे 'निराधार आरोप' तालिबाने एका जाहीरनाम्याद्वारे फेटाळून लावले असून 'इतक्या मोठ्या प्रमाणात बळी गेल्याचं' सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रं नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

बीबीसीचं वृत्त 'काबुल प्रशासनाच्या अंतर्गत आणि सुरक्षा मंत्रालयांकडून रोज जाहीर करण्यात येणाऱ्या प्रचार साहित्यावर आधारित' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अफगाणिस्तानी लष्कराचे नेमके किती सैनिक हिंसाचारात मारले गेले, याबद्दलचे आकडे कमालीचे गुप्त ठेवण्यात आले आहेत. याच कारणामुळे बीबीसीने गोळा केलेली आकडेवारी प्रत्यक्ष बळींच्या संख्येपेक्षा कमी असू शकते.

यावर्षी जानेवारी महिन्यात अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी 2014 पासून सुरक्षा दलांमधील 45,000 सैनिक ठार झाल्याचं म्हटलं होतं.

ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमध्ये 473 सामान्य नागरिक ठार झाले तर 786 नागरिक जखमी झाल्याची खात्रीशीर माहिती बीबीसीकडे आहे.

"या युद्धाचा सामान्यांच्या आयुष्यावर भयंकर परिणाम होत आहे," असं मत संयुक्त राष्ट्रसंघाच्या अफगाणिस्तानातील मिशनच्या मानवी हक्क प्रमुख फिओना फ्रेझर यांनी व्यक्त केलं आहे.

"जगभरातल्या इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अफगाणिस्तानमधल्या सशस्त्र संघर्षात सामान्य नागरिकांचा सर्वाधिक बळी जात असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीतून समोर आलंय. ठार झालेल्या सामान्य नागरिकांच्या मृत्यूची नोंदवण्यात आलेली आकडेवारी ही मोठी असली तरी याची खात्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती कठोर असल्याने छापण्यात येणारी आकडेवारी वेगळी असते. होणाऱ्या प्रत्यक्ष विनाशाचं भयंकर चित्र यातून उभं राहत नाही," असं फ्रेझर यांनी म्हटलं.

हिंसाचारात बळी पडलेल्या सामान्यांची आकडेवारी सांगण्यास अमेरिकन आणि अफगाण फौजा नेहमीच नकार देतात किंवा याची योग्य ती आकडेवारी जाहीर केली जात नाही.

युद्ध परिस्थिती कशी आहे?

उत्तरेकडच्या कुंदूज शहरातील युद्ध वा काबुलमध्ये लग्नादरम्यान झालेला बॉम्बहल्ला यासारख्या मोठ्या घटनांच्या आंतरराष्ट्रीय बातम्या होतात.

तरीही अफगाणिस्तान सतत होणारे लहान हल्ले, अफगाण सैन्य आणि तालिबानमधल्या चकमकी या सर्वात जास्त प्राणघातक ठरताहेत.

अफगाणिस्तानातल्या एकूण 34 प्रांतापैकी 3 प्रांतामध्ये ऑगस्ट महिन्यात किती बळी गेले याविषयीच्या आकडेवारीची बीबीसीला खातरजमा करता आली नाही.

दर 10 मृत्यूंमधील एक मृत्यू हा गझनी प्रांतामध्ये झाला होता. हा भाग तालिबानच्या ताब्यात असून तिथे अफगाण सेनेकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाते.

गझनीमध्ये झालेल्या एकूण 66 हल्ल्यांपैकी एक तृतीयांश हल्ले हे तालिबानच्या संशयित स्थळांवर करण्यात आलेले हवाई हल्ले होते.

या अशा अनिश्चिततेच्या वातावरणात राहणं कसं असं याचं वर्णन अफगाण नागरिक करतात.

उरुझगान प्रांतातल्या मोहिबुल्लांनी कंदाहारच्या मुख्य हॉस्पिटलमध्ये बीबीसीशी बातचित केली. डॉक्टर त्यांच्या भावाच्या खांद्यात घुसलेली गोळी काढत होते.

