'Howdy, Modi!': अमेरिकेत नरेंद्र मोदींच्या स्वागताची अशी सुरू आहे तयारी

मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 सप्टेंबरला अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ह्यूस्टन शहरात भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधणार आहेत.

'हाऊडी मोदी' असं या कार्यक्रमाचं नाव असून, यासाठी साधारण 60 हजार लोकांनी तिकिटं आरक्षित केली आहे तर काहीजण चक्क वेटिंग लिस्टवर आहेत.

या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंपसुद्धा मोदी यांच्याबरोबर मंचावर उपस्थित असतील.

ट्रंप आणि मोदी यांची गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी भेट आहे. यापूर्वी जून महिन्यातल्या जी-20 आणि गेल्या महिन्यातल्या जी-7 बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.

दोन्ही देशांमधील संबंध उत्तम आहेत. व्यापारासंबंधी थोडेफार मतभेद असले तरी या भेटीत ट्रंप आणि मोदी व्यापार या विषयावर चर्चा करतील अशी आशा आहे.

'हाडी मोदी' कार्यक्रमासाठी जोरदार तयारी

ह्यूस्टनमध्ये तब्बल 5000 स्वयंसेवक एनआरजी अरीनाची सजावट करण्यात गुंतले आहेत.

ह्यूस्टनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये मोदी यांच्या भेटीविषयी प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे.

भारतीय वंशाचे विश्वेश शुक्ला ह्यूस्टन शहरात राहतात. ते आणि त्यांचे अनेक मित्र या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत.

शुक्ला सांगतात, "लोकांमध्ये खूप उत्साह आहे. एनआरजी अरीनामध्ये जाण्यासाठी आमच्या प्रवेशिकेची वाट आम्ही पाहात आहोत. ट्रंपसुद्धा तिकडे येणार आहेत, त्यामुळे आणखी उत्साह आहे... लोकांना वाटतंय की तिकडे मज्जा येईल. तयारी जोरात सुरू आहे, खूप उत्साह आहे."

देशभरातील कितीतरी ठिकाणांहून भारतीय वंशाचे अनेक लोक ह्यूस्टनला येत आहेत.

दुसरीकडे ह्यूस्टनमध्येच असेही लोक आहेत, ज्यांचा पंतप्रधान मोदींच्या धोरणाला वैचारिक विरोध आहे आणि त्यामुळे ते या कार्यक्रमाला जाणार नाहीत. काहींना वैयक्तिक कारणांमुळे जाता येणार नाहीये.

कार्यक्रमाकडून अपेक्षा

ह्यूस्टनमधील भारतीय वंशाच्या पण अमेरिकन नागरिक असलेल्या आभा वैचारिक मतभेदांमुळे या कार्यक्रमाला जाणार नाहीयेत. पण 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमाबद्दल त्या म्हणतात, "हा कार्यक्रम खूप भव्य होत आहे, संपूर्ण मैदानावर आच्छादन टाकण्यात आलंय, पाण्यासारखा पैसा खर्च केला जातोय, येथे 5000 पेक्षा जास्त स्वयंसेवक कार्यरत आहेत. एखादा शो असल्याप्रमाणे तयारी सुरू आहे. लोकांना फुकटात काहीतरी आकर्षक पाहायला मिळणार आहे, त्यामुळे सगळेच जण जाण्याच्या तयारीत आहेत.''

इतक्या गर्दीत वृद्ध आणि लहान मुलांना घेऊन कसं जाणार, असा प्रश्न भावना नावाच्या एका महिलेला पडला आहे.

Image copyright Reuters

भावना म्हणतात, "डाउनटाउन भागात सकाळच्या वेळी प्रचंड ट्राफिक असतं. खूप वेळ लागतो, पार्किंग मिळत नाही. ज्यांच्या कुटुंबात वृद्ध किंवा लहान मुलं आहेत त्यांना घेऊन जाणं कठीण आहे."

'हाऊडी मोदी'मध्ये सहभागी होणाऱ्या अनेक लोकांना भारत सरकारची धोरणे आणि देशाचा विकास याबाबत मोदी काय सांगतात ते प्रत्यक्ष ऐकायचं आहे. तर मोदी आता काळ्या पैशासारख्या मुद्द्यांवर काहीतरी करून दाखवतील, अशी आशा काही लोकांना आहे.

