पाकिस्तान : हिंदू मुलीच्या मृत्यूमुळे सिंधमध्ये तणावाचं वातावरण

निमरिता कुमारी Image copyright VISHAL CHANDANI

पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातली मेडिकलची विद्यार्थिनी असणाऱ्या निमरिता कुमारीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

पाकिस्तानात ट्विटरवर #JusticeForNimrita हा टॉपचा ट्रेंड आहे. निमरिता मेडिकलची शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी होती.

निमरितावर बलात्कार झाला आणि मग तिचा खून करण्यात आला असं अनेक पाकिस्तानी लोक ट्विटरवर म्हणत आहेत. पाकिस्तानातले पत्रकार कपिल देव यांनी लिहिलंय की पोलिसांनी या घटनेचा तपास करावा आणि सांगावं की नक्की काय काय झालं.

बीबीबी प्रतिनिधी शुमाइला जाफरी यांनी निमरिता यांच्या मृत्यूबाबत रहमतपुरचे एसएचओ असदुल्ला यांच्याशी बातचित केली. त्यांनी सांगितलं की पहाटे तीन वाजता मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं आहे आणि याचा रिपोर्ट यायला थोडा वेळ लागेल.

असदुल्ला यांनी म्हटलं आहे की, "याच्या तपासासाठी एक टीम बनवली आहे आणि निमरिताचा फोन फॉरेन्सिक अॅनालिस्टकडे सोपवला आहे. तिची खोली आतून बंद होती, आणि मानेभोवती वळ उठले होते.

ही खोली आता सुरक्षारक्षकांच्या पहाऱ्यात आहे. ही घटना मंगळवारी 11 वाजता घडली. कॉलेज प्रशासनेच निमरिताला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.

निमरिता चंडका मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी होती. पाकिस्तानी मीडियात आलेल्या बातम्यांनुसार निमरिता कॉटवर पडलेल्या अवस्थेत आढळली होती आणि तिच्या गळ्याभोवती दोरी बांधलेली होती. तिची खोली आतून बंद होती. पोलिसांचं म्हणणं आहे की ही आत्महत्या आहे की हत्या हे हे आताच सांगणं अवघड आहे.

पाकिस्तानी पत्रकार कपिल देव यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिलं आहे की, "मृत विद्यार्थिनीचे भाऊ विशाल यांचं म्हणणं आहे की त्यांच्या बहिणीची हत्या झाली आहे. निमरिताचं लैंगिक शोषण झालं होतं तसंच तिला ब्लॅकमेल केलं जात होतं असंही त्यांचं म्हणणं आहे.

अलीजा अन्सारी यांनी लिहिलं की, "अजून एक दिवस आणि अजून एक वाईट घटना. मेडिकल कॉलेजची सुरक्षा व्यवस्था कुठे होती जेव्हा ही हत्या झाली. आतापर्यंत बिलावल आणि कंपनीकडून या घटनेवर काही प्रतिक्रिया का आली नाही."

डॉक्टर सेफुल्लाह खान यांनी बिलावर भुट्टो यांना टॅग करून लिहिलं आहे, "चंडका मेडिकल कॉलेजमध्ये एक फायनल इयरची विद्यार्थी मृतावस्थेत आढळली आहे. कृपया याची चौकशी करा."

बुशरा बियाने लिहिलं आहे की, "सिंध प्रांताच्या अंतर्गत भागात हे सगळं काय होतंय. इम्रान खान यांनी या मुलीला न्याय द्यावा."

एक्स्प्रेस ट्रिब्यूननुसार हॉस्टेलच्या मुलींनी निमरिताचा दरवाजा वारंवार वाजवला आणि कोणतंही उत्तर न आल्यामुळे त्यांना संशय आला. हॉस्टेलच्या गार्डने जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा लोकांना आत प्रवेश करता आला. लरकानाचे डीआयजी इरफान अली बलोच यांनी या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी एसएसपी मसूद अहमद बंगेश यांना दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)