"आमच्या परिसरात जेव्हा एखादी कारवाई होते तेव्हा सामान्यांना हालचाल करणंही मुश्कील होतं. ते जर बाहेर पडलेच तर अमेरिकन किंवा अफगाण सैनिक त्यांना गोळी घालतात," त्यांनी संतापून सांगितलं.

"ते त्यांना हवं तिथे बॉम्ब टाकतात. आमच्या आजूबाजूची सर्व घरं उद्ध्वस्त झाली आहेत."

हा जगातला सर्वात भयंकर संघर्ष आहे का ?

अफगाणिस्तानातलं हे युद्ध गेली 4 दशकं सुरू आहे आणि गेली अनेक वर्षं यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

युद्धामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीवरून अफगाणिस्तानामध्ये जगातला सर्वात भयंकर संघर्ष सुरू असल्याचं 'आर्म्ड कॉन्फ्लिक्ट लोकेशन अँड इव्हेंट डेटा प्रोजेक्ट' नं (ACLED) गेल्या वर्षी जाहीर केलं होतं.

2019 मधील त्यांची अफगाणिस्तानातल्या मृत्यूची आकडेवारीही हेच सांगते. अफगाणिस्तानमध्ये ऑगस्ट महिन्यात गेलेल्या बळींची संख्या ही येमेन किंवा सीरियातल्या बळींच्या संख्येच्या तिप्पट असल्याचं ACLEDची आकडेवारी सांगते

अफगाणिस्तान हा जगातला सर्वात अशांत देश असल्याचं 'ग्लोबल पीस इंडेक्स रिपोर्ट' (Global Peace Index Report) ने जून 2019 मध्ये म्हटलंय.

बीबीसीने आकडेवारी कशी गोळा केली?

1 ते 31 ऑगस्ट 2019 दरम्यान झालेल्या 1200 हल्ल्यांची माहिती बीबीसीने गोळा केली.

नोंदवण्यात आलेल्या प्रत्येक घटनेचा तपशील अफगाणिस्तानमधल्या बीबीसीच्या पत्रकारांनी जमवला. यात अनेक हल्ले असे होते जे फारसे मोठे नसल्याने त्यांच्याविषयीच्या बातम्या छापून आल्या नव्हत्या. या वृत्तांची आणि मिळणाऱ्या गुप्त माहितीची खात्री करण्यासाठी बीबीसीने त्यांच्या प्रत्यक्ष घटनास्थळावरच्या व्यापक टीमच्या माध्यमातून संपूर्ण अफगाणिस्तानातल्या सूत्रांशी संपर्क साधला.

यामध्ये सरकारी अधिकारी, आरोग्य सेवक, आदिवासी नेते, स्थानिक नागरिक, घटनेचे साक्षीदार, हॉस्पिटलचे रेकॉर्डस आणि तालिबानमधील सूत्र या सर्वांचा समावेश होता. एखाद्या घटनेची खात्री किमान दोन विश्वासू सूत्रांकडूनच करण्यात आली आहे.

हॉस्पिटलच्या कागदपत्रांमध्ये ज्या मृत्यूंचा उल्लेख करण्यात आला होता, त्यावर विश्वास ठेवण्यात आला. त्याची परत पडताळणी करण्यात आली नाही.

मृत्यूच्या ज्या आकडेवारीची खात्री झाली तितक्याच मृत्यूंची नोंद करण्यात आली. जिथे बळींची ढोबळ आकडेवारी देण्यात आली होती- उदा 10 ते 12, तिथे बळींचा किमान आकडा मोजदादीसाठी घेण्यात आला.

एकाच घटनेविषयी विविध सूत्रांनी वेगवेगळी आकडेवारी दिल्यास त्यातली किमान संख्या मोजदाद करण्यासाठी वापरण्यात आली. परिणामी शेकडो अहवालांचा समावेश या आकडेवारी करण्यात आलेला नाही. म्हणूनच प्रत्यक्षातला हल्ल्यांचा आणि बळींचा आकडा बराच मोठा असू शकतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)