ह्यूस्टनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाचे कांतीभाई पटेल सांगतात, "मोदीजी काळा पैसा परत आणण्याविषयी काय सांगतात ते आम्हाला ऐकायचं आहे. काळा पैसा परत आणण्यासाठी आता त्यांनी काहीतरी कारवाई केली पाहिजे.''

ह्यूस्टनमध्ये राहणारे मुस्लीम लोकंही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, इतकेच नाही तर ते कार्यक्रमाच्या तयारीतही मदत करत आहेत.

शहरातील एक मुस्लीम संस्था 'इंडियन मुस्लीम्स असोसिएशन ऑफ ग्रेटर ह्यूस्टन'चे लताफत हुसैन सांगतात "काही लोकांना विरोध करायचाय, तर काहींना बसून चर्चा व्हायला हवी असं वाटतं. भारतातल्या अल्पसंख्याक लोकांबाबत जे काही होत आहे, ते पाहता त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने काही कृती करायला हवी. आम्हाला याविषयीच मोदीजींशी बोलायचं आहे. यासंदर्भात आम्ही मोदीजींना एक पत्रही देऊ."

Image copyright Reuters

लताफत हुसैन सांगतात, की त्यांच्या संस्थेतील अनेक लोक 'हाउडी मोदी' कार्यक्रमाच्या तयारीत पुरेपूर सहभागी होत आहेत.

लताफ़त हुसैन स्वतः एक डेमोक्रॅट आहेत. तरीही ते म्हणतात, की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप 'हाउडी मोदी' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत आहेत ही भारतासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे.

दोन्ही नेते या कार्यक्रमादरम्यान भारत आणि अमेरिकेमधल्या व्यापारातील तणावासंदर्भात उपाय शोधतील अशी लताफ़त हुसैन यांना आशा वाटते.

डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक पक्षाच्या नेत्यांचा सहभाग

अमेरिकेतील 77 टक्के भारतीय वंशाचे लोक डेमोक्रेटिक पक्षाला मत देतात. यामुळेच 2020 च्या निवडणुका लक्षात घेऊनच ट्रंपसुद्धा 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या निमित्ताने विविध प्रांतातील 20 लाख भारतीय वंशाच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

Image copyright PRESS ASSOCIATION

भारतीय अमेरिकन संस्था टेक्सस इंडिया फोरम या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे, की "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्याबरोबरच डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक पक्षाचे अनेक खासदार, अनेक प्रांताचे गव्हर्नर आणि महापौर, तसेच अनेक अधिकारीही 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात सहभागी होणार आहेत."

ह्यूस्टनमध्ये मोदी यांच्या विरोधात आंदोलनांचंही आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये हजारो लोक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

काश्मिरवरून विरोध?

काश्मीर मुद्दा आणि अल्पसंख्यांकाबाबतची धोरणे याबद्दल मोदी सरकारला विरोध करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यामध्ये शीख समुदायातील लोक तसंच पाकिस्तानी वंशाचे लोक सहभागी होऊ शकतात.

5 ऑगस्ट रोजी काश्मीरमध्ये 370 कलम काढून टाकल्यावर तेथे इंटरनेट सेवा आणि मोबाइल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सामान्य लोकांना त्रास होत आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यूस्टनहून 23 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या वार्षिक अधिवेशात सहभागी होण्यासाठी जातील.

Image copyright Getty Images

27 सप्टेंबर रोजी ते महासभेत बोलतील. याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानसुद्धा महासभेत बोलणार आहेत.

यावेळी काश्मीरचाच मुद्दा लावून धरणार असल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं.

काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करणं ही आमची देशांतर्गत बाब आहे, अशा स्पष्ट शब्दांत भारताने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये विविध देशांतील नेत्यांच्या भेटी घेतील.

मोदी न्यूयॉर्कमध्ये ब्लूमबर्ग ग्लोबल बिजनेस फोरमला उद्देशून भाषण करतील आणि या दौऱ्यात त्यांना बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे पुरस्कारही प्रदान केला जाईